Category Archives: कोकण

“कोकण रेल्वे आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बा……” सोशल मीडियावरील ती पोस्ट होत आहे तुफान व्हायरल

   Follow us on        

सावंतवाडी:सध्याच्या सोशल नेटवर्किंग युगात जनजागृती करण्यासाठी किंवा आपला आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी समाज माध्यमांचा (सोशल मीडिया) वापर करून अपेक्षित परिणाम मिळवता येतात. अगदी जवळचे कोकणातील उत्तम उदाहरण द्यायचे झाले तर फेसबूक या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईटवर बनविण्यात आलेले Sawantwadi Railway Station – Terminus हे पेज.

सावंतवाडी रेल्वे स्थानक आणि कोकण रेल्वे संबधीत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, जनजागृती करून समस्यां सोडविण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देण्यात यावा या हेतूने या पेजची निर्मिती करण्यात आली. कोकण रेल्वे अभ्यासक सागर तळवडेकर यांनी हे पेज बनवले आहे. या पेज द्वारे त्यांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते मिहीर मठकर, विहंग गोठोस्कर, भूषण बांदिवडेकर,तेजस पोयेकर ईत्यादींनी पोस्ट, लाईव्ह च्या माध्यमातून वेळोवेळी अनेक कोकण रेल्वे संबधी अनेक समस्या येथे मांडून जनजागृती केली आहे.

दोन दिवसांपूर्वी या पेजवर या कार्यकर्त्यांनी फलक मोहीम राबवून काही फोटो पोस्ट केले होते. ही पोस्ट तुफान व्हायरल होत असून तिच्यावर दृश्ये views, लाईक आणि कमेंटचा अक्षरशः पाऊस पडत आहे. “कोकण रेल्वे आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची” अशा आशयाची फलक मोहीम ”कोकणवाचवा” आणि ”SaveKokanRailway” या hashtag सहित कार्यकर्त्यांनी राबवून ते फोटो या पेज वर पोस्ट केले होते.

आम्हाला अजून पाठिंबा दर्शविण्यासाठी आमच्या ह्या चळवळीत सामील व्हा.या पेज ला फॉलो करून आमच्या सोबत जोडले जा ही तुम्हा सर्वांना विनंती. आवाहन या पोस्ट मध्ये करण्यात आले आहे

 

#Save Konkan Railway..
#Merge Konkan Railway With Indian Railways.
#Sawantwadi Terminus

@followers

Posted by Sawantwadi Railway Station-Terminus on Friday 22 March 2024

 

Loading

APMC Market | होळीच्या दिवशी हापूसची मोठी आवक; सध्याच्या दर काय?

नवी मुंबई:रविवारी होळीच्या दिवशी कोकणातून आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. कोकणातून ३०६८१ पेट्या व इतर राज्यातून ६०५७ अशा एकूण ३६ हजार ७३८ पेट्या आंब्याची आवक झाली आहे. होळी व धूलिवंदनला सर्व बाजारपेठा बंद असताना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ मार्केट रविवारी होळीच्या दिवशी सुरू ठेवले होते. दिवसभरात ३६ हजार पेट्या आंब्याची आवक झाली.

सलग दोन दिवस मार्केट बंद राहिल्यामुळे आंब्याचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे बाजार समिती प्रशासनाने रविवारी व्यापार सुरू ठेवण्यास परवानगी दिली हाेती.

हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने त्याच्या दरात पण घसरण होताना दिसत आहे. होलसेल मार्केट मध्ये हापूस ३०० ते ८०० रुपये डझन तर किरकोळ मार्केट मध्ये ६०० ते १५०० रुपये डझन दराने विकला जात आहे.

Loading

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण? दीपक केसरकर यांचे सूचक विधान

   Follow us on        
सिंधुदुर्ग: लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील जागा कोणाला मिळणार याबाबत येथील नागरिकांना उत्सुकता लागली असताना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्या बद्दल केलेल्या स्तुतिसुमनांनी चर्चेला उधाण आले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. या लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे किरण सामंत आणि भाजपचे नारायण राणे यांच्यामध्ये उमेवारीसाठी स्पर्धा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्या उमेदवारीला समर्थन देणारे वक्तव्य केले आहे. नारायण राणे ही केवळ एक व्यक्ती नव्हे तर त्यांच्यावर संपूर्ण जिल्ह्याचा विकास अवलंबून आहे, असे वक्तव्य दीपक केसरकर यांनी केले. ते सोमवारी सिंधुदुर्गात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्यासारखा आक्रमक नेता निवडून आला तर तुम्हाला आवडेल का, असा प्रश्न दीपक केसरकर यांना विचारण्यात आला. यावर दीपक केसरकर यांनी म्हटले की, नारायण राणे ही फक्त एक व्यक्ती नाही, त्यांच्यासोबत आमचं सिंधुदुर्गाचं मंत्रिपद आहे. आमचा पुढचा विकास त्यावर अवलंबून आहे. आज त्यांना राज्यसभेचे तिकीट मिळालेले नाही. ते लोकसभेवर निवडून आले तर ते मंत्री बनण्याची त्यांची क्षमता आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्याला मिळणारं केंद्रीय मंत्रिपद घालवायचे  का, याचा विचार जनतेने केला पाहिजे. मी नाही, माझं कसं आहे, एखादा संघर्ष झाला तर तो विषयापुरता मर्यादित असतो. आम्ही कोकणी लोक आहोत, आमचा जिल्हा आमच्यासाठी प्राधान्याचा विषय आहे.  कोकणातील माणूस कधीच कोणाकडे मागत नाही,  कर्जमाफी मागत नाही, फक्त कधीतरी मदतीची गरज लागते. पण विकासाची गंगा कोकणात येण्याची आवश्यकता आहे, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
साहजिकच दीपक केसरकरांच्या या वक्तव्यांनी अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दीपक केसरकारांचे सध्याच्या मंत्री मंडळातील स्थान पाहता ही जागा भाजपाला देण्यात येणार असल्याचे सूचक विधान त्यांनी केले असल्याचे बोलले जात आहे .

Loading

दुग्ध शर्करा योग! ऐन होळी पौर्णिमेला राजापूरात गंगा माईचे आगमन

   Follow us on        

राजापूर : सध्या सगळीकडे शिमगोत्सवाची धूम आहे. मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी आलेले असताना फाल्गुन पौर्णिमेला राजापूर येथे गंगेचे आगमन झाले असून मूळ प्रवाह प्रवाहित झाला आहे.

सध्या स्थानिकांसमोर भीषण पाणी टंचाईचे संकट आहे. अजून अडीच महिने कसे काढायचे हा प्रश्न तमाम कोकणवासीयांसमोर असतानाच राजापूर उन्हाळे येथील प्रसिद्ध गंगामाईचे आज 24 मार्च 2024 रोजी सकाळी आगमन झाले आहे.

मूळ गंगेचा प्रवाह प्रवाहित झाला असून काशी कुंडासह गंगा स्थळावरील सर्व चौदाही कुंडांमध्ये पाणी आले आहे, यातील काही कुंडे फुल भरले आहेत. पाण्याचा हा मोठा प्रवाह स्थानिकनां दिलासा देणारा आहे.आता भाविकांना गंगा स्नानाचा आनंद घेता येणार आहे

 

 

Loading

उन्हाळी हंगामासाठी मध्यरेल्वेच्या २२ विशेष गाड्यांचा जूनपर्यंत विस्तार; कोकण रेल्वे मार्गावरील एका गाडीचा समावेश

   Follow us on        
Railway News : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी  मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामासाठी काही विशेष गाड्यांच्या फेऱ्यांची कालावधी जूनपर्यंत विस्तारित  करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एकूण २२ विशेष गाड्यांचा तब्ब्ल १२०० अतिरिक्त फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.
या यादीत कोकण रेल्वे मार्गावरील आठवड्यातून दोन दिवस चालविण्यात येणारी  ०११३९/०११४० नागपूर-मडगाव- नागपूर या गाडीचा समावेश आहे. या गाडीची सेवा या वर्षाच्या मार्च अखेरीस संपणार होती. मात्र तिची सेवा जून अखेरपर्यंत वाढविण्यात आली आहे. दोन्ही बाजूने या गाडीच्या एकूण ५४ फेऱ्या होणार आहेत.
गाडी क्रमांक ०११३९ नागपूर-मडगाव ही विशेष गाडी दिनांक ०३ एप्रिल २०२४ ते २९ जून २०२४ पर्यंत चालविण्यात येणार असून गाडी क्रमांक ०११४० मडगाव – नागपूर ही गाडी दिनांक ०४ एप्रिल २०२४ ते ३० जून २०२४ या आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे, डब्यांच्या संरचनेनुसार चालविण्यात येणार आहे.
थांबे: वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थिवी आणि करमळी

 

Loading

पर्यटकांना खुशखबर! सावंतवाडी येथील जंगल सफारी ३१ मार्च पर्यंत मोफत

   Follow us on        

सावंतवाडी, दि. २३ मार्च : शहराच्या पर्यटन वाढीसाठी नरेंद्र डोंगरावर सुरू केलेली जंगल सफारी दिनांक ३१ मार्च पर्यंत मोफत करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

या सफारीच्या उद्घाटन प्रसंगी पर्यटकांना ही सेवा दिनांक ३१ मार्चपर्यंत मोफत देण्यात येईल असे दीपक केसरकर यांनी जाहीर केले होते. मात्र त्या ठिकाणी शुल्क आकारण्यात येत होते. याबाबत परशुराम उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर ही सफारी आता मोफत सुरू करण्यात आली आहे. याबाबतची माहिती सुभेदार यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली आली आहे.

आशिष सुभेदार यांच्या म्हणण्यानुसार, मंत्री केसरकर यांनी एका कार्यक्रमात ही सफर मोफत देणार असल्याचे जाहीर केले होते; परंतु त्या ठिकाणी वन विभागाकडून लहान मुलांसाठी ५० रुपये तर मोठ्यांसाठी १०० रुपये असा दर आकारण्यात आला होता. त्यानंतर ४ दिवस पैसे घेण्यात आले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सुभेदार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्याची दखल केसरकर यांच्याकडून घेण्यात आली असून, ही सफारी मोफत देण्यात यावी, अशा सूचना त्यांच्याकडून वन विभाग प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मोफत सफर सुरू केली असून, या सफारीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे

Loading

Konkan Diary | कोकणातील ओसाड पडत चाललेली गावे आणि गावापासून तुटत चाललेला ‘चाकरमानी’…

कोकणातील रायगड, रत्नागिरीसह राज्यातील विविध ठिकाणाहून नागरिक आता मुंबई, ठाणे, पुणे अशा विविध शहराच्या ठिकाणी स्थलांतरीत होत आहेत. मात्र शहराकडील हे स्थलांतर वेळीच थांबणे शहराच्या आणि ग्रामीण भागाच्या दृष्टीने योग्य ठरणार आहे. यासाठी कोकणातील तरुणांनी आपल्या गावाकडे लक्ष देऊन आधुनिक शेतीकडे लक्ष दयायला हवे. विविध जोडधंदे करुन स्वःतासह कुटूंबाचा विकास साधायला हवा.

कोकणात छोटी-मोठी गांव, वाड्या आहेत. परंतु अशा ठिकाणी केवळ वयोवृद्ध आजी-आजोबा व क्वचित तरुणवर्ग दिसतो. बहुसंख्य घरे ही कुलूपबंद आहेत. तर शेती ओसाड पडली आहे. साहजिकच रोजगार नसल्याने तरुणवर्ग हा छोटी- मोठी नोकरी करण्यासाठी शहराकडे वळत आहे. गणेशोत्सव, होळी, दसरा, जत्रा असे पारंपारिक सण आले तरच हा तरुणवर्ग गावाकडे हजेरी लावतो. एरवी सगळीकडे शांतताच-शांतता पसरलेली असते. हे सर्व भयानक आहे, काही वर्षांत ही गावे स्मशानागत बनायला वेळ लागणार नाही.म्हणून कोकणातील तरुण-तरुणी यांनी खेड्यापाड्यातच राहून करण्या योग्य स्वंयरोजगार करुन समृद्ध कोकण बनविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

गावे, गावातील शाळा बंद होत आहेत. हे सर्व का घडतंय? कारण रोजगार नाही, शेती आहे पण चांगले पीक नाही. वर्षभर पुरेल इतके उत्पन्न नाही, मुलांना चांगले शिक्षण नाही, वैद्यकीय उपचार पुरेसे नाही, असे बरेच प्रश्न नागरिकांच्या मनात भेडसावत आहेत. 

किंबहुना या भागामध्ये शेती करायला कोणी तयार होत नाही, शेती करावी तर मुबलक पाण्याचा साठा नाही, शेतीविषयक मार्गदर्शक नाही, शेती करण्यास शासनाकडून कोणतीच मदत नाही, मजूर मिळत नाही, शिक्षणाचे तीन तेरा वाजले आहेत, रोजगार नसल्याने बेरोजगारी वाढली आहे, असे अनेक प्रश्न पदरात पडलेली आहेत. त्यामुळे ना-इलाजाने स्थानिक नागरिकांना शहराची वाट धरावी लागत आहे. पण भविष्यात असेच होत राहिले तर गाव ओस पडतील. 

चांगल्याप्रकारे उत्पन्न मिळत नाही म्हणून भुमिपुत्र आपली शेती, जागा कवडीमोल किंमतीत विकून मोकळे होतील. पण याचा फायदा परप्रातियांना होईल. सर्वांत धक्कादायक म्हणजे भुमिपुत्र आज परप्रांतीयांना आपल्या जमिनी विकत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. त्यातून बाहेरून आलेले लोंढे स्वतःचे व्यवसाय टाकून घर करून बसले आहेत. सरकार कोणाचेही असो, कायम या ठिकाणी दुर्लक्ष झालेला आहे. आतापर्यंत जे झालं ते झालं ; पण या पुढे सर्व प्रश्नाची दखल घेऊन काळजीने लक्ष दिले पाहिजे. 

जेवढ्याही शासकीय योजना असतील त्या लोकांसमोर आणून लोकांपर्यंत खेड्या-पाड्यात पोहचवाव्यात. रुग्णालयात सुविधा देणे यावर विशेष भर दिले पाहिजे. विशेषतः खेड्यांमध्ये वैद्यकीय उपकेंद्रे जी वाळवी खात बसलेली आहेत, ती पुन्हा चालू करावी, शैक्षणिकदृष्ट्या बळकट करणे गरजेचे आहे. छोटे-मोठे उद्योग आणले पाहिजे, जेणेकरून स्थानिक नागरिकांना रोजगार मिळेल, पर्यटन स्थळ यांचा विकास करणे गरजेचे आहे, पर्यटकांची वाढलेली गर्दी ही स्थानिक लोकांना रोजगार मिळू शकतो. “तुज आहे तुझ्या पाशी पण वेड्या तु जागा चुकलाशी” या प्रमाणेच कोकण भुमिपुत्रचे झाले आहे. कोकणातील प्रत्येक जिल्ह्यातील, तालुक्यामधील गावा-गावात, वाडी-वाडीपर्यंत नागरिकांना भेडसावणार्‍या प्रश्नांवर सरकारने, सर्व राजकीय पक्षांनी राजकारण बाजूला ठेऊन, येथील जनतेच्या हितासाठी एकत्रित येऊन, या सर्व अडचणी दूर करणे काळाची गरज आहे. वेळ न दडवता आतापासूनच अंमलबजावणीला सुरुवात व्हायला पाहिजे. नाही तर उद्या उशिर झालेला असेल. अशी परिस्थिती निर्माण झाली तरच शहराकडे जाणारे नागरिक थांबतील व छोटी-मोठी गावे, वाड्या हे सर्व ठिकतील, अन्यथा पुढील येणारा काळ खूप कठीण असेल हे सांगायला कोण्या जोतिष्याची गरज नाही. तेव्हा कोकणातील तरुणांनो जागे व्हा… आपल्या जमिनी न विकता विकसित करा. आपली मानसिकता बदलून योग्य मार्गदर्शन घ्या. स्वंयरोजगारचे हजारो प्रकल्प उभे कसे करता येतील व स्थानिकांना रोजगार कसे उपलब्ध होतील याकडे लक्ष द्या. प्रकल्प उभारणीसाठी योग्य प्रशिक्षण घ्या. निर्माण होणाऱ्या अनेक अडचणी संघटीतपणे सोडण्यासाठी एकत्र या. हापूस आंबा, कृषी उत्पादने, पर्यटन, फलोद्यान, इ. संघटीत मार्केटिंग करा. त्यासाठी व्यावसायिक संघटना निर्माण करा. पुढील १५-२० वर्षांत कोकण जागतिक दर्जाचे आर्थिक विकासाचे केंद्र कसे करता येईल यासाठी प्रमाणिक प्रयत्न करा. कोकणाता नद्या, निसर्ग, धबधबे, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, विविध तीर्थक्षेत्र असल्याने पर्यटकांना आकर्षित करणे होते आहे. त्यासाठी विशेष प्रयत्न करा. मत्स्योद्योग, शेती, पर्यटन, फलोद्यान इ. क्षेत्रात कोकण जागतिक स्तरावर जाणे सोपे आहे. गरज आहे ती तुमच्या प्रमाणिक प्रयत्नांची. तुम्ही कोकण भुमिपुत्र आहात… भुमिपुत्र राहा… नाही तर उद्या आपल्याला आपल्याच गावात… वाडीत पाहुणे व्हावे लागेल. तेव्हा तरुण-तरुणींनो पुन्हा खेड्याकडे चला…आधुनिक शेती, व्यवसाय, स्वयंरोजगार करा. आपले कोकण समृद्ध करा.

 

 

 

Loading

नारायण राणे की किरण सामंत? सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता

   Follow us on        

Loksabha Election 2024|लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार अजून जाहीर करण्यात आला नसून हा विषय महायुतीसाठी प्रतिष्ठेचा झाला आहे. भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना नेते उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरणभैय्या सामंत ही दोन नाव प्रामुख्याने या मतदारसंघासाठी चर्चेत आहेत. आज भाजपची महाराष्ट्र राज्यातील लोकसभेच्या जागेसाठी दुसरी यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे आजतरी या ही उत्सुकता संपणार अशी आशा निर्माण झाली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा कोकणातील जनसंपर्क मोठा आहे. सर्वपक्षीय असलेले राणे यांचे संबंध, राणे यांची काहीशी आक्रमक शैली, तसेच राणे यांचे ज्येष्ठ सुपुत्र असलेले निलेश राणे याच मतदारसंघात यापूर्वी खासदार राहिले आहेत. त्यांचाही संपर्क आजवर या मतदारसंघात कायम राहिला आहे. या नारायण राणे यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत.

शिवसेना नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू असलेले किरण भैय्या सावंत हे शासनाच्या रत्न सिंधू योजनेचे सदस्य आहेत. त्यांनी गेले काही महिने लोकसभा मतदारसंघात भेटीगाठी संपर्क सुरू केला आहे. इतकेच नाही तर उदय सामंत यांच्या यशस्वी कारकिर्दीमागे आणि उदय सामंत यांच्या प्रत्येक निवडणुकीत किरणभैय्या सामंत यांचा सिंहाचा वाटा आहे. भाजपचे जेष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची ही दोन वेळा भेट घेत किरण सामंत यांनी आशीर्वाद घेतला आहे. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी नारायण राणे यांच्या ऐवजी किरणभैय्या सामंत यांना मिळू शकते.

दिपक केसरकर यांचे विधान चर्चेत.. 

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी आंगणेवाडी यात्रेच्या दरम्यान माध्यमांजवळ बोलताना मोठे वक्तव्य केलं होतं. महायुती जेव्हा मजबूत आहे त्यावेळेला कोण कोणाच्या चिन्हावर लढलं याला फार महत्त्व नसतं, कारण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ज्या वेळेला पालघरची सीट शिवसेनेला दिली त्यावेळेला भाजपने आपला उमेदवार सुद्धा दिला होता, त्यामुळे जिथे जे चिन्ह चालतं आणि निवडून येण्याची शक्यता अधिक असते तिथे आपला उमेदवार द्यायला कोणताच कमीपणा नसतो, नाहीतर मग युती कशाला म्हणायची? असं मोठे वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं होतं. त्यामुळे किरणभैय्या सामंत यांना लोकसभेची रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारी मिळाली, तरी ते भाजपच्या कमळ चिन्हावरही लढू शकतात, असे संकेत दीपक केसरकर यांनी दिल्याचा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.

 

 

 

 

Loading

“सावधान! पुढे … ” काळजीपोटी जनआक्रोश समितीने मुंबई गोवा मार्गावर लावले मार्गदर्शक फलक..

   Follow us on        

मुंबई, दि. २२ मार्च : शिमग्यास कोकणात जाणऱ्या कोकणकरांची अपुऱ्या दिशादर्शक व सुरक्षा सुविधामुळे होणाऱ्या वित्तहानी व जीवितहानी टाळण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर मार्गदर्शक फलक लावण्याची मोहीम मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणुन काल समितीच्या वतीने महामार्गावर काही ठिकाणी हे फलक लावले गेले आहेत.

महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही आहे. अनेक ठिकाणी काम चालू आहे, अनेक ठिकाणी धोकादायक स्पॉट निर्माण झाले आहेत. अशा ठिकाणी वाहन चालकांना सावध करण्यासाठी प्रशासनाने मार्गदर्शक फलक लावणे अपेक्षीत होते. जनआक्रोश समितीच्या कार्यकर्त्यांनी अपघाताचा धोका ओळखून असे स्पॉट प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले तरी त्या ठिकाणी फलक लावण्यात आले नाहीत. त्यामुळे समितीने लोकसहभागातून हे फलक लावण्याचे कार्य हाती घेतले आहे. यामध्ये पळस्पे ते वाकेड दरम्यान दिशादर्शक व दिशापरिवर्तन फलक , वाहतुक नियंमांचे नियम व सुचना तसेच रिफलेक्टर ( परावर्तक) , सोलर बिल्कर, रम्बल स्ट्रीप लावण्यात येत आहेत.

मागील आठवड्यात या महामार्गावरील तीन अपघात त्या ठिकाणी मार्गदर्शक फलक असले असते तर टळले असते असे समितीचे म्हणने आहे. अनेक ठिकाणी काम चालू आहे, तर काही ठिकाणी अचानक एकेरी वाहतूक चालू होत आहे. मात्र तसे फलक नसल्याने अपघात होत आहेत. शिमग्यामुळे रस्तावर वर्दळ वाढली व लवकर पोहचण्याच्या प्रयत्नात चालक गाड्या बेदारकरपणे वेगात चालवतात व एकेरी मार्ग व दिशा परावर्तनाचे फलक नसल्याने त्याचे पर्यावसन अपघातात होते आहे त्यामुळे समितीने वाहन चालकांना सावकाश व सावधगिरीने वाहने चालवा असे आवाहन केले आहे.

 

 

Loading

नागपूर पत्रादेवी शक्तीपीठ एक्सप्रेसवेला कोकणातूनही विरोध

महामार्गामुळे पन्नास टक्के वन्यजीव विस्थापित होणार असून धन दांडग्यांच्या घशात खाजगी जमिनी घालण्यासाठी या विनाशकारी प्रकल्पचे प्लॅनिंग केले जात असल्याचा वनशक्ती संस्थेचा आरोप. 
   Follow us on        
सावंतवाडी: नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला पश्चिम महाराष्ट्रातून शेतकऱ्यांचा विरोध होत आहे.  या महामार्गामुळे येथील अल्पभूधारक भमिहीन होतील तसेच महामार्ग झाल्यास पुराचा धोका वाढेल अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. म्हणून तेथील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. आता तर कोकणातही या महामार्गास विरोध होण्यास सुरवात झाली आहे. 
या महामार्गाची गरज नसताना हा महामार्ग कोकणावर लादला जात आहे. हा महामार्ग ज्या भागातून जाणार त्या भागातील निसर्गाला मोठी हानी पोचणार आहे. त्यामुळे आम्ही विरोध करणार आहोत असे येथील वनशक्ती संस्थेने जाहीर केले आहे  
सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील गावातून हा मार्ग जात असल्याने या दोन्ही तालुक्यांसाठी हा महामार्ग विनाशकारी ठरणार आहे. त्यामुळे गरज नसलेल्या या महामार्गाविरोधात न्यायालयात आव्हान देणार आहे. या महामार्गामुळे पन्नास टक्के वन्यजीव विस्थापित होणार असून धन दांडग्यांच्या घशात खाजगी जमिनी घालण्यासाठी या विनाशकारी प्रकल्पचे प्लॅनिंग केले गेले आहे. त्यामुळे कोकणाला गुलामगिरीमध्ये आणायचं का? हा विचार करून येथील जनतेने याला विरोध केला पाहिजे, असे वनशक्ती संस्थेच्या स्टॅलिन दयानंद पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search