



रत्नागिरी: गोवा सरकारने महाकुंभ मेळ्यासाठी चालविलेल्या विशेष गाडीला तुफान प्रतिसाद मिळाला असून गाडीच्या एकूण क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी झाल्याने या गाडीला मोठी गर्दी झाली होती. या गर्दीमुळे अनेक प्रवाशांना नाईलाजाने आपला प्रवास अर्धवट सोडून परत माघारी फिरावे लागले असल्याची बातमी समोर आली आहे.
गोवा सरकारने गोव्यातील भाविकांनी महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराज येथे जाणे सुलभ व्हावे यासाठी विशेष सवलत देवून या मार्गावर गाड्या चालविल्या आहेत. प्रवाशांसाठी प्रवासादरम्यान मोफत जेवण आणि इतर सवलती देण्यात आल्या आहेत. या प्रवासाकरिता सरकारने पास वितरित केले होते. मात्र पासधारकां व्यतिरिक्त किमान ४०० अतिरिक्त प्रवासी या गाडीतून प्रवास करत होते. या अतिरिक्त प्रवाशांमुळे गोवा सरकारने देवू केलेल्या सवलतींवर म्हणजे जेवण आणि इतर गोष्टींवर परिणाम झाला. कारण या गोष्टी फक्त पास धारकांपुरत्या उपलब्ध करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रशासनावर ताण आला.
दुसरी गोष्ट म्हणजे पास धारक आणि बिनापासधारक प्रवाशांमध्ये जागेसाठी खटके उडू लागले. रेल्वे खचाखच भरल्याने पाय ठेवण्यासही जागा नव्हती. पास असलेल्यांची चांगली सोय झाली. रात्रीच्या जेवणाची त्यांची सोय झाली. मात्र पास नसलेल्यांना हातपाय पसरू देण्यास इतर प्रवाशांनी नकार देणे सुरू केले. प्रवास हा ६-७ तासांचा नव्हे, तर तब्बल ३६ तासांचा असल्याने प्रत्येकाला व्यवस्थितपणे, सुखकर पद्धतीने प्रवास करायचा होता. त्यांना हे आगंतुक प्रवासी नकोसे झाले होते. त्यामुळे काहींचे खटके उडणे गोवा ते रत्नागिरी प्रवासादरम्यानच सुरू झाले. कंटाळून काही प्रवाशांनी रेल्वे पाण्यासाठी आणि चालक, कर्मचारी बदलासाठी रत्नागिरी येथे थांबवली गेली, तेव्हा तेथे शंभरेक जणांनी उतरून गोव्यात परतीचा मार्ग पत्करणे सोयीस्कर मानले, असे अनेकजण आज सकाळी प्रयागराजऐवजी ते घरी परतले.