Category Archives: मुंबई
मुंबई दि.१५ एप्रिल :लोकसभा निवडणूक ऐन उन्हाळी सुट्टीत आली़ असल्याने मुंबई पुण्यातील राजकारण्यांची चिंता वाढली आहे. मुंबई पुण्यातून लाखो चाकरमानी निवडणुकीच्या काळात गावी जाणार असल्यामुळे नेते, कार्यकर्ते यांची धास्ती वाढली आहे.
आतापासूनच पुढे मे अखेरपर्यंत मेल-एक्स्प्रेस आणि खाजगी ट्रॅव्हल्सचे तिकीट आरक्षण फुल्ल झाले आहे. रेल्वेच्या अतिरिक्त गाड्याही फुल्ल झाल्या आहेत.
मुंबईत दिनांक 20 मे रोजी मतदान आहे. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली बदलापुर तसेच वसई विरार येथे मोठया प्रमाणात कोकणातील चाकरमानी वास्तव्यास आहे. कोकणातील आंबे फणस चाखण्यासाठी तसेच उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात आपल्या गावी जातात. यंदा लोकसभा निवडणुक असल्याने चाकरमानी गावी जाणार नाहीत आणि येथेच राहून आपले कर्तव्य पार पाडणार असे वाटत होते. रेल्वे, एसटी खाजगी वाहनांच्या आरक्षणाची स्थिती पाहता यंदाही मोठ्या प्रमाणात चाकरमानी उन्हाळी सुट्टीत गावीच जाणार असल्याचे दिसत आहे. 20 मेपर्यंत तरी चाकरमानी परततील की नाही या या विचाराने राजकारण्यांना चैन पडेनाशी झाली आहे.
कोकणात जाणाऱ्या खासगी बसगाड्यांचा प्रवाशाचा ओघ पाहता १,२०० रुपयाच्या तिकीटदरात ३०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. १५ एप्रिल ते १५ मे या महिनाभराच्या काळात किमान ५ लाखांहून अधिक चाकरमानी गावाकडे जाणार असल्याचा अंदाज वाहतूक एजन्सीकडून व्यक्त करण्यात आला आहे यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होणार हे निश्चित आहे. २०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत ४० आणि ४५ टक्क्यांवर अडकलेली लोकसभा मतदानाची टक्केवारी यंदाही तशीच राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मुंबई दि. २९:कोकण रेल्वे मार्गावर चालू करण्यात आलेल्या मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.या गाडीच्या तिकिटांच्या आरक्षणाची प्रतीक्षा यादीही दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसत आहे. त्यामुळे या गाडीचे डबे वाढविण्यात यावे अशी मागणी कोकण विकास समितीतर्फे करण्यात आली आहे.
मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसचा सध्या चालविण्यात येणारा रेक आठ डब्यांचा आहे. देशात सुरु करण्यात आलेल्या यशस्वी वंदे भारत एक्सप्रेस मध्ये तिची गणना केली जात आहे. ही गाडी सातत्याने सुमारे ९५% क्षमतेने Occupancy धावत आहे. या गाडीच्या तिकिटांच्या आरक्षणाची प्रतीक्षा यादीच या गाडीला असलेली लोकप्रियता दाखवून देत आहे. तथापि, मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाल्याने अनेक प्रवासांचा हिरमोड होत आहे.
या मार्गावरील प्रवासाची उच्च मागणी लक्षात घेता, या समस्येवर त्वरित लक्ष देणे अत्यावश्यक आहे असे आम्हाला वाटते. त्यामुळे, आम्ही रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वेला विनंती करू इच्छितो की, मुंबई गोवा वंदे भारत एक्स्प्रेसची 16 डब्यांची रेक तैनात करून डब्यांची क्षमता वाढविण्याचा विचार करावा.
अधिक प्रवाशांना सामावून घेण्यासाठी ट्रेनची क्षमता वाढवल्याने सध्याची सीटची कमतरता तर दूर होईलच पण एकूण प्रवासाचा अनुभवही वाढेल. शिवाय, ते मुंबई आणि गोवा दरम्यान कार्यक्षम आणि आरामदायी वाहतूक पर्यायांची वाढती मागणी पूर्ण करता येईल. आम्ही तुम्हाला विनंती करतो की या प्रस्तावाचा अनुकूलपणे विचार करा आणि लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक पावले उचला. आगामी उन्हाळी हंगाम लक्षात घेऊन हा बदल करण्यात यावा अशी मागणी कोकण विकास समिती तर्फे करण्यात आली आहे. कोकण विकास समितीचे जयवंत शंकर दरेकर यांनी ईमेलद्वारे रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वेला केली आहे.

नवी मुंबई:रविवारी होळीच्या दिवशी कोकणातून आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. कोकणातून ३०६८१ पेट्या व इतर राज्यातून ६०५७ अशा एकूण ३६ हजार ७३८ पेट्या आंब्याची आवक झाली आहे. होळी व धूलिवंदनला सर्व बाजारपेठा बंद असताना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ मार्केट रविवारी होळीच्या दिवशी सुरू ठेवले होते. दिवसभरात ३६ हजार पेट्या आंब्याची आवक झाली.
सलग दोन दिवस मार्केट बंद राहिल्यामुळे आंब्याचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे बाजार समिती प्रशासनाने रविवारी व्यापार सुरू ठेवण्यास परवानगी दिली हाेती.
हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने त्याच्या दरात पण घसरण होताना दिसत आहे. होलसेल मार्केट मध्ये हापूस ३०० ते ८०० रुपये डझन तर किरकोळ मार्केट मध्ये ६०० ते १५०० रुपये डझन दराने विकला जात आहे.
मुंबई, दि. १६ फेब्रु. :मुंबईतील आठ रेल्वे स्थानकाची जुनी ब्रिटिशकालीन नावे बदलून अस्सल मराठी नावे देण्याचा प्रस्ताव नुकताच मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयाचे स्वागत सर्व जनतेकडून होत असले तरी यातील दोन स्थानकाच्या नावाबद्दल मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.
यातील पहिले स्थानक आहे ते किंग्ज सर्कल. या स्थानकाचे नाव तीर्थंकर पार्श्वनाथ असे नामकरण होणार आहे. मात्र मराठी एकीकरण कृती समितीने याला विरोध दर्शविला आहे. तीर्थंकर पार्श्वनाथ हे अनेकांना माहिती नाहीत त्यामुळे या नावाला विरोध आहे.तीर्थंकर पार्श्वनाथ हे मराठी नाव नसल्याने या नावावर या समितीने आक्षेप घेतला आहे.
मुंबई सेंट्रलचे नाव नाना जगनाथ शंकर शेठ असे होणार आहे. या नावाला विरोध नाही पण या नावात ‘मुंबई’ हा शब्द कायम ठेवावा अशी मागणी संयुक्त महाराष्ट्र लढा स्मृती मंडळाचे अध्यक्ष भाऊ सावंत यांनी केली आहे यासाठी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचेही म्हणाले आहेत.
पनवेल रेल्वे स्थानकावर सायंकाळच्या वेळेला नोकरदार वर्गाची पादचारी पूल ओलांडण्यासाठी मोठी गर्दी होते. pic.twitter.com/3aQCT9xsMz
— Chaitanya S. Sudame (@SudameChaitanya) March 14, 2024
मुंबई: मुंबईतील ब्रिटिश कालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यासंबधी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.
कोणत्या स्टेशनची नावे बदलणार?
करीरोडचं नाव – लालबाग
सॅण्सरोडचं – डोंगरी,
मरीनलाईन्सचं – मुंबादेवी
डॉकयार्डचं – माझगाव स्टेशन
चर्नीरोडचं नाव – गिरगाव,
कॉर्टन ग्रीन – काळाचौकी आणि
किंग्ज सर्कलचं – तिर्थकर पार्श्वनाथ
अशी नावे करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. ही नावे बदलण्याचा अधिकार राज्याला आहे असेही शेवाळे यांनी यावेळी नमूद केलं. तर मुंबई सेंट्रलचे नाव नाना जगनाथ शंकर शेठ हे ठेवण्यात यावं असा प्रस्ताव देखील केंद्राला देण्यात आला आहे असेही त्यांनी सांगितलं.
ही नावं लवकरात लवकर बदलण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत बैठक घेणार आहेत. तसेच ज्या ज्या मागण्या आल्या आहेत त्यानुसार त्या नावांमध्ये बदल करण्यात येईल असेही शेवाळे यांनी यावेळी सांगितले.










