मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ज्या अटल सेतुचे उद्घाटन करण्यात आले त्या रस्त्याला अवघ्या तीन महिन्यातच भेगा पडल्या आहेत. नवी मुंबईकडील एका भागात अर्धा किलोमीटरपर्यंत रस्ता एक फुट खाली खचला आहे. महायुती सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर अटल सेतुची पाहणी करून रस्त्याला भेगा पडल्याचे निदर्शनास आणून दिले. शिवडी न्हावा शेवा प्रकल्पावर राज्य सरकारने १८ हजार कोटी रुपये खर्च केला असून यासाठी बँकेकडून कर्ज काढले आहे. हा काही विकास नाही तर भ्रष्टाचार असून सरकार स्वतःची घरे भरत आहे आणि जनतेच्या जीवाशी खेळत आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव या प्रकल्पाला दिले आहे, त्यांच्या नावाने भ्रष्टाचार करणे हे दुर्भाग्यपूर्ण आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले, उद्घाटनाआधी त्यांनी या प्रकल्पाची व्यवस्थित पाहणी तरी करायला हवी होती. पण नरेंद्र मोदी हेच देशातील भ्रष्टाचाराचे सरदार आहे. सर्व भ्रष्टाचाऱ्यांना ईडी, सीबीआयचा धाक दाखवून भाजपात घेऊन मंत्री बनवतात, असा आरोप पटोले यांनी केला आहे.
भाजपाचे म्हणणे काय?
नाना पटोले यांच्या आरोपांना भाजपच्या वतीने देखील प्रत्युत्तर देण्यात आले असून हा रस्ता अटल सेतू नसून त्याला जोडणारा मार्ग असल्याचे भाजपने म्हटले आहे. तसेच पडलेल्या भेगा या तांत्रिक त्रूटीमुळे पडलेल्या नसल्याचेही भाजपने म्हटले आहे.