मुंबई, दि. १६ फेब्रु. :मुंबईतील आठ रेल्वे स्थानकाची जुनी ब्रिटिशकालीन नावे बदलून अस्सल मराठी नावे देण्याचा प्रस्ताव नुकताच मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयाचे स्वागत सर्व जनतेकडून होत असले तरी यातील दोन स्थानकाच्या नावाबद्दल मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.
यातील पहिले स्थानक आहे ते किंग्ज सर्कल. या स्थानकाचे नाव तीर्थंकर पार्श्वनाथ असे नामकरण होणार आहे. मात्र मराठी एकीकरण कृती समितीने याला विरोध दर्शविला आहे. तीर्थंकर पार्श्वनाथ हे अनेकांना माहिती नाहीत त्यामुळे या नावाला विरोध आहे.तीर्थंकर पार्श्वनाथ हे मराठी नाव नसल्याने या नावावर या समितीने आक्षेप घेतला आहे.
मुंबई सेंट्रलचे नाव नाना जगनाथ शंकर शेठ असे होणार आहे. या नावाला विरोध नाही पण या नावात ‘मुंबई’ हा शब्द कायम ठेवावा अशी मागणी संयुक्त महाराष्ट्र लढा स्मृती मंडळाचे अध्यक्ष भाऊ सावंत यांनी केली आहे यासाठी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचेही म्हणाले आहेत.
पनवेल : पनवेल स्थानक गर्दीचे स्थानक बनले आहे. या रेल्वेस्थानकात कधीही दुर्घटना घडू शकते अशी स्थिती निर्माण झाली आहे. हे वास्तव सध्या पनवेलच्या रेल्वे स्थानकामधील आहे. प्रवाशांना दररोज जिवमुठीत घेऊन या पादचारी पुलावरुन जावे लागते. गावी जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांसाठी आणि लोकलसाठी येथे वापरात असलेल्या पादचारी पुलांचे योग्य नियोजन केलेले नसल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन चेंगरा चेंगरी होण्याचा धोका आहे.
पनवेल रेल्वेस्थानक हे जंक्शन होत आहे. दररोज या स्थानकातून सूमारे सव्वा लाख प्रवासी प्रवास करतात. यातील पन्नास हजार प्रवासी नवीन पनवेल परिसरातून मुंबई, ठाणे व इतर उपनगरीय रेल्वे गाड्या पकडण्यासाठी या पादचारी पुलाचा वापर करतात. नवीन पनवेल व रेल्वेस्थानक जोडण्यासाठी सध्या हाच एक पुल प्रवाशांसाठी शिल्लक आहे. सध्या स्थानकात विस्तारीकरणाचे काम सूरु आहे. प्रवाशांना दररोज जिवमुठीत घेऊन या पादचारी पुलावरुन जावे लागते. एक्सप्रेसमधून उतरणा-या प्रवाशांना गर्दीतून पाठीवरील बोजा घेऊन मार्ग काढावा लागतो. या गर्दीचा भयानक अनुभव सध्या पनवेलचे रेल्वे प्रवासी घेत आहेत. पादचारी पुलावरील ही गर्दी टाळण्यासाठी हताश झालेल्या प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडून बेकायदा व जिवघेणा प्रवास करत आहेत.
अशा वेळी दुर्घटना होण्याची शक्यता
पनवेल स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांसाठी सध्या ३ प्लॅटफॉर्म आहेत. कोणत्याही गाडीसाठी निश्चित असा प्लॅटफॉर्म नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. कित्येक प्रवासी बाहेरच्या प्लॅटफॉर्मवर किंवा पादचारी पुलावर गाडी येण्याची वाट पाहत असतात. अशा वेळी अचानक गाडीची घोषणा झाल्यावर चेंगरा चेंगरी होऊन दुर्घटना घडण्याची मोठी शक्यता आहे.
पनवेल रेल्वे स्थानकावर सायंकाळच्या वेळेला नोकरदार वर्गाची पादचारी पूल ओलांडण्यासाठी मोठी गर्दी होते. pic.twitter.com/3aQCT9xsMz
मुंबई: मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर शहर महापालिका, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ नगर परिषद आणि कुळगाव -बदलापूर नगर परिषद यांची संयुक्त परिवहन सेवा स्थापन करण्याचा निर्णय बुधवारी राज्य सरकारने घेतला.
संयुक्त परिवहन सेवेद्वारे मुंबई महानगर परिसरासाठी रेल्वे व्यतिरिक्त आणखी एक सक्षम सार्वजनिक वाहतूक पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्राच्या नजिक असलेली भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ नगर परिषद आणि कुळगांव बदलापूर नगर परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिवहन सेवा पूर्ण क्षमतेने चालत नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे या क्षेत्रांत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमांमार्फत बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात होती.
या संयुक्त परिवहन सेवेकरिता कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये शहाड येथे संयुक्त परिवहन उपक्रमाच्या प्रशासकीय कार्यालयासाठी परिवहन भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्युत बस प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षणावर शासनाचा भर आहे. या परिवहन सेवेत नव्या विद्युत बसगाडयांचा समावेश करण्यात येणार असल्याने शहरामधील हवा प्रदूषणाची पातळी नियंत्रित करणे किंवा कमी करणे शक्य होईल.
मुंबई: मुंबईतील ब्रिटिश कालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यासंबधी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.
कोणत्या स्टेशनची नावे बदलणार?
करीरोडचं नाव – लालबाग
सॅण्सरोडचं – डोंगरी,
मरीनलाईन्सचं – मुंबादेवी
डॉकयार्डचं – माझगाव स्टेशन
चर्नीरोडचं नाव – गिरगाव,
कॉर्टन ग्रीन – काळाचौकी आणि
किंग्ज सर्कलचं – तिर्थकर पार्श्वनाथ
अशी नावे करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. ही नावे बदलण्याचा अधिकार राज्याला आहे असेही शेवाळे यांनी यावेळी नमूद केलं. तर मुंबई सेंट्रलचे नाव नाना जगनाथ शंकर शेठ हे ठेवण्यात यावं असा प्रस्ताव देखील केंद्राला देण्यात आला आहे असेही त्यांनी सांगितलं.
ही नावं लवकरात लवकर बदलण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत बैठक घेणार आहेत. तसेच ज्या ज्या मागण्या आल्या आहेत त्यानुसार त्या नावांमध्ये बदल करण्यात येईल असेही शेवाळे यांनी यावेळी सांगितले.
नवी मुंबई : रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हय़ात दिवसा उन्हाचा ताप जाणवत आहे. त्यामुळे आंबा काढणीयोग्य झालेला आहे. दोन्ही जिल्ह्यांतून दिवसाला १४ हजार पेट्या वाशी बाजार समितीमध्ये पाठविल्या जात आहेत. आवक स्थिर असल्यामुळे पेटीचे दर २ हजारांपासून ५ हजार रुपयांपर्यंत आहेत.
पहिल्या पंधरवड्यात पेट्यांची संख्या कमी होती; मात्र त्यानंतर त्यात वाढ होऊ लागली. मार्चच्या सुरवातीला उन्हाचा कडाका जाणवू लागल्यानंतर फळे तयार होण्याचा वेगही वाढला.
पहिल्या टप्प्यातील उत्पादन मार्चअखेरपर्यंत राहील, असे बागायतदारांचे म्हणणे आहे. एप्रिल महिन्यात काही दिवस पेट्यांची संख्या कमी राहील. पुन्हा काही दिवस आंबा मिळेल, पण ते प्रमाणही तुलनेत कमी राहील. गेल्या काही दिवसांत पुन्हा झाडांना मोहोर येऊ लागला आहे. त्यामधून प्रत्यक्ष उत्पादन मे महिन्याच्या अखेरीस मिळेल, असा बागायतदारांचा अंदाज आहे.
मुंबई: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सध्याच्या मुंबई – मडगाव एक्सप्रेसला प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून ही एक्सपेस अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. दुसऱ्या बाजूला मडगाव ते मंगुळुरु या मार्गावर दुसरी वंदे भारत एक्सपेस हल्लीच सुरु झाली असून कोकण रेल्वेच्या पूर्ण पट्ट्यात वंदे भारत एक्सप्रेस ची सेवा सुरु झाली आहे. मात्र दक्षिणेकडील एका खासदाराने रेल्वे मंगुळुरु ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात यावी अशी पत्राद्वारे मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण झाल्यास लवकरच मुंबई ते कोकण रेल्वे मार्गावर दोन एक्सप्रेस धावताना दिसतील.
दक्षिण कन्नडचे खासदार नलीन कुमार कटील यांनी ही मागणी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना केली आहे. कोकण रेल्वे सुरु झाल्यापासून मंगुळुरु ते मुंबई हे अंतर दिवसात (१२ तासात) गाठेल अशी एक्सप्रेस मिळावी असे आमचे स्वप्न होते. आता ते स्वप्न पूर्ण करेल अशी अतिजलद गाडी वंदे भारत आता मुंबई ते मडगाव तसेच दुसरी गाडी मडगाव ते मंगळुरु या मार्गावर चालविण्यात येत आहे. मात्र मुंबई ते मंगुळुरु अशा अखंड गाडीची सर्वात जास्त गरज आहे. अशी गाडी चालू झाल्यास दक्षिणेकडील प्रवाशांना दिवसात मुंबई गाठणे सोपे होईल असे खासदार नलीन कुमार कटील यांनी या पत्रात म्हंटले आहे.
याशिवाय त्यांनी रेल्वेस याबाबत २ पर्याय असल्याचे निदर्शनास आणूनही दिले आहे. त्यातील पहिला पर्याय म्हणजे सध्या मुंबई ते मडगाव दरम्यान चालविण्यात येणारी वंदे भारत एक्सप्रेस क्रमांक २२२२९/३० जी आठ डब्यांची चालविण्यात येत आहे ती १६ डब्यांची करून तिचा विस्तार मंगुळुरु पर्यंत करण्यात यावा. जर या गाडीचा मंगुळुरुपर्यंत विस्तार करण्यात काही अडचणी असतील दुसरा पर्याय म्हणजे सध्या मंगुळुरु ते मडगाव दरम्यान चालविण्यात येणारी वंदे भारत एक्सप्रेस क्रमांक २०६४५/४६ या गाडीचा मुंबई पर्यंत विस्तार करण्यात यावा. डब्यांची संख्या तीच ठेवून आठवड्यातून ३ दिवस ही गाडी चालविण्यात यावी असे त्यांनी या आपल्या मागणीत म्हंटले आहे.
खासदार साहेबाची ही मागणी पूर्ण झाली तर लवकरच मुंबई ते कोकण २ वंदे भारत एक्सप्रेस धावताना दिसतील हे मात्र नक्की
नवी मुंबई : रविवारी होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनसाठी शनिवारी रात्री ११ ते रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत अशा एकूण दहा तासांसाठी न्हावा – शिवडी सागरी अटल सेतूवरून अत्यावश्यक वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असल्याची माहिती नवी मुंबई वाहतूक विभागाने अधिसूचना काढून दिली आहे.
त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. यामध्ये पुण्यातून द्रुतगती आणि जुन्या महामार्गावरून मुंबईकडे येणारी वाहने गव्हाण फाटा मार्गे बेलापूर- वाशी मुंबई अशी तर जेएनपीटी आणि उरणहून मुंबईत जाणारी वाहनेही गव्हाण फाटामार्गे वाशी या मार्गाने वळविण्यात आली आहेत.
या वर्षीची मॅरेथॉन ही पहिल्यांदाच नागरिकांचे आकर्षण ठरलेल्या अटल सेतूवर आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई ते चिर्लेदरम्यान मॅरेथॉन होणार आहे. यासाठी ‘एमएमआरडीए’कडून वाहतूक विभागाकडे हा मार्ग बंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही प्रवेशबंदी जाहीर करणारी सूचना नवी मुंबई वाहतूक पोलीस आयुक्त तिरुपती काकडे यांनी काढली असल्याची माहिती न्हावाशेवा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. बी. मुजावर यांनी दिली आहे.
नवी मुंबई: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) अर्थात अटल सेतूवर प्रवास करत असताना तुम्ही पिकनिक च्या मूड मध्ये असाल आणि सेल्फी काढण्यासाठी गाडी थांबवत असाल तर सावधान! कारण या सेतूवर असे केल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार आता पर्यंत सेल्फी घेण्यासाठी थांबल्याबद्दल नवी मुंबई आणि मुंबई पोलिसांनी एकत्रितपणे एका महिन्यात 1,612 लोकांना दंड ठोठावला आहे.
21.8 किमी सागरी पुलावर थांबणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली असताना, वाहन थांबल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये या साठी हा दंड आकारण्यात येत आहे.
नवी मुंबई पोलिसांनी 1,387 जणांना तर मुंबई पोलिसांनी 225 जणांना दंड ठोठावला आहे. नवी मुंबई पोलिसांनी 10.99 लाख रुपये एवढा दंड वसूल केला तर मुंबई पोलिसांनी ₹1.12 लाख एवढी रक्कम या दंडाद्वारे वसूल केली आहे.
अनेक वाहनधारक आपली वाहने कडेला थांबवून सेल्फी घेत वेळ घालवत असत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे. या साठी मुंबई पोलिस आणि नवी मुंबई पोलीसांनी ही मोहीम चालवली आहे. मात्र संपूर्ण 22 किमी लांबीच्या पुलावर गस्त घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
Konkan Railway News:मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथील कोचिंग यार्डमध्ये पायभूत सुविधा उभारण्यासाठी आजपासून पुढील सात दिवस १८ फेबुवारी २०२४ पर्यत दररोज मध्यरात्रीपासून ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे एलटीटी स्थानक येणाऱ्या आणि सुटणाऱ्या अनेक मेल- एक्सप्रेस गाड्यांचा वेळात बदल करण्यात आलेला आहे.
या ब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तब्बल आठ गाड्यांच्या वेळापत्रकावर, आरंभ आणि अंतिम स्थानकांमध्ये बदल होणार आहे. या बाबत रेल्वे प्रशासनाने दिलेली सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे .
1)Train no. 22116 Karmali – Lokmanya Tilak (T) Express गुरुवार दिनांक 15/02/2024 या दिवशी प्रवास सुरू करणार्या या गाडीचा प्रवास ठाणे स्थानकापर्यंत मर्यादित करण्यात आला आहे. ही गाडी पुढे लोकमान्य टिळक टर्मिनसला जाणार नाही.
MTHL News: नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या आणि देशातील सर्वात लांब सागरी सेतू म्हणुन ओळखल्या जाणार्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर MHTL (अटल सेतू) वर बेस्ट BEST आता प्रीमियम बस सेवा सुरु करणार आहे.
ही प्रीमियम बस कोकण भवन, बेलापूर ते वर्ल्ड ट्रेड सेंटर दरम्यान चालविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बसला S-145 असा नंबर देण्यात आला असून तिचे साई संगम, तारघर, उल्वे नोड, आई तरुमाता, कामधेनु ओकलैंड्स, एमटीएचएल, ईस्टर्न मोटरवे, सीएसएमटी, चर्चगेट स्टेशन और कफ परेड हे स्टॉप असतिल.चलो अॅपद्वारे (Chalo App) या बसमध्ये आसन आरक्षित केल्या जाऊ शकतील.
सकाळी बेलापूर ते वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि दुपारी दोन वाजता वर्ल्ड ट्रेड सेंटर ते बेलापूर अशा दोन सेवा सुरुवातीला चालविण्यात येतील. ही बस सेवा प्रीमियम बस सेवा असणार आहे. या बसचे तिकीट दर जाहीर केले नाही आहेत.
या प्रीमियम बससेवे नंतर लवकरच सामान्य बस सुद्धा या मार्गावर चालविण्यात येणार आहेत. सार्वजनिक वाहनांचा टोल भार सरकार सहन करत असल्याने त्याचा परिणाम तिकिट दरात होणार नसल्याने या सामान्य बस चा तिकीटदर ईतर बस प्रमाणे असतिल असे बेस्ट च्या अधिकार्यांनी सांगितले आहे.