Category Archives: सिंधुदुर्ग

अपघाताला आमंत्रण! आंबोली घाटात दरड कोसळून तीन दिवस उलटले तरी ढिगारा तसाच

   Follow us on        

आंबोली: निसर्गसौंदर्याने नटलेल्या आंबोली घाटातील सनसेट पॉईंट परिसरामध्ये तीन दिवसांपूर्वी निसर्गाचा कोप पाहायला मिळाला. डोंगरकड्यावरून अचानक एक अजस्र कडा आणि सोबतीला मातीचा ढिगारा थेट मुख्य रस्त्यावर येऊन कोसळला. हा दगड अगदी रस्त्या कडेला असलेल्या चहाच्या टपरीच्या शेजारी पडल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. परंतु, या  घटनेला तीन दिवस उलटून गेले, तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासनाला ही दरड हटवण्यास वेळ मिळालेला नाही. प्रशासनाला पूर्वकल्पना देऊनही याकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

​सध्या हा भलामोठा दगड रस्त्याच्या कडेलाच असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. पावसाचा जोर आणि धुक्याचं साम्राज्य यामुळे रात्रीच्या वेळी समोरचा रस्ता स्पष्ट दिसत नाही, अशा वेळी एखादे वाहन या ढिगाऱ्यावर आदळून भीषण अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यात आंबोली घाटात दरडी कोसळण्याच्या घटना नव्या नाहीत, पण अशा संवेदनशील आणि धोकादायक ब्लॅक स्पॉटची वेळेत दखल न घेण्याच्या प्रशासकीय अनास्थेमुळे पर्यटक आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

​सध्या पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो पर्यटक दररोज आंबोलीत हजेरी लावत आहेत. जर मुख्य रस्त्यावरील हा अडथळा तातडीने दूर केला नाही, तर पर्यटकांच्या उत्साहावर विरजण पडू शकते आणि आंबोलीच्या पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे संबंधित विभागाने आता तरी सुस्तपणा झटकून हा रस्ता तातडीने मोकळा करावा आणि संपूर्ण घाटाची पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे.

​’लालपरी’ झाली जलपरी! चालत्या बसमध्ये छत्री उघडून बसण्याची प्रवाशांवर नामुष्की!

   Follow us on        

​सावंतवाडी:

“बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी) कारभार चौकुळ-कुंभवडे मार्गावर मात्र प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. या मार्गावर धावणारी एकमेव एसटी बस पूर्णपणे गळकी झाली असून, प्रत्येक पावसाळ्यात प्रवाशांना चक्क बसमध्ये बसूनही छत्र्या उघडाव्या लागत आहेत. या गंभीर समस्येमुळे हैराण झालेल्या उल्हास पनवेलकर, स्वरांगी गावडे, समिक्षा गावडे, कमलेशकुमार गावडे, सुनिता गावडे, कृष्णा गावडे, प्रकाश जाधव, राहुल चव्हाण, ऋतुराज गावडे, सुरेश गावडे आदी नागरिकांनी एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांकडे लेखी निवेदन देऊन ही बस तातडीने बदलण्याची मागणी केली आहे.

​या मार्गावरील एसटीवर विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि नोकरदार वर्ग रोजच्या प्रवासासाठी पूर्णपणे अवलंबून आहेत. मात्र, बसच्या छतातून पाणी गळत असल्याने प्रवाशांचे कपडे, विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य आणि नोकरदारांची महत्त्वाची कागदपत्रे भिजून नुकसान होत आहे. त्यामुळे हा प्रवास अत्यंत त्रासदायक आणि असुरक्षित बनला आहे. प्रवाशांनी लेखी निवेदन देऊनही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, ज्यामुळे स्थानिक प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.

​”महामंडळाकडे नवीन बसेस उपलब्ध आहेत, मग चौकुळ-कुंभवडे मार्गावरील प्रवाशांच्या नशिबीच ही गळकी बस का? ग्रामीण भागातील नागरिक एसटी प्रशासनासाठी दुय्यम आहेत का?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. महामंडळाने केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्षात सुरक्षित, स्वच्छ आणि सुस्थितीतील बस उपलब्ध करून देणे ही त्यांची जबाबदारी आहे, अन्यथा “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे ब्रीदवाक्य केवळ फलकापुरतेच उरेल, अशी टीकाही केली जात आहे. प्रशासन आता तरी खडबडून जागे होऊन चौकुळ-कुंभवडे मार्गावरील गळकी एसटी तातडीने बदलणार की प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सावंतवाडी टर्मिनस इमारत कामाची निविदा जारी; ईमेल मोहीम व कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या लढ्याला यश

   Follow us on        

सिंधुदुर्ग: सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजन सोहळ्याला तब्बल ११ वर्षे पूर्ण झाली, तरीही टर्मिनसची कामे रखडलेलीच होती. या अन्यायाविरुद्ध ‘कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी’ यांच्या वतीने नुकतीच एक व्यापक ईमेल मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आणि निर्माण झालेल्या दबावामुळे अवघ्या ५ दिवसांत रेल्वे प्रशासनाला जाग आली असून, सावंतवाडी टर्मिनस टप्पा-२ अंतर्गत रखडलेल्या मुख्य टर्मिनस इमारतीच्या कामाची अधिकृत निविदा (Tender) अखेर जारी करण्यात आली आहे.

१००० पेक्षा जास्त ईमेल आणि डिजिटल मीडियाचा खंबीर पाठिंबा

या मोहिमेदरम्यान कोकण रेल्वे महामंडळ, रेल्वे बोर्ड आणि राज्य शासनाला रखडलेल्या कामांच्या तपशिलासह तब्बल १००० पेक्षा जास्त ईमेल पाठवण्यात आले होते. या जनआंदोलनाला ‘दैनिक पुढारी’सह विविध वृत्तपत्रे आणि डिजिटल मीडियाने खंबीर साथ दिल्यामुळे शासन व प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आणि अखेर ही निविदा काढण्यात आली. टर्मिनस प्रेमींनी हा आपल्या सर्वांच्या एकजुटीचा आणि लढ्याचा विजय असल्याचे म्हटले आहे.

कोकणातील आमदारांना साकडे

सध्या राज्य शासनाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने, मुंबई आणि कोकणातील सर्व विधानसभा व विधानपरिषद आमदारांना संघटनेने भावनिक साकडे घातले आहे. राज्य शासनाच्या अधीन असलेल्या ‘तिलारी आंतरराज्य धरणातून पाणी पुरवठा योजना’ आणि ‘रत्नसिंधू समृद्धी योजनेतून’ होणाऱ्या सावंतवाडी टर्मिनसच्या कामांना या अधिवेशनात तातडीने मंजुरी मिळवून द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर आला असून दरवर्षी मुंबईहून गावी येणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासात मोठा त्रास सहन करावा लागतो. हा त्रास कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आताच ठोस पावले उचलावीत, असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटना आणि समस्त कोकणवासीयांनी केले आहे.

लढा अद्याप संपलेला नाही; प्रमुख मागण्या कायम

रेल्वेने केवळ इमारतीच्या कामाची निविदा काढली असली, तरी प्रवाशांच्या खऱ्या सोयीसाठी पुढील मागण्यांवर कोकण रेल्वे महामंडळाने त्वरित विचार करून निधीची तरतूद करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे:

प्लॅटफॉर्मवर संपूर्ण शेड: पावसाळी व उन्हाळी संरक्षणासाठी प्लॅटफॉर्मवर ‘संपूर्ण शेड’ उभारणे.

नवा प्लॅटफॉर्म: गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी ‘अजून एक नवीन प्लॅटफॉर्म’ तयार करणे.

अतिरिक्त रेल्वे रुळ: अतिरिक्त रेल्वे रुळांची (ट्रॅक) निर्मिती करणे.

या सर्व प्रमुख मागण्या आणि कामे मार्गी लावण्याचा लढा यापुढेही कायम राहील, असा निर्धार कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने व्यक्त केला आहे.

सिंधुदुर्गातील ६,७१० शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा; ५३.८३ कोटींची कर्जमाफी मंजूर

   Follow us on        

​सिंधुदुर्ग नगरी:

शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल ६ हजार ७१० शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. या सर्व पात्र शेतकऱ्यांना एकूण ५३ कोटी ८३ लाख २० हजार ४९१ रुपयांच्या कर्जमाफीचा मोठा लाभ मिळणार आहे. पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती शासनाच्या विशेष पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून, ही प्रक्रिया पूर्ण होताच पात्र लाभार्थ्यांची अधिकृत यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

​या कर्जमाफी योजनेमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४,००८ शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यांची २० कोटी ६९ लाख ५४ हजार रुपयांची कर्जमाफी होणार आहे. तर जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत, व्यापारी व ग्रामीण बँकांमधील २,७०२ शेतकऱ्यांना एकूण ३३ कोटी १३ लाख ६३ हजार ४९१ रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. याशिवाय, जे शेतकरी आपल्या कर्जाची नियमित परतफेड करतात, अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढील टप्प्यात ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार असून त्यासाठी स्वतंत्र पात्र यादी तयार केली जाणार आहे.

​दुसरीकडे, शासनाने निश्चित केलेल्या कालावधीपूर्वीची कर्जे असणे, तसेच काही कर्जदार विविध शासकीय किंवा इतर पदांवर कार्यरत असणे अशा विविध कारणांमुळे जिल्ह्यातील काही शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील थकीत कर्जखात्यांची माहिती शासकीय लेखापरीक्षकांकडून तपासण्यात आली आहे. सर्व माहिती पोर्टलवर अपलोड झाल्यानंतर शासनाकडून संगणकीय पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर ‘आधार प्रमाणीकरणासाठी’ पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. ही यादी निबंधक कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था आणि स्थानिक स्तरावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सेवा सुविधा केंद्रांमार्फत आपले आधार प्रमाणीकरण वेळेत पूर्ण करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आंबोलीत विजेच्या तारेचा धक्का लागून गाभण म्हशीसह रेडकाचा मृत्यू

   Follow us on        

आंबोली:

येथील मुळवंदवाडी भागात जमिनीवर पडलेल्या जिवंत विद्युत वाहिनीच्या (वीज तारेच्या) संपर्कात आल्याने एका गाभण म्हशीसह रेडकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मुळवंदवाडी येथील शेतकरी भिसाजी महादेव सरमळकर यांची गुरे शेतात चरण्यासाठी गेली असता हा अपघात झाला. या घटनेत शेतकरी सरमळकर यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुदैवाने, परिसरातील नागरिक गणपत गावडे यांनी प्रसंगावधान राखत इतर जनावरांना पुढे जाण्यापासून रोखल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.

​घटनेची माहिती मिळताच महावितरण आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. प्रशासनाच्या वतीने मृत गुरांचा रीतसर पंचनामा करण्यात आला असून, बाधित शेतकरी सरमळकर यांना नियमानुसार योग्य ती नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. पंचनामा पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याने गुरांचे मृतदेह ताब्यात घेतले. दरम्यान, आंबोलीतील नांगरतास भागात नव्याने बसविण्यात आलेले विद्युत पोल धोकादायक स्थितीत असल्याकडे स्थानिक नागरिकांनी लक्ष वेधले असून, पावसाळ्याचे दिवस असल्याने महावितरणने तातडीने उपाययोजना करून वीज वाहिन्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

कुडाळमध्ये बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

   Follow us on        

कुडाळ:

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ बाजारपेठेत वन्यजीवांच्या अवयवांची बेकायदेशीर खरेदी-विक्री आणि तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा वन विभागाने यशस्वी पर्दाफाश केला आहे. येथील प्रसिद्ध ‘मसुरकर जेम्स’ या दुकानावर वन विभागाच्या संयुक्त पथकाने अचानक छापा टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ३० जून २०२६ रोजी सावंतवाडीच्या वनक्षेत्रपालांना या बेकायदेशीर काळ्याबाजाराविषयी गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सावंतवाडी व कुडाळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन पंचांसमक्ष या दुकानाची अचानक झडती घेतली. या कारवाईदरम्यान दुकानातून अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बाबी उघडकीस आल्या.

​दुकानाच्या झडतीमध्ये वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या अनुसूची १ अन्वये अत्यंत संरक्षित असलेल्या बिबट्याची शिकार करून तयार केलेले अनेक अवयव हस्तगत करण्यात आले. यामध्ये बिबट्याची ६ अस्सल नखे, वन्यप्राण्यांच्या शिंगांपासून तयार केलेली ६ बनावट नखे, बिबट्यांच्या नखांचे इतर २० अवयव आणि बिबट्याचे २ सुळे (दात) यांचा समावेश आहे. शिकार करून हे अवयव केवळ विक्रीच्या उद्देशाने दुकानात बेकायदेशीरपणे बाळगण्यात आले होते. वनविभागाने हा सर्व मुद्देमाल जागीच जप्त केला आहे.

​या खळबळजनक प्रकरणातील मुख्य संशयित आणि दुकानाचा मालक अजित वसंत मसुरकर याला वन विभागाने तात्काळ अटक केली आहे. आरोपीने बिबट्याची नखे आणि अवयव विक्रीसाठी बाळगल्याचा गुन्हा मान्य केला आहे. त्याला कुडाळच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला २ दिवसांची वनकोठडी (Forest Custody) सुनावली आहे. ही धडक कारवाई सावंतवाडीचे उपवनसंरक्षक मिलीश शर्मा आणि कोल्हापूर दक्षता विभागाचे विभागीय वनाधिकारी संजय वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली, अशी माहिती कुडाळचे वनक्षेत्रपाल चेतन पाटील यांनी दिली.

शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी ‘अँग्री स्टॅक फार्मर आयडी’ काढणे बंधनकारक

   Follow us on        

सिंधुदर्गनगरी, दि. ३०:

केंद्र आणि राज्य शासनाच्या ‘अँग्रीस्टॅक डिजिटल कृषी मिशन’ अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा एक युनिक (स्वतंत्र) ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) तयार करण्याची विशेष मोहीम सध्या सिंधुदुर्ग जिल्हाभर राबविण्यात येत आहे. आगामी हंगामापासून शासकीय योजनांचे लाभ मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सर्व शेतकऱ्यांनी हा आयडी काढून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आंबा, काजू, भात, नारळ उत्पादक शेतकरी बांधवांनी, तसेच ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPCs) आणि महिला बचत गटांनी या मोहिमेत शासकीय यंत्रणेला सहकार्य करावे आणि गावातील १००% शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.

‘फार्मर आयडी’ शेतकऱ्यांसाठी का महत्त्वाचा आहे?

हा डिजिटल आयडी तयार केल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक शासकीय प्रक्रिया आणि योजनांचा लाभ मिळवणे अत्यंत सोपे होणार आहे:

सर्व योजना एकाच ठिकाणी: पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी यांसह शासनाच्या सर्व आर्थिक योजनांचा लाभ या एकाच आयडीच्या माध्यमातून थेट बँक खात्यात जमा होईल.

नोंदणी प्रक्रियेत सुलभता: पीक विमा, केसीसी (KCC) कर्ज, फळबाग अनुदान, तसेच कोकणातील विशेष आंबा-काजू प्रक्रिया योजनांसाठी लागणारी नोंदणी प्रक्रिया यामुळे अधिक सोपी होईल.

डिजिटल जोडणी: शेतकऱ्यांची ‘ई-पीक पाहणी’, ७/१२ (सातबारा) आणि ८अ चा उतारा ही सर्व महत्त्वाची कागदपत्रे या आयडीशी डिजिटली जोडली जाणार आहेत.

कागदपत्रांच्या कटकटीतून मुक्ती: एकदा हा आयडी तयार झाल्यानंतर, भविष्यात कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार कागदपत्रे सादर करण्याची गरज पडणार नाही.

कोकणासाठी विशेष लाभ: कोकणातील मुख्य पिके असलेल्या आंबा व काजू उत्पादकांसाठी येणाऱ्या विशेष योजनांचा लाभ थेट आणि गतीने मिळेल.

थेट नुकसान भरपाई: नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्यास, पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणारी मदत थेट आणि कोणत्याही विलंबाशिवाय प्राप्त होईल.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:

१. आधार कार्ड आणि आधार कार्डशी लिंक असलेला चालू मोबाईल नंबर.

२. जमिनीचा अद्ययावत ७/१२ आणि ८अ उतारा.

नोंदणी कुठे आणि कशी करावी?

शेतकऱ्यांना नोंदणीसाठी दोन सोपे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत:

सीएससी केंद्र: आपल्या गावातील जवळच्या ‘महा-ई-सेवा केंद्रात’ (CSC Center) जाऊन शेतकरी ही नोंदणी करू शकतात.

स्वयं-नोंदणी: शेतकरी स्वतः मोबाईल किंवा संगणकाच्या सहाय्याने https://agristack.gov.in या अधिकृत शासकीय पोर्टलला भेट देऊन आपली नोंदणी पूर्ण करू शकतात.

शासकीय योजनांचा लाभ अखंडित सुरू ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी विनाविलंब आपली नोंदणी पूर्ण करावी, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोकण-गोव्यातील पर्यावरणाच्या रक्षणासाठी १८ तरुणांची ‘राखणदार यात्रा’

   Follow us on        

दोडामार्ग:

विकासाच्या नावाखाली कोकण आणि गोवा भागातील जल, जंगल आणि जमिनीचा होत असलेला ऱ्हास आणि स्थानिक लोकसंस्कृती समूळ नष्ट करण्याचे चाललेले प्रयत्न याविरोधात जनजागृती करण्यासाठी नुकतीच ‘राखणदार यात्रा’ काढण्यात आली होती. निसर्ग आणि स्थानिक अस्तित्वाविषयी सजग असलेल्या १८ तरुणांनी १३ ते १६ जून या कालावधीत तब्बल १२० किलोमीटरची पायी पदयात्रा करत १२ गावांना भेटी दिल्या. या यात्रेच्या माध्यमातून निसर्गरक्षणाची प्रवृत्ती जागृत करणे आणि स्थानिकांच्या आर्थिक, सामाजिक व नैसर्गिक संसाधनांच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणणे हा मुख्य उद्देश होता, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते मल्हार इंदुलकर यांनी एका मुलाखती दरम्यान दिली.

​या यात्रेची सुरुवात कणकवली येथील कणकुंबीच्या माऊली देवी मंदिरापासून झाली. त्यानंतर केरी, विर्डी, कारापूर, दोडामार्ग, भेडशी, कुडासे, शिरवळ, झोळंबे, तांबोळी, बांदा आणि विलवडे अशा मार्गाने ही यात्रा पुढे गेली. म्हादाई नदीचे पात्र वळवण्याचे संकट, वन्यप्राण्यांसाठी संवेदनशील असलेल्या दोडामार्ग-सावंतवाडी पट्ट्यात चालणारे बेसुमार खाणकाम, रस्ते आणि रिसॉर्ट्ससाठी होणारी वृक्षतोड यांमुळे निर्माण झालेल्या पर्यावरणीय धोक्यांकडे या यात्रेच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले. उत्तर गोव्यातील कारापूर येथे स्थानिक मुणगेकर लोकांच्या जमिनी बळकावून चाललेल्या मोठ्या बांधकाम प्रकल्पाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनालाही या यात्रेने पाठिंबा दिला.

​या यात्रेला गावकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शिरवलसारख्या गावांनी आपल्या जमिनी बाहेरच्या लोकांना न विकण्याचा महत्त्वपूर्ण ठराव केला आहे. या मोहिमेत प्रसाद गावडे, अविनाश उषा वसंत, सत्यजित चव्हाण यांसारखे कार्यकर्ते पूर्णवेळ सहभागी होते. भांडवलदार आणि मोठ्या प्रकल्पांमुळे कोकणचा विनाश होऊ नये यासाठी हा लढा अधिक तीव्र केला जाणार असून, यात्रेच्या पुढील टप्प्यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावांमधील आंबा-काजू उत्पादक शेतकरी आणि मच्छिमारांच्या समस्यांवर काम केले जाईल, असा निर्धार यात्रेकरूंनी व्यक्त केला आहे.

बांदा: भर वस्तीत आढळले मगरीचे पिल्लू

   Follow us on        

बांदा, दि. ३०:

बांदा शहरात सोमवारी मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. या धुवाँधार पावसामुळे येथील बांदा सोसायटीसमोर उभ्या असलेल्या एका टेम्पोखाली मगरीचे पिल्लू आढळून आले. भर शहरात मगरीचे पिल्लू दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ओहोळात आलेल्या पाण्याच्या तीव्र प्रवाहाबरोबर हे मगरीचे पिल्लू थेट रस्त्यावर आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत या मगरीच्या पिल्लाला सुखरूप पकडले आणि तात्काळ वन विभागाच्या ताब्यात दिले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला सुरक्षितस्थळी हलवल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

​बांदा शहराच्या जवळून वाहणाऱ्या तेरेखोल नदीपात्रात मगरींचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. गेल्या दोन दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत मुसळधार पावसामुळे मगरी नदीपात्राबाहेर पडून मानवी वस्तीत शिरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सोमवारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. पावसाचे दिवस अजून पुढे असल्याने नदीकाठच्या आणि ओहोळाच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

सिंधुदुर्ग: कुडाळमध्ये ‘पुरुषांची वटपौर्णिमा’ उत्साहात साजरी

 

गेली १८ वर्ष अखंड जपली जातेय परंपरा

   Follow us on        

कुडाळ | प्रतिनिधी:स्त्री आणि पुरुष ही संसाराच्या रथाची दोन चाकं आहेत. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून, कधी मैत्रीण तर कधी कुटुंबाचा मुख्य आधार बनून अहोरात्र कष्ट करणाऱ्या पत्नीप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमध्ये एक अनोखा आणि कौतुकास्पद सोहळा पार पडला. कुडाळ मध्ये गवळदेव मंदिरात उमेश गाळवणकर मित्र मंडळ आणि  डॉ. संजय निगुडकर यांच्या मित्र परिवारातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही काल पुरुषांची वटपौर्णिमा अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.

विशेष म्हणजे, सामाजिक रूढी-परंपरांना नवा सकारात्मक दृष्टिकोन देणारे हे व्रत गेल्या १८ वर्षांपासून इथं अविरतपणे सुरू आहे.

आपल्या सुख-दुःखात सावलीसारखी सोबत देणाऱ्या पत्नीला दीर्घायुष्य लाभाव आणि ‘जन्मोजन्मी हीच पत्नी आपणास सहचारिणी म्हणून मिळावी’ या कृतज्ञतेपोटी आणि श्रद्धेपोटी या अनोख्या वटपौर्णिमेचे आयोजन करण्यात आल होत. सकाळी गवळदेव मंदिरात पुरोहितांच्या  मंत्रोच्चारात आणि उपस्थित पतींच्या शुभहस्ते वटवृक्षाची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर सर्व पुरुषांनी वडाला सात फेऱ्या मारून पत्नीच्या आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search