खेड : खेड तालुक्यातील सत्विणगाव येथे लागलेल्या वणवा विझवण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर ग्रामस्थांनी हल्ला केला. या हल्ल्यात २ कर्मचारी जखमी झाले आहेत.याप्रकरणी २० संशयितांविरोधात पोलीस व वनविभागाने दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
खेड तालुक्यातील सत्विणगाव येथील संरक्षित वनक्षेत्राच्या उत्तर दिशेच्या खाजगी मालकी क्षेत्रात वणवा लागल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. वनपाल खेड, वनरक्षक काडवली, वनरक्षक तळे, वनरक्षक खवटी व मौजे मोरवंडे चे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने वणवा विझवण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यावेळी मौजे दाभिळ, बैकरवाडी खेड येथील २० ते २५ जण घटनास्थळी आले. त्यांना हा वणवा वन कर्मचाऱ्यांनी लावला असल्याचा गैरसमज झाला. त्यांनी कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला.
निलेश फावरे (रा.दाभिळ, बैकरवाडी) व इतर २० जणांनी तळे वनरक्षक परमेश्वर नवनाथ डोईफोडे यांच्या डोक्यात काठीने मारून जखमी केले. वनरक्षक काडवली अशोक अजिनाथ ढाकणे यांनाही मारहाण केली. त्यांनी वनक्षेत्राच्या हद्दीखुणामध्ये बदल केला. दरम्यान, जखमी परमेश्वर डोईफोडे यांना कळंबणी उपजिल्हा रूग्णालयामध्ये दाखल केले आहे. या प्रकरणी संशयित आरोपी निलेश फावरे (रा . दाभिळ , बैकरवाडी), अरविंद फावरे (रा. दाभिळ, बैकरवाडी), धोंडु बैकर (रा . दाभिळ, बैकरवाडी) यांच्यासह २० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad