रत्नागिरी – राजापूर तालुक्यातील बारसू ग्रामस्थांनी सुरू केलेले रिफायनरीविरोधी आंदोलनामुळे येथील तणावपूर्ण वातावरण आहे. हा तणाव अजून वाढण्याची शक्यता आहे कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच दिवशी दि.६ मे रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
उद्धव ठाकरे बारसू ग्रामस्थांना भेटण्यासाठी येत असल्याने प्रशासनाकडून सुरू असलेल्या चर्चेला खीळ बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोणी अडवल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा ठाकरे शिवसेना गटाकडून दिला आहे.
तर राज ठाकरे यांचा रत्नागिरी दौरा पंधरा दिवस आधीच जाहीर झाला होता. ”जागा राखल्या नाहीत तर तुमचे अस्तित्व काय?” या शिर्षकाखाली त्यांची रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे सायंकाळी जाहीर सभा होणार आहे.
या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्यामुळे वातावरण तापाण्याची शक्यता आहे. ग्रामस्थ, प्रकल्पविरोधी संघटनांचे नेते चर्चेऐवजी पुन्हा संघर्ष हाती घेतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच या दौऱ्याबाबत प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दोन्ही नेत्यांचे दौरे होणार असल्याचे पोलिस यंत्रणेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे.