रत्नागिरी | प्रतिनिधी – राज ठाकरे यांची आज संध्याकाळी रत्नागिरी येथे सभा होती. बारसू रिफायनरी वरून जिल्ह्यातीलच नाही तर पूर्ण राज्यात वातावरण तापले असताना राज ठाकरे या संबधी कोणती भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांच्या पूर्ण भाषणात त्यांनी या प्रकल्पाला विरोध केल्याचे स्पष्ट झाले.
जमीन म्हणजे अस्तित्व; आपले अस्तित्व सांभाळा
भूमिपुत्राकडून मोठ्या प्रमाणात विकल्या जाणाऱ्या जमिनींबाबत त्यांनी रोष व्यक्त केला. जमीन असेल तर आपले अस्तित्व आहे; एकदा का जमीन गेली कि आपले कोकणातील अस्तिव संपले. पूर्वीपासून हेच सूत्र चालू आहे. भूगोल आणि इतिहास यांचा खूप मोठा संबंध आहे. ज्यांनी जमिनी (राज्य) पादाक्रांत केले त्यांनी इतिहास घडवला. मराठ्यांनी अगदी अटकेपार झेंडा रोवला होता. पण कोकणात खूप वाईट चित्र पाहावयास मिळते.जमिनी कवडीमोलाने विकल्या जातात, या जमिनी परप्रांतीय विकत घेऊन आपले राज्य निर्माण करत आहेत. काही दिवसांनी कोकणची भाषा आणि संस्कृती पण बदललेली असेल. कारण इथल्या स्थानिकांचे येथे अस्तित्वच नसेल. त्यामुळे आपल्या जमिनी विकू नका असे आवाहन राज ठाकरे यांनी या सभेत केले.
कोकणी जनतेला नेहमी गृहीत धरले जाते.
कोकणातील राजकारणात बदल दिसत नाही. नेहमी तेच तेच उमेदवार आणि पक्ष निवडून येताना दिसतात. भले त्यांनी येथील जनतेचे कल्याण करो व ना करो. त्यामुळे येथील राजकारणी येथील प्रश्नाबाबत गंभीर दिसत नाही. समृद्धी महामार्ग ४ वर्षात होतो पण मुंबई गोवा महामार्ग गेली १६ वर्ष रखडला आहे. यावरून येथील राजकारण्यांची उदासीनता दिसून येते. त्यामुळे निवडणुकीच्या वेळी कोकणवासीयांची या गोष्टी लक्षात घेऊनच नवा बदल घडवून आणला पाहिजे असे ते म्हणालेत,
कोकणचे लोक प्रतिभावंत
महाराष्ट्र राज्याला मिळालेल्या एकूण ८ भारतरत्न पुरस्कारापैकी ६ पुरस्कार कोकणातील लोकांना मिळाले आहे. कोकणात प्रतिभावंत लोक आहेत त्यांच्याकडून जमिनी विकून आपलेच नुकसान करून घेण्याची वृत्तीची अपेक्षा नाही असे ते पुढे म्हणाले.
कोकणातील पर्यटन
कोकणात पर्यटनाला भरपूर वाव आहे, केरळ आणि कोकण या दोन्ही भागातील निसर्गात समानता आहे. केरळ राज्याचा विकासाचा कणा पर्यटन होऊ शकते तर कोकणात पर्यटन सोडून अशा प्रकल्पाची काय गरज आहे? कोकणातील पर्यटनाचा विकास केला तर ते पूर्ण महाराष्ट्र पोसू शकते एवढा त्याला वाव आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कातळशिल्प आणि प्रकल्प
बारसू येथे कातळशिल्पे मोठ्या प्रमाणावर आहेत. यातील काही कातळशिल्पाची नोंदणी युनिस्को ने केली आहे . या कातळशिल्पावर पुढे युनिस्को संशोधन पण करणार आहे. युनेस्कोने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्याठिकाणी कातळशिल्पे आहेत त्या ठिकाणच्या ३ किलोमीटर परिघाच्या भागात कोणतीही विकासकामे किंवा प्रकल्प उभारला जाऊ शकत नाही मग रिफायनरी प्रकल्प कसा काय उभारला जात आहे असा प्रश्न त्यांनी केला.