सिंधुदुर्ग – तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्हयातील आंबोलीपासुन अवघ्या दहा कि. मी.अंतरावर असलेल्या चौकुळ या गावी सुमारे पन्नास ते सत्तर हजार वर्षापूर्वी तयार झालेले अशनी विवर सापडले आहे. सिंधुदुर्गातीलच नव्हे तर सर्व भारतीय भूवैज्ञानिक व पर्यटकांना उत्साह देणारे संशोधन नुकतेच झाले असुन याबाबत अधिक अभ्यास चालू आहे. या संशोधनास सर्व अभ्यासाअंती दुजोरा भेटल्यास कोकणातील पर्यटनाच्या शिरपेचात अजून एक मनाचा तुरा रोवला जाणार आहे आणि चौकुळ या गावाला आता ‘जागतिक भूवैज्ञानिक स्थळ’ म्हणून ओळखले जाणार आहे.
शिरूर(पुणे) येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे प्राध्यापक डाॕ.अतुल जेठे व प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी या येथील खमदादेव पठारावर भेट दिली असता पश्चिम घाटातील या पठारावर सुमारे पन्नास ते सत्तर हजार वर्षापूर्वी तयार झालेले अशनी विवर नजेरेला पडले.
या संदर्भात डाॕ. अतुल जेठे यांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे –
” चौकुळ येथील आज असलेल्या खमदादेव मंदिरापासुन पूर्वेकडे सुमारे ५००मीटर अंतरावर सुमारे पन्नास हजारहून अधिक वर्षापूर्वीआकाशातून एक पेटता अशनी येऊन येथील जांभ्या खडकाच्या कठीण पठारावर कोसळला व त्यामुळे वर्तुळाकार आकाराचे विवर तयार झाले. आज या विवरात काळसर -पिवळट रंगाची माती व त्यावर पावसाळ्यात उगवणारे गवत यांचे अस्तित्व आहे.पावसाळ्यात सर्वात जास्त म्हणजे ७२०से. मी. पेक्षा जास्त पाऊस पडणाऱ्या या विवराच्या ईशान्य दिशेकडून विवरातील पाणी वाहून जाते. या विवराचा पूर्व
-पश्चिम व्यास सुमारे १८०मीटर तर उत्तर-दक्षिण सुमारे २२० मीटर असुन विवराचा परिघ सुमारे ५२५ मीटर आहे.या विवराचा अधिक अभ्यास व संशोधन करण्यासाठी डाॕ. जेठे पावसाळ्यात पुन्हा भेट देणार आहेत.
या स्थळाला शासनाने ‘अति संवेदनाशील क्षेत्र (इको सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून संक्षित करावे अशी मागणी डाॕ. जेठे यांनी केली आहे.
भौगोलिक स्थान
या विवराचे पृथ्वीवरील भौगोलिक स्थान १५ अंश ५२ मिनिटे व ३९.५ सेकंद उत्तर अक्षवृत्त ते ७४अंश १ मिनिट ५४.५ सेकंद पूर रेखावृत्त असे आहे. समुद्र सपाटीपासुन हा भाग सुमारे ६३० मीटर उंचीवर आहे. घटप्रभा व कृष्णा या नद्यांच्या जोडणारी’ देवाची न्हय’ही नदी पूर्वेकडून पावसाळ्यात वहाते. भारतातीलच नव्हे; तर जगातील जांभ्या खडकावरील,(Laterite Rock) कातळसड्यावरील हे एकमेव विवर ठरण्याची शक्यता डाॕ.अतुल जेठे यांनी वर्तवली. असुन याला शास्त्रीय परिभाषेत ‘सिम्पल बाऊल क्रेटर’ म्हणजेच ‘साधे वर्तृळाकृती विवर’असे म्हणतात. आंबोली परिसरात सर्वात जास्त पाऊस या भागात पडत असल्याने वातावरणातून अतिगतिमान अशनीचा आघात झाल्यावर वर उसळून आलेली कड (Ejecta- Blanket) मृदेच्या धूपेमुळे नष्ट झाली असावी.
नामकरण-‘रजतकृष्ण’विवर
या विवरावर दोन दिवस संशोधन केल्यावर आपल्या या शोधून काढलेल्या विवराला ‘ राजतकृष्ण Crater’ म्हणजेत ‘रजतकृष्ण विवर असे नाव डॉ.जेठे यांनी दिले आहे. २००९ पासुन भारतातील विविध विवरांचा भूशास्रीय अभ्यास करताना मौलिक मार्गदर्शन करणाऱ्या इस्रो (IIRS) डेहराडून (उत्तरा खंड)या जागतिक पातळीवर संशोधन करणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ व भूशास्र विभागाचे प्रमुख रजत चटर्जी यांचे शुभनाव व आपले सहकारी मित्र मराठी विभागात अध्यापन करणारे मालवणी बोली साहित्य व संस्कृतीचे ज्येष्ठ संशोधक मार्गदर्शक डाॕ. बाळकृष्ण लळीत यांच्या नावातील ‘कृष्ण’ यावरून चौकुळ येथील विवराचे ‘ रजतकृष्ण विवर’असे नामकरण या दोन्हींच्या (गुरू आणि मित्र) यांच्या सन्मानार्थ केल्याचे डाॕ. अतुल जेठे यांनी सांगितले. यापूर्वी त्यांनी २०११साली शोधलेल्या लोणार जवळील विवराला ‘गगन विवर’असे नामकरण केले होते. या संशोधना दरम्यान चौकूळ येथील समाजसेविका मा.सौ. सुषमाताई गावडे,अनिल गावडे,प्रताप गावडे.मा.सरपंच गुलाबराव गावडे तसेच सरपंच श्री.सुरेश शेटवे डाॕ.सुश्रुत लळीत तसेत अन्य चौकुळ ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. या शोधकार्याचे चां ता. बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ. के. सी. मोहिते व संस्था सचिव मा.श्री. नंदकुमार निकम यांनी डाॕ.अतुल जेठे यांचे अभिनंदन केले आहे.
![]()
Facebook Comments Box






