सिंधुदुर्ग – जन्मोजन्मी हाच पती मिळावा, त्याच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी वटपौर्णिमेचे व्रत करते. पण जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून कुडाळमध्ये काही पुरुषांनी सुद्धा हे व्रत करून वडाला फेऱ्या मारल्या आहेत. यंदाचं नाही तर गेली १४ वर्ष वट पोर्णिमेला ते व्रत करत आहेत.
महिलांच्या बरोबरीने या पुरुषांनी वटवृक्षला फेऱ्या मारून आपल्या पत्नीप्रती आपली निष्ठा, आपलं प्रेम जपले. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, डॉ संजय निगुडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १४ वर्षांपूर्वी हि परंपरा सुरु केली. कुडाळमध्ये श्री गवळदेव मंदिराकडे असलेल्या वटवृक्षाची पूजा करून त्याला फेऱ्या मारून हे व्रत पुरुषमंडळी सुद्धा करत आहेत. ही सर्व मंडळी आज सकाळी गवळदेव मंदिर इथं जमली. देवाला श्रीफळ ठेवून सांगणं करण्यात आले. त्यांनतर ब्राह्मणाच्या उपस्थितीत वटवृक्षाची पूजा करून त्याला सात फेरे मारण्यात आले. आपल्या पत्नीप्रती आपला आदर व्यक्त करण्यासाठी प्रत्येक पुरुषाने हे व्रत करावे असे आवाहन यावेळी करण्यातआले.
पती-पत्नी ही संसाररूपी रथाची दोन चाक आहेत. दोघेही समान आहेत. पत्नी जर आपल्या पतीच्या आरोग्यासाठी, सौख्यासाठी हे व्रत करते तर आपल्या पत्नीचा सन्मान राखावा यासाठी महिलांप्रमाणे पुरुषांनी सुरु ठेवलेले व्रत खूप चांगले असल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थित महिलांनी व्यक्त केली.
Facebook Comments Box
Vision Abroad