दोडामार्ग : निसर्गसंपन्नतेचे वरदान असलेल्या तळकोकणातील तिलारी परिसरात काल एक दुर्मिळ ‘तारा’ GEOCHELONE ELEGANS प्रजातीचा कासव सापडला आहे. कासवांची ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असून वन्यजीव कायद्याखाली संरक्षित आहे. सध्या हे कासव दोडामार्ग वन विभागाच्या ताब्यात असून लवकरच त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
दोडामार्ग तालुक्यातील पाळये येथील उद्योजक सुभाष दळवी यांना हे कासव आढळून आले. त्यांनी दोडामार्गचे वनक्षेत्रपाल अरुफ कन्नमवार यांच्याकडे ते सुपूर्द केले. या कासवाच्या पृष्ठभागावर तारे व कुबड्यासारखे फुगीर भाग असतात. त्यामुळे हा कासव इतर कासवांपेक्षा वेगळा आहे. पंचनामा व अन्य प्रक्रिया पूर्ण करून या कासवाला नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याचे वनाधिकारी कन्नमवार यांनी सांगितले आहे.
या प्रजातीबद्दल अधिक माहिती
भारत आणि श्रीलंकेत हे तारा कासव आढळते. भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्, केरळ, तामिळनाडू, ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये त्याचा अधिवास आहे. मात्र यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे ते दुर्मिळ प्रजाती असल्याची माहिती प्राणीमित्रानी दिली. या कासवाबद्दल गैरसमज आणि अंधश्रद्धा आहे. हा कासव घरात ठेवल्यास घरात भरभराट अन् नोकरीधंद्यात प्रगती होते, अशी अंधश्रद्धा आहे. यामुळे या कासवांची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. त्यामुळेच ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
प्रजातीच्या सुरक्षेच्या दृष्टीने कायद्याच्या तरतुदी
इंडियन स्टार कासवे ही वन्यजीव संरक्षण अधिनयानुसार संरक्षित असून त्यांची खरेदी विक्री करण्यास बंदी आहे. तसेच ती जवळ बाळगण्यास बंदी आहे. त्यामुळे तारा कासव वन्यजीव (संरक्षण) कायदा 1972 च्या अनुसूची अंतर्गत संरक्षित आहे. तेथे प्रजाती ताब्यात आढळल्यास त्याला सहा महिन्यांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. विशेष म्हणजे या कासावाच्या पृष्ठभागावर तारे आणि कुबड्यासारखे फुगीर भाग असतात. त्यामुळे हा कासव इतर कासवांपेक्षा विशेष आहे.
Vision Abroad