रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गा बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई गोवा महामार्गाची वाहतुक ठप्प झाली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी येथे मोठी दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा कोणी जखमी झालेले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, निवळी येथे दरड कोसळण्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. ही दरड हटवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, दरड कोसळल्याने हा मार्ग तूर्तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून जिल्ह्यातील चार नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. तर खेड येथील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट असून प्रशासनाकडून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.