सावंतवाडी | सागर तळवडेकर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची गेल्याच आठवडय़ात दिल्लीत भेट घेत कोकण रेल्वे संदर्भातील मागण्यांबाबत चर्चा केल्यानंतर नांदगाव रेल्वे स्थानकावर तुतारी एक्सप्रेसला थांबा देण्यात आला आहे. अवघ्या 24 तासांत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली आहे. दरम्यान, गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्नासह स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा म्हणून आवाज उठवणाऱ्या सावंतवाडीकरांच्या मागण्यांच काय झालं ? हा प्रश्न तसाच आहे. की सावंतवाडीकरांना कुणी वाली उरलं नाही ? असा सवाल उपस्थित होत आहे.
पर्यटन जिल्हा सिंधुदुर्गसह महाराष्ट्राच शेवटच रेल्वे स्थानक हे सावंतवाडी आहे. परंतु सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचं रखडलेलं काम पूर्णत्वास यावं तसंच मोजक्याच गाड्यांना थांबा असल्यानं अधिकच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा. या प्रवासी संघटनांच्या मागण्यांना रेल्वे प्रशासनकडून आजवर केवळ केराची टोपलीच दाखवली गेली आहे. सावंतवाडी स्थानक हे शहराबाहेर असूनही उत्पन्नाच्या बाबतीत अग्र क्रमांकावर आहे. मात्र, तरीही केवळ ९ रेल्वे गाड्यांना इथे थांबा दिला गेलाय. तर सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच फेज-वन च काम होऊन फेज-टू चं काम अद्याप पूर्ण झालेल नाही आहे. ते कधी पूर्णत्वास येईल याबाबत अवाक्षरही कुणी काढत नाही. टर्मिनस तर लांबची गोष्ट रेल्वे गाड्यांना थांबे सुद्धा मिळत नाहीत. रेल्वेनं ये-जा करायला सावंतवाडीकरांना कुडाळवारी करावी लागत आहे. शहरातील नागरिकांना नाहक अर्धा तास यासाठी बायरोड प्रवासात घालवावा लागत आहे. तालुक्यातील इतर गावांतील प्रवाशांबद्दल न बोलेल चांगलं. जर स्वतःची चारचाकी किंवा दुचाकी असेल तर ठीक अन्यथा सरकारी वाहनांचा विचार केला तर प्रवाशांचे होणारे हाल ? ‘अतिथी देवो भव’ म्हणून पाहुण्या चाकरमान्यांना स्थानकापर्यंत सोडायला जाणाऱ्या तासनतास स्थानकावर बसून राहणाऱ्या कोकणीमाणसाचा विचार आमचे लोकप्रतिनिधी, स्थानिक आमदार दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नारायण राणे कधी करणार ? हा एक यक्षप्रश्न बनून राहिला आहे.
कोंकण रेल्वे प्रशासनाला इथल्या स्थानिक जनतेबद्दल, चाकरमानी, तसेच प्रवाशांबद्दल आस्था आहे का ? सावंतवाडी स्थानक हे शहराबाहेर असून ही या स्थानकाचे उत्पन्न हे १३.४ करोड व प्रवासी संख्या ही ३.५ लाख एवढी आहे. उत्पन्नाच्या बाबतीत १० व्या क्रमांकावर असताना येथे ५ दैनिक व ४ साप्ताहिक अशा एकूण ९ रेल्वे गाड्या थांबतात. सावंतवाडी स्थानकावर असा अन्याय का ? उत्पन्न , प्रवासी संख्या असून ही कमी थांबे का ? वारंवार सावंतवाडीवर हा अन्याय कशासाठी? की सावंतवाडीकरांना कुणी वाली राहीलेला नाही ?
Vision Abroad