मुंबई : मुंबई गोवा महामार्गावरच्या उड्डाण पुलाचा भाग आज सकाळी तुटला आहे. या अपघातावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. मुंबई – गोवा महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत सरकारने खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देखील लिहिलं आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई – गोवा महामार्गाचं काम अत्यंत वेगाने सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. परंतु, काम जरी वेगात सुरू असलं तरी ते अत्यंत निकृष्ट पद्धतीने होत असल्याचा अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. कामाचा वेग वाढवताना गुणवत्तेशी शासनाने तडजोड केली आहे का? असा प्रश्न सर्वसामान्याच्या मनात निर्माण होत आहे, असं जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
सदर उड्डाणपुलाच काम निकृष्ट असल्याचा आरोप अनेक वेळा येथील स्थानिक नागरिकांनी केला होता. परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे निदर्शनास येत आहे. वरील घटना नागरिकांच्या दाव्यात तथ्य असल्याचे दाखवून देत आहे.तरी सदरील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून महामार्गाच्या कामाच्या दर्जाचे त्रयस्थ यंत्रणेमार्फत परीक्षण करण्यात यावे. तसेच, या घटनेची चौकशी करण्यात येऊन कंत्राटदार व अन्य दोषीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.
या घटनेबाबत त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर एक ट्विट पोस्ट सुद्धा केली. या पोस्ट मध्ये ते म्हणाले
“मुंबई गोवा महामार्गावर बांधकाम सुरु असलेल्या पुलाचा भाग कोसळल्याची घटना आज सकाळी घडली आहे. त्यामुळे बहुप्रतिक्षित असा या महामार्गाच्या गुणवत्तेबाबत देखील प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचं काम अत्यंत वेगाने सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. वेग वाढवून कामाचा दर्जा घसरवला आहे का? सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र कामाच्या गुणवत्तेबाबत सरकारने खुलासा करावा. कोकणवासियांच्या डोळ्यात सरकारकडून केली जाणारी धूळफेक थांबवा.”
Facebook Comments Box
Vision Abroad