सिंधुदुर्ग : ओसरगाव येथे ज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने काल एक मोठी कारवाई केली आहे. सरपणाच्या आडून कंटेरनमधून बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी कऱ्हाड येथील एकाला ओसरगाव येथे ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ७० लाखांच्या दारूसह सरपण व १६ चाकांचा कंटेनर असा तब्बल एक कोटी २६ लाख ३२ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने केली. या प्रकरणी लक्ष्मण अर्जुन ढेकळे (वय ३४, रा. बेघरवस्ती-पाडळी ता. कऱ्हाड) याला ताब्यात घेतले. गेल्या चार दिवसांत कोटींचा मुद्देमाल जप्त करण्याची ही दुसरी कारवाई आहे.
याबाबत पथकाने दिलेली माहिती अशी ः दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती कोल्हापूरच्या भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) ओसरगाव येथे आज सकाळी सापळा रचण्यात आला. यावेळी १६ चाकी कंटेनर (एनएल ०१ एजी ३८२०) तपासणीसाठी थांबविण्यात आला. चालकाकडे चौकशी केली असता त्याने आतमध्ये सरपणाच्या गोण्या असल्याचे सांगितले. अधिक तपासणीत गोण्यांमध्ये गोवा बनावटीच्या दारूचा साठा आणि बियर बॉक्स आढळून आले.
पुठ्ठ्याच्या खोक्यात विदेशी मद्याच्या ७५० मिलीलिटरच्या नऊ हजार ६६० बाटल्या, १८० मिलीलिटरच्या ११ हजार ४० बाटल्या, ५०० मिलीलिटरच्या बियरच्या २ हजार ८०८ बाटल्या आढळल्या. पथकाने एकूण एक हजार १५२ खोके जप्त केली. ती सर्व सरपण गोण्याच्या मागे लपविली होती. पथकाने ७० लाख ८० हजार ३६० रुपये किमतीची दारू, ५५ लाखांचा कंटेनर आणि इतर साहित्य ५२ हजार ५०० रुपये असा एकूण एक कोटी २६ लाख ३२ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर भरारी पथकातील निरीक्षक पंकज कुंभार, दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे, एस. एस. गोंदकर, कॉन्स्टेबल सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, योगेश शेलार, राहुल सकपाळ यांनी कारवाई केली. श्री. येवलुजे तपास करीत आहेत.
Facebook Comments Box
Vision Abroad