बांदा: पत्रादेवी चेकनाक्यावरून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्याच अनुषंगाने थेट पत्रादेवी-गोव्याच्या हद्दीत ज्या ठिकाणी मोपा हद्दीतला पत्रादेवी पोलिस चेकनाका आहे.
त्या ठिकाणी सिंधुदुर्ग पोलिस मोठ्या प्रमाणात गोव्यातून महाराष्ट्रात जाणाऱ्या वाहनांची काटेकोरपणे तपासणी करत असल्याचे चित्र शनिवारी (ता.१८) सायंकाळी दिसून आले.
मागच्या काही महिन्यांपासून गोव्यातून महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत होती. पत्रादेवी चेकनाक्यावर न सापडणारी वाहने थेट सिंधुदुर्गातील बांदा, इन्सुली, आरोस या भागात अडवली जात होती आणि लाखो रुपयांची दारू हस्तगत करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र पोलिस करत होते.
मात्र, पेडणे अबकारी विभागाकडून तशा प्रकारची कारवाई का होत नव्हती, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र पोलिसांनी गोव्याच्या हद्दीमध्ये येऊन मागच्या तीन दिवसांपासून ही नाकाबंदी सुरू केलेली आहे. केवळ दुचाकी नव्हे तर प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात असल्याचे चित्र पत्रादेवी चेकनाक्यावर प्रत्यक्ष भेट दिली असता दिसून आले.
Vision Abroad