सिधुदुर्ग: केंद्राने प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान तथा पीएम जनमन अभियान सुरू केले असून त्यामध्ये जिल्ह्याचा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेत १६२६ आदिम समाजाचे नागरिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. २० वाड्यांमध्ये या समाजाचे वास्तव्य असल्याचेही पुढे आले आहे. आता या समाजाला रस्ते, पाणी, वीज, प्राथमिक शाळा, अंगणवाडी केंद्र, नळपाणी पुरवठा योजना आदी महत्त्वाच्या सुविधा या अभियान अंतर्गत देण्यात येणार आहेत.
देवगड, कणकवली, कुडाळ, मालवण आणि वेंगुर्ले या पाच तालुक्यांत ही वस्ती आहे. यातील १६ वाड्यांतील आदिम समाजाजवळ कच्चे घर सुद्धा राहण्यासाठी आढळलेले नाही. केवळ एकच वाडी जवळ जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. सहा वाड्यांत प्राथमिक शाळा नाहीत. चार वाड्यांना अंगणवाडी केंद्र नाही. तीन वाड्यांना आरोग्य केंद्र नाही. १९ वाड्यांत कौशल्य विकास केंद्र नाही. १३ वाड्यांत स्वच्छ पाणी नाही. सात वाड्यांत नळपाणी पुरवठा करणारी योजना नाही. १३ वाड्यांत वीज पुरवठा नाही. १५ घरांत सार्वजनिक शौचालय नाही, असे या सर्व्हेक्षणात पुढे आले आहे.
जिल्ह्यात आदिम समाजाचे वास्तव्य आढळलेल्या २० वाड्यांमध्ये केंद्राच्या प्रत्येक योजना अभियानाच्या माध्यमातून राबविल्या जाणार आहेत. ज्या योजना अद्याप पोहोचलेल्या नाहीत, त्याला प्राधान्य दिले जाणार आहे. व्यक्तिगत लाभ मिळालेला नसल्यास तोही दिला जाणार आहे.
Vision Abroad