गोवा वार्ता : कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांमध्ये आणि स्थानकांवर लुटमारीचे प्रकार वाढले आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील मडगाव रेल्वे स्थानक परिसरातील प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर ४ अज्ञात युवकांकडून मारहाण करत एका युवकाला लुटण्याचा प्रकार घडला. त्यानंतर एटीएममधूनही पैसे काढायला भाग पाडून त्यांना लुटले. तक्रारीनंतर कोकण रेल्वे पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
मडगाव रेल्वेस्थानक परिसरात परराज्यांतून आलेले अनेक लोक वस्ती करतात. याचाच त्रास आता प्रवाशांना होत असून प्लॅटफॉर्मवर कुणीही नसल्याचे पाहून रात्रीच्या वेळेला लुटमारीचा प्रकार घडला आहे. वरीर चोरीची घटना २५ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली होती. तक्रारदार मिथुन राज के. के. (३३, रा. केरळ) हे मडगाव रेल्वेस्थानकावरून स्वामी विवेकानंद रेल्वे हॉलिडे होम या ठिकाणी जात होते. प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वरून जात असताना फलाटावर कुणीही नसल्याची संधी साधून चार २० ते ३० वयोगटांतील युवकांनी त्यांना अडवले. त्यांनी मिथुन यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यांनी देण्यास नकार दिल्याने हाताच्या बुक्क्यांनी व थापटांनी त्यांना मारहाण करत त्यांच्या पाकिटातील १ हजार रुपये व रेल्वे ईमरजन्सी पास जबरदस्ती काढून घेतला. त्यानंतर मिथुनला बँक ऑफ इंडियाच्या एटीएमकडे नेत ५ हजार रुपये काढायला लावत त्या पैशांसह पाठीवरील पिशवी व त्यातील ६५० रुपये काढून घेतले.
वरील प्रकारानंतर मिथुन राज के. के. यांनी तक्रार नोंद केली. या तक्रारीला अनुसरून कोकण रेल्वे पोलिसांनी चार अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुनील गुडलर यांच्यासह कोकण रेल्वे पोलीस तपास करत आहेत.
Facebook Comments Box
Vision Abroad