पणजी : गोव्यात एका जुन्या वास्तूतील एका तिजोरीत चक्क ५ हजार दुर्मिळ नाण्यांचा खजिना सापडला असल्याची बातमी समोर आली आहे. पणजी येथील लेखा संचालनालयाच्या वास्तूत हा खजिना सापडला आहे. किंग व्हिक्टोरिया आणि किंग विल्यम यांची चित्रे असलेल्या ३३ दुर्मिळ नोटांसह मौल्यवान दागदागिनेही त्यात आढळून आले आहेत.
जुन्या सचिवालयामागील ‘फझेंडा’ इमारतीत (Fazenda building) पूर्वी लेखा संचालनालयाचे कार्यालय होते. याच ठिकाणी एका तिजोरीत दुर्मिळ वस्तू ठेवण्यात आल्या होता. १९६१ साली गोवा मुक्त झाल्यानंतर १९९२ साली ही तिजोरी उघडण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा ती उघडण्यात आली, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या तिजोरीत १०० किलोपेक्षा अधिक वजनाची एकूण ५ हजार दुर्मिळ नाणी सापडली असून ही नाणी वेगवेगळ्या कालखंडातील आहे. याशिवाय ३३ दुर्मिळ नोटा आणि २.२३४ किलो सोन्याच्या वस्तू व एका पिशवीत मौल्यवान अलंकार सापडले आहेत. याशिवाय जुन्या काळात घरांत वापरले जाणारे साहित्यही सापडले आहे. यात आरतीचे ताट, पणत्या अशा अतिशय जुन्या पूजा साहित्याचाही त्यात समावेश आहे. हे साहित्य सर्व लोकांना पाहण्यासाठी गोव्याच्या वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
तिजोरीत सापडल्या ‘या’ दुर्मिळ वस्तू
* ५,००० दुर्मिळ नाणी
* ३०७ तांब्याची नाणी (३.१०५ किलो)
* अरेबिक कलाकुसर असलेली ८१४ नाणी (४.७ किलो)
* १,७४६ अरेबिक नाणी (२० किलो)
* ७८७ तांब्याची नाणी (१५ किलो)
* १,०२६ तांब्याची नाणी (३८ किलो)
* १,६९५ नाणी (२२ किलो)
* क्वीन व्हिक्टोरिया आणि किंग विल्यम यांची छाप असलेली ३२० दुर्मिळ नाणी (३.४७७ किलो)
* दुर्मिळ चलनी नोटा ( ३३ नग)
* सोन्याचे तुकडे (२.२३४ किलो)
* दुर्मिळ सुवर्णालंकार (कांकण, पेंडेन्ट, सोनसाखळी, कर्णफुले, लॉकेट, ब्रेसलेटचे इत्यादींचे गाठोडे)
* घरातील दुर्मिळ भांडी आणि इतर वस्तू
Vision Abroad