संपादकीय :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक जुने, इतिहासाचा वारसा असलेले, प्रसिद्ध पर्यटन स्थळ, सुंदर आणि तलावाचे शहर अशी अनेक विशेषणे असलेल्या सावंतवाडी या शहराचे वर्णन महाराष्ट्रातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक शहर अशा शब्दात केल्यास ती अतिशयोक्ती निश्चीतच ठरणार नाही.
सावंतवाडी हे शहर माहीत नसलेला व्यक्ती क्वचितच सापडेल. कधी काळी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग या शहरातूनच जात असे. मुंबई गोवा प्रवासात अनेक शहरे लागत असली तरी प्रवाशांच्या स्मृतीत राहणारे हे एकमेव शहर. पर्यटकांना आकर्षित करणारा येथील स्वच्छ आणि सुंदर तलाव म्हणा, महामार्गाला अगदी लागून असलेला राजवाडा म्हणा किंवा स्थानिक कलाकारांनी हस्तकौशल्यांने साकारलेली येथील लाकडी खेळणी म्हणा, या सर्व गोष्टी पर्यटकांना नेहेमीच आकर्षित करत आले आहेत.
दुसरे म्हणजे पाश्चिम महाराष्ट्र आणि कोकण जोडणारा निपाणी-आजरा-आंबोली सावंतवाडी महामार्ग सुद्धा सावंतवाडी शहरातून जातो,त्यामुळे मुंबई म्हणा किंवा पाश्चिम महाराष्ट्र म्हणा गोव्याला जाणारा पर्यटक सावंतवाडी शहरातून जाणार हे नक्की. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील ईतर शहरांशी तुलना करता सावंतवाडी शहराचा विकास चांगला होत होता.
मात्र मागील काही वर्षांपासून चित्र बदलायला लागले. सर्व काही सुरळीत चालू असताना या शहराला कोणाची नजर लागावी तशा या शहराच्या बाबतीत काही नकारात्मक गोष्टी घडायला सुरवात झाली.
कोकणात 1998 साली कोकणरेल्वे आली. सावंतवाडी शहर हे मध्यवर्ती आणि तालुक्याचा प्रशासकीय भाग असल्याने या शहरातून किंवा शहराजवळून रेल्वे मार्ग जाणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता तो शहराच्या बाहेरून नेवून शहरापासून जवळपास आठ किलोमीटर दूर रेल्वे स्थानक बनविण्यात आले. वाहतुकींच्या अपुऱ्या सोयींमुळे तालुक्यातील नागरिकांसाठी हे रेल्वेस्थानक गैरसोयीचे बनले. जर स्थानक शहराच्या जवळपास असते तर येथील प्रवासी संख्याही जास्त असली असती आणि रेल्वेला मिळणार्या महसुलाच्या बाबतीतही कोकण रेल्वेच्या पाहिल्या पाच स्थानकांच्या यादीतही सावंतवाडीचा समावेश नक्किच झाला असता.
दुसरी नकारात्मक गोष्ट घडली ती म्हणजे या शहरातून जाणारा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग शहराच्या दूर जवळपास 5 ते 6 किलोमीटर अंतरावरून बाहेरूनच वळविण्यात आला. शहराच्या विकासावर त्यामुळे नकारात्मक परिणाम झालाच मात्र सर्वात मोठा परीणाम येथील पर्यटनावर झाला. पर्यटनावर अवलंबून असलेल्या हॉटेल व्यावसायिक, कोकणी मेवा विक्रेते, लाकडी खेळणी दुकानदार आणि ईतर व्यावसायिकांचा रोजगार हिरावला गेला. गोवा मुंबई दरम्यान चालविण्यात येणार्या खाजगी बसेस आता शहराच्या बाहेरून जावू लागल्याने चाकरमान्यांच्या त्रासातही वाढ झाली आहे.
या गोष्टी कमी होत्या म्हणुन की काय आता सावंतवाडी शहराच्या बाबतीत अजून एक नकारात्मक गोष्ट घडत आहे. विद्यमान सरकारचा प्रस्तावित महत्त्वाकांक्षी नागपूर गोवा महामार्गही आता सावंतवाडी शहराबाहेरून 10 ते 12 किलोमीटर अंतरावरून जाणार आहे. या महामार्गाचा आराखडा बनवताना कोकणचा विकास किंवा कोकणच्या पर्यटनाचा विकास या दोन्ही गोष्टी विचारात घेतल्या गेल्या नाहीत. या महामार्गामुळे पाश्चिम महाराष्ट्रातून येणारा पर्यटक सरळ बाहेरच्या बाहेर गोव्यात जाणार आहे. गोव्याला जायला शक्तीपीठ महामार्गाचा पर्याय मिळाल्याने सावंतवाडी शहरातून जाणार्या सध्याच्या निपाणी-आजरा-आंबोली सावंतवाडी महामार्गाचे महत्व कमी होणार आहे. सहाजिकच त्याचा फटका सावंतवाडी शहराच्या विकासाला बसणार आहे.
वरील गोष्टींमुळे सावंतवाडी शहराच्या तसेच संपूर्ण तालुक्याच्या विकासाला खीळ बसली आहे. तालुक्यातील साधनसामुग्री जमिनींच्या स्वरुपात महामार्गासाठी, रेल्वेरूळांसाठी वापरल्या गेल्या आहेत. मात्र त्याचा फायदा पाहिजे तसा तालुक्याला झाला नाही. चुका झाल्यात, मात्र त्या कोणाकडून, का आणि कशा झाल्यात यावर पण विचार करणे गरजेचे आहे. काही प्रमाणात येथील स्थानिक नागरिकही याला जबाबदार असतिल आणि येथील राजकारणीही. मात्र आता चुका सुधारल्या गेल्या पाहिजेत नाहीतर सावंतवाडी शहर किंबहुना संपूर्ण तालुका विकासाच्या युगात खूप मागे पडेल.
सावंतवाडी बेळगाव हा रेल्वे मार्ग गेली सहा दशके रखडला..