



कुडाळ, दि. ४ सप्टें: कुडाळ रेल्वे स्थानक परिसर सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आज बुधवार दिनांक ४ रोजी दुपारी १२ वाजता खासदार नारायण राणे व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन स्थानकांचे सुशोभीकरण केले आहे. सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली या तिन्ही स्थानकांचे रूपडे पूर्णतः बदलून या स्थानकांना विमानतळाचे स्वरुप दिले गेले आहे. यासाठी जिल्हय़ाचे पालकमंत्री रविन्द्र चव्हाण यांच्या कल्पकतेचे कौतुक होत आहे. यापूर्वी कणकवली आणि सावंतवाडी या स्थानकांच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण करून गेल्याच महिन्यात त्यांचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र कुडाळ रेल्वे स्थानकाचे काही काम अपूर्ण राहिले असल्याकारणाने त्याचे लोकार्पण पुढे ढकलण्यात आले होते.
कुडाळ स्थानकाच्या आजच्या या सोहोळ्यासाठी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे, विधानसभा परिषद सदस्य निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्ह्या अध्यक्ष प्रभाकर सावंत आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कुडाळ भाजपा तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, दादा साईल यांनी केले आहे.