



Konkan Railway: कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राध्यापक मधु दंडवते यांची तैलचित्रे कोकण रेल्वेच्या महत्वाच्या स्थानकांवर लावण्यास सुरवात झाली आहेत. राजापूर, संगमेश्वर आणि चिपळूण रेल्वे स्थानकांवर तैलचित्रे लावण्यात आली आहेत. तसेच अजुन काही महत्वाच्या स्थानकांवरही तैलचित्रे लवकरच लागण्याची शक्यता आहे.
प्राध्यापक मधु दंडवते यांचे कोकण रेल्वे अस्तित्त्वात आणण्यासाठी दिलेले योगदान पाहता त्यांचा मरणोत्तर सन्मान होणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांची तैलचित्रे कोकण रेल्वेच्या काही महत्वाच्या स्थानकांवर लावण्यात यावीत अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली होती. कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ, ठाणे या संघटनेनेही त्यांची तैलचित्रे खेड, चिपळूण, संगमेश्वर, विलवडे, राजापूर आणि वैभववाडी या स्थानकांवर लावण्यात यावीत यासाठी निवेदन दिले होते. या मागण्यांना रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून ही तैलचित्रे कोकण रेल्वेच्या स्थानकांवर लावण्यास सुरवात केली आहे. रेल्वेच्या या उपक्रमाचे प्रवासी संघटनांनी कौतुक केले असून त्यांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे.
तैलचित्रे लागलीत पण सावंतवाडी स्थानकाच्या नामकरणाचे काय?
प्राध्यापक मधु दंडवते यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नामकरण ‘लोकनेते मधु दंडवते टर्मिनस’ LMDTअसे करण्यात यावे यासाठी प्रवासी संघटनांनी निवेदने दिली होती. मात्र एखाद्या रेल्वे स्थानकाचे नामांतर करावयाचे झाल्यास त्या राज्यातील शासनाने रेल्वे विभागाला तशी शिफारस करणे आवश्यक असल्याचे रेल्वेकडून उत्तर आले होते. त्यानुसार कोकण विकास समितीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिनांक ०३ जून २०२४ रोजी निवेदन सादर करून शासनातर्फे तशी शिफारस करण्याची विनंती केली होती. सरकारतर्फे या निवेदनाची दखल घेतली गेली आहे. दिनांक २७ जून रोजी राज्य गृह (परिवहन) विभागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना या नामकरणाबाबत लिखित स्वरूपात त्यांचे अभिप्राय सादर करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र या मागणीचे पुढे काय झाले ते गुलदस्त्यातच आहे.