नवी दिल्ली : केंद्र सरकारने शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल करण्याची घोषणा केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार आता पाचवी आणि आठवीच्या वर्गातही मुलांना नापास केलं जाऊ शकतं. इयत्ता 5वी आणि 8वीच्या वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दोन महिन्यांत पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी दिली जाईल. त्यातही ते नापास झाले तर नापास होतील आणि पुन्हा त्याच वर्गात शिकावे लागेल.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. आता नो डिटेंशन पॉलिसीला समाप्त करण्यात आले आहे. त्यामुळे इयत्ता पाचवी आणि आठवीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात थेट ढकलणे बंद केले जाणार आहे. या नापास विद्यार्थ्यांना आता पुन्हा दुसऱ्यांदा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे. मात्र ते जर दुसऱ्यांदाही नापास झाले तर त्यांना वरच्या वर्गात जाण्याची द्वार बंद केले जाणार आहे. मात्र तरीही आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेतून काढणार नाही असेही सरकारने म्हटले आहे.
नापास मुलांकडे विशेष लक्ष दिले जाईल
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे. जर एखादा विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण झाला तर त्याला 2 महिन्यांत पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी मिळेल, मात्र त्यातही तो अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुढील वर्गात पदोन्नती दिली जाणार नाही, असे या अधिसूचनेत म्हटले आहे. मात्र या काळात पुन्हा नापास झालेल्या विद्यार्थ्यांना सुधारण्याची संधी दिली जाईल. अनुत्तीर्ण विद्यार्थ्याकडे शिक्षक विशेष लक्ष देतील आणि पालकांना वेळोवेळी मार्गदर्शनही करतील.
नो डिटेन्शन पॉलिसी ही शिक्षण हक्क कायदा 2009 चे महत्त्वाचे धोरण होते. या धोरणांतर्गत इयत्ता पाचवी आणि आठवीच्या मुलांना वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण करण्यात आले नाही. या धोरणांतर्गत पारंपारिक परीक्षांना सामोरे न जाता सर्व विद्यार्थ्यांना आपोआप पुढील वर्गात बढती देण्यात आली. या धोरणात मुलांचे सतत आणि सर्वसमावेशक मूल्यमापन करण्यावर भर देण्यात आला होता.
Vision Abroad