मुंबई: रायगड रत्नागिरी लोकसभा क्षेत्रातील रेल्वे समस्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी लोकसभा खासदार सुनील तटकरे अध्यक्षतेखाली सोमवार दि. २० जानेवारी, २०२५ सकाळी १०:३० ते १२:३९ या वेळेत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार व कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते. यावेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना, कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा व इतर अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीत आपापल्या समस्या मांडण्यासाठी संबंधित ठिकाणच्या प्रवासी संघटना व प्रतिनिधींना बोलावण्यात आले होते. आपना सहकारी बँकेचे संचालक तथा रत्नागिरी जिल्हा नियोजन चे सदस्य श्री. अजयशेठ बिरवटकर यांनी जल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितिन सखाराम जाधव व अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय मधुकर महापदी यांना निमंत्रित केले होते.
याप्रसंगी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण, रत्नागिरी दिवा गाडी दादरपर्यंत पूर्ववत करणे, मुंबई चिपळूण नवीन गाडी सुरू करणे, पुणे एर्नाकुलम एक्सप्रेस कल्याणमार्गे वळवणे, जबलपूर कोईंबतूर एक्सप्रेसला कल्याण येथे थांबा देणे, खेड येथे विविध गाड्यांना थांबा देणे, गोव्यातून मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांमध्ये कोकण रेल्वेने रत्नागिरीच्या उत्तरेकडील स्थानकांना दिलेला अपुरा कोटा वाढवणे किंवा सर्व स्थानकांना समान कोटा देणे आदी महत्त्वाचे विषय मांडण्यात आले.
त्याचबरोबर पेण, नागोठणे, रोहा, माणगाव आणि वीर येथीलही समस्यांवर चर्चा करण्यात आली. रेल्वे अधिकाऱ्यांनी ज्या ज्या गोष्टी शक्य असतील त्या पुढे रेल्वे बोर्ड व मंत्रालयाकडे मांडण्याचे आश्वस्त केले. तसेच खासदार सुनील तटकरे यांनी रेल्वे मंत्रालयात पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.
ही बैठक आयोजित करून सर्वांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्याबद्दल खासदार श्री. सुनिल तटकरे व बैठकीला आमंत्रित केल्याबद्दल श्री. अजयशेठ बिरवटकर यांचे जल फाऊंडेशन कोकण विभाग रजिस्टर या संस्थेच्या वतीने आभार.
Vision Abroad