मुंबई: अनेकदा रेल्वे स्थानकावर हमालीच्या दरांवरून हमाल आणि प्रवाशांत वाद होतात. यावर उपाय म्हणून रेल्वे स्थानकांवरील पश्चिम रेल्वेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता मुंबई सेंट्रल टर्मिनससह काही प्रमुख स्थानकांवर हमालांचे दर डिजिटल डिस्प्लेवर (टीव्ही) प्रदर्शित करण्यात येत आहेत. या उपक्रमामुळे प्रवाशांना हमाल सेवेसाठी अधिकचे पैसे देण्याची वेळ येणार नाही. हा उपक्रम हळूहळू सर्व रेल्वे स्थानकांवर लागू करण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या स्टेशनवर लावण्यात आलेल्या डिजिटल डिस्प्ले स्क्रीनवर जाहिरातींसोबतच रेल्वेशी संबंधित महत्त्वाची माहितीही दाखवली जाते. सध्या या टीव्हीवर हमालांच्या सेवेसाठी अधिकृत दरपत्रक प्रदर्शित केले जात आहे. यामुळे प्रवाशांना हमालीच्या दराबाबत अधिक स्पष्टता मिळत आहे.उदाहरणार्थ, जर एखाद्या हमालाने दरपत्रकापेक्षा अधिक शुल्क मागितले, तर प्रवाशांना लगेचच टीव्हीवरील अधिकृत दर दाखवता येतात. तसेच, ज्या प्रवाशांना हमालांकडून अधिक शुल्क आकारले जात असल्याचे जाणवेल, ते अधिकृत तक्रार नोंदवू शकतात.
पारदर्शकतेसोबत कमाई टीव्हीवर जाहिराती दाखविण्यासाठी रेल्वे ५ वर्षांचा करार करते. या कराराच्या लायसन्स फीच्या स्वरूपात रेल्वेला कोट्यवधींचा महसूल मिळतो. उदाहरणार्थ, मुंबई सेंट्रल स्थानकावर ४४ डिजिटल डिस्प्ले स्क्रीन लावण्यात आले असून, या माध्यमातून रेल्वेला वार्षिक ४१ लाख रुपये तर पाच वर्षांमध्ये २ कोटी २० लाख रुपये महसूल मिळाला आहे.
Facebook Comments Box