Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ५०१०३/५०१०४ रत्नागिरी फास्ट पॅसेंजर आणि १०१०५/१०१०६ दिवा सावंतवाडी दिवा एक्सप्रेस या दोन गाड्या दिवा स्थानकावरून सोडण्यात येतात. मात्र कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणाऱ्या या दोन गाड्यांसाठी सुरवातीचे स्थानक म्हणुन दिवा स्थानक गैरसोयीचे असून नियमबाह्य़ही आहे. या गाड्या दादर किंवा मुंबई सीएसएमटी या स्थानकांवरून सोडण्यात याव्यात अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सेक्रेटरी अक्षय महापदी यांनी केली आहे.
रेल्वे बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन
दिवा स्थानकावर सध्या गाड्यांमध्ये पाणी भरण्याची सोय नाही आहे. रेल्वे बोर्डाने दिनांक १६.०४.२०१० रोजी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील प्रवासात गैरसोय टाळण्यासाठी गाडयांना सुरवातीच्याच स्थानकावर पाणी भरणे बंधनकारक केले आहे. असे असताना येथून सुटणाऱ्या या दोन गाड्यामध्ये पाणी पुढील स्थानकावर म्हणजे पनवेल स्थानकावर भरण्यात येते. यावरून विभागीय रेल्वे प्रशासन रेल्वे बोर्डाच्या सुचना पाळत नसल्याचे स्पष्ट होत आहे. या गाड्यांना पनवेल स्थानकावर पाणी भरावे लागत असल्याने पनवेल स्थानकावर नियमित थांब्याच्या कालावधीपेक्षा अधिक कालावधीपर्यंत गाडी थांबवून ठेवावी लागत असल्याने प्रवाशांच्या वेळेचा अपव्यव होतो.
फक्त दोन गाड्यांसाठी दिवा स्थानकावर पाणी भरण्याची व्यवस्था करणे अव्यवहार्य आहे. दिवा परिसरात पाण्याची कमतरता पाहता अशी सोय केली तरी गाड्यांसाठी पाण्याची टंचाई भासू शकते. त्यापेक्षा या गाड्या पुढे दादर, सीएसएमटी नेल्यास त्यांच्यासाठी लागणारे पाणी आणि देखभालीचा प्रश्न राहणार नाही.
प्रवाशांसाठी गैरसोयीचे
मांडवी, जनशताब्दी, वंदे भारत, तेजस, नेत्रावती, मत्स्यगंधा, कोकणकन्या, मडगाव वांद्रे, लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव या गाड्या कोकणातील बहुतांश स्थानकांवर थांबत नाहीत. त्या स्थानकांवर केवळ सावंतवाडी एक्सप्रेस आणि रत्नागिरी पॅसेंजर या किंवा यांपैकी कोणतीतरी एकच गाडी थांबते. त्यामुळे या ठिकाणी प्रवास करणार्या प्रवाशांना इतर पर्यायच नाही. हे प्रवासी ठाणे, भांडुप, घाटकोपर, मुंबई, बोरिवली, मीरा-भायंदर, वसई विरार येथील आहेत. या गाड्या दिवा स्थानकापर्यंत मर्यादित असल्याने या गाड्यांचा लाभ घेताना त्यांना खासकरून आबालवृद्धांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतो त्यामुळे या गाड्या दादर किंवा मुंबई सीएसएमटी पर्यत विस्तारित केल्यास त्यांचा त्रास बर्यापैकी वाचेल.
फलाटाची कमी लांबी
दिवा स्थानकावरील फलाटांची लांबी पुरेशी नसल्याने या गाडयांना अधिक डबे जोडण्यावर मर्यादा येत आहेत. १०१०५/१०१०६ दिवा सावंतवाडी दिवा ही गाडी एलएचबी स्वरूपात चालविण्यात येत असून सध्या ती १६ डब्यांच्या चालविण्यात येत आहे. कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची गर्दी पाहता ही गाडी २२ डब्यांची करणे आवश्यक आहे. दिवा स्थानकांवरील कमी लांबीच्या प्लॅटफॉर्ममुळे ते शक्य होणार नाही.
दिवा स्थानकासाठी ५ डबे राखीव असावेत
सध्या या गाड्यादिवा स्थानकावरून सोडण्यात येत असल्याने कल्याण डोंबिवली आणि दिवा भागातील प्रवाशांना ही गाडी सोयीची आहे. ही गाडी दादर किंवा मुंबई सीएसएमटी स्थानकापर्यंत विस्तारित झाल्यास येथील प्रवाशांच्या सोयीसाठी किमान ५ जनरल डबे दिवा स्थानकाला राखीव ठेवावे, जेणेकरून या प्रवाशांना प्रवास करणे सोयीचे होईल.
या मुद्द्यांवर श्री.अक्षय महापदी यांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले असून या गाड्या दादर किंवा मुंबई सीएसएमटी स्थानकापर्यंत विस्तारित कराव्यात अशी इमेलद्वारे मागणी केली आहे.
Facebook Comments Box