मुंबई – पवईतील आर.ए. स्टुडिओजवळ गुरुवारी रात्री एका तरुणाने १७ अल्पवयीन मुले व दोन प्रौढ असे १९ जणांना ओलीस ठेवले. रोहित आर्या (वय अंदाजे ३०) असे या तरुणाचे नाव असून, “माझी शाळा सुंदर शाळा” योजनेअंतर्गत थकलेली दोन कोटी रुपयांची रक्कम मिळाली नाही, या रागातून त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले जाते.
पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक निरीक्षक अमोल वाघमारे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सुमारे तीन तास चर्चा केल्यानंतर रोहितने पोलिसांवर हल्ला केला. प्रतिहल्ल्यात तो गंभीर जखमी झाला व रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. सर्व १९ ओलीस सुखरूप सोडले गेले.
रोहितने यापूर्वी माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर उपोषण केले होते. केसरकर यांनी “रोहितची थकबाकी पूर्ण दिली होती; तो मानसिक तणावात होता,” अशी प्रतिक्रिया दिली. मात्र कुटुंबीयांचा दावा आहे की रक्कम अद्याप बाकी आहे.
पोलिसांनी ओलीस ठेवणे व हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, थकबाकीच्या दाव्यांची चौकशी सुरू आहे.
 






