काल देवरूख येथे पार पडलेल्या खासदारांच्या जनता दरबारात संगमेश्वर तालुक्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय अग्रक्रमाने मांडण्यासाठी सकाळी लवकरच निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुक (रेल्वे) ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन, सहकारी अशोक मुंडेकर , समन्वयक रुपेश मनोहर कदम लक्ष्मी नृसिंह मंगल कार्यालय येथे उपस्थित होते.
संगमेश्वर स्थानकात दिवसेंदिवस वाढणारी प्रवासी संख्या बघता ९ अतिरिक्त गाडयांना थांबा मिळावा म्हणून कोंकण रेल्वे प्रशासनाकडे संगमेश्वर जनतेच्या वतीने निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुक (रेल्वे) ग्रुपने मागणी केली होती त्यावेळी कोंकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या सोबत झालेल्या बैठकीत मागणी केलेल्या ९ गाड्यांपैकी जामनगर, पोरबंदर व मडगाव एक्सप्रेस या तीन गाडयांना संगमेश्वर रोड स्थानकात थांबे देण्यास सर्व बाबी अनुकूल असून तसा प्रस्ताव आम्ही केंद्रीय रेल्वे बोर्डाच्या मंजुरीसाठी पाठवतो असे सांगितले आणि तसा प्रस्ताव पाठवला.
या बैठकीला स्थानिक आमदार श्री शेखर निकम सुद्धा उपस्थित होते आणि त्यांनी सुद्धा आपली शिफारस त्यांच्या पत्राद्वारे केली होती.
थांबे मंजूरी हा विषय केंद्रीय रेल्वे बोर्डाच्या अखत्यारीत येत असल्याने त्याला स्थानिक खासदारांची शिफारस असणे क्रमप्राप्त असून त्यांचे रेल्वे मंत्र्यांना शिफारस पत्र लागेल असे कोंकण रेल्वे प्रशासनाने संगितले. त्याप्रमाणे मे २०२५ मध्ये खासदार श्री नारायण राणे यांना भेटून हा विषय त्यांच्या समोर मांडण्यात आला आणि त्यांनी रेल्वे मंत्र्यांना आपले शिफारस पत्र सुद्धा दिले आणि पुढील दोन दिवसात मी रेल्वे मंत्र्यांना भेटून मंजूरी घेतो असे आश्वासनही दिले परंतू या गोष्टीला आज सहा महिने उलटले तरी या गाड्यांच्या थांब्याना मंजूरी मिळालेली नाही त्यामुळे काल खासदारांच्या देवरुख येथे झालेल्या जनता दरबारात पुन्हा हा प्रश्न त्यांच्यासामोर मांडून यामध्ये लक्ष घालण्याची मागणी संघटनेच्या वतीने केली गेली.
यावेळी उत्तर देताना खासदार नारायण राणे म्हणाले, “माझे मित्र असलेले केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याकडे मागणी करून मी थांबे मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करतो.”
परंतु थांबे मंजूर करुन घेण्यासाठी कधी कधी वजनदार व्यक्तींचा एक शब्दही कामी येतो याचा प्रत्यय गेल्या दोन महिन्यात आजूबाजूच्या जिल्ह्यात मंजूर झालेले थांबे बघता लक्षात येते. विशेष म्हणजे हे कोकणातील थांबे जिल्हयाबाहेरील नेत्यांनी रेल्वे मंत्र्यांकडे आपले वजन वापरुन तातडीने मंजूर करून घेतले मग आपल्या खासदारांच्या शिफारशीला रेल्वे बोर्ड पहात नाही कां? असा सवाल विचारला जात आहे.
![]()


