Sindhudurg: तब्बल 28 कि.मी. लांबीचे एकूण 27 बोगदे आणि रस्त्यावरील 55 उड्डाणपूल असणाऱ्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गासाठी भूसंपादन सुरू करा, असे आदेश गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. केंद्र आणि राज्य सरकारच्या सहभागातून होणार्या या मार्गासाठी राज्य सरकारच्या हिश्श्याची तरतूद करा, असेही आदेश त्यांनी दिले. या निर्णयामुळे पावणेदहा वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या या मार्गाला अखेर चालना मिळाली आहे.
निसर्गाच्या कुशीतून जाणारा हा मार्ग आहे. सर्वात मोठा बोगदा 3.96 कि.मी. लांबीचा आहे. 2 कि.मी.पेक्षा जादा लांबीचे 3, तर त्यापेक्षा कमी लांबीचे 24 बोगदे असतील. या मार्गावर रस्त्यावरील 55 उड्डाणपूल, रस्त्याखालील 68 पूल असतील. यासह छोटे पूल 74, तर मोठे पूल 55 असतील. या मार्गावर एकूण 10 स्थानकेही प्रस्तावित केली आहेत.
विधानभवनातील मंत्री परिषदेच्या सभागृहात बंदरे विकास विभागाची आढावा बैठक झाली, या बैठकीत कोकणातील जयगड, आंग्रे, रेडी व विजयदुर्ग या बंदरांचा विकास करण्यासाठी वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे मार्गाची गरज आहे, असे सांगत फडणवीस म्हणाले, हा रेल्वे मार्ग केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्यातून उभारला जाणार आहे. याकरिता या मार्गासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाची तरतूदही करा, असेही आदेश त्यांनी दिले. बैठकीस मत्स्य व बंदरे विकासमंत्री नितेश राणे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, परिवहन व बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. आदींसह अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, या निर्णयाची माहिती मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. हा निर्णय केवळ कोकणासाठी नव्हे, तर महाराष्ट्रासाठी गेमचेंजर ठरणार आहे. या रेल्वे मार्गामुळे विकासाची असंख्य दालने उघडणार आहेत. प्रामुख्याने कृषी आणि मत्स्य उत्पादनांच्या वाहतुकीला चालना मिळेल. पर्यटनात वाढ, पूर आणि भूस्खलनाच्या काळात दळणवळणाची पर्यायी सुविधा म्हणून हा मार्ग उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
27 बोगदे, 55 उड्डाणपूल
या मार्गावर 28 कि.मी. लांबीचे एकूण 27 बोगदे असतील. यासह रस्त्यावरील 55 उड्डाणपूल आहेत. निसर्गाच्या कुशीतून जाणारा हा मार्ग आहे. सर्वात मोठा बोगदा 3.96 कि.मी. लांबीचा आहे. 2 कि.मी.पेक्षा जादा लांबीचे 3, तर त्यापेक्षा कमी लांबीचे 24 बोगदे असतील. या मार्गावर रस्त्यावरील 55 उड्डाणपूल, रस्त्याखालील 68 पूल असतील. यासह छोटे पूल 74, तर मोठे पूल 55 असतील. या मार्गावर एकूण 10 स्थानकेही प्रस्तावित केली आहेत.


