रुपेश मनोहर कदम / सायले: स्वतंत्र कोकण राज्य अभियानाच्या वतीने सातत्यपूर्ण सामाजिक कार्यासाठी संगमेश्वरचे ‘रेल्वे मॅन’ म्हणून ओळखले जाणारे पत्रकार संदेश सुरेश जिमन यांना “कोकण रत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या समाजाभिमुख कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून, या सन्मानामुळे संगमेश्वर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबई येथील मराठी पत्रकार भवन, आझाद मैदानाजवळ आयोजित पुरस्कार वितरण सोहळा संस्थापक अध्यक्ष श्री. संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पत्रकार व संपादक श्री. सचिन कळझुनकर उपस्थित होते. याशिवाय विविध क्षेत्रांतील मान्यवर व अन्य पुरस्कारप्राप्त व्यक्तींनीही उपस्थिती लावली.
या पुरस्कारामुळे संगमेश्वर तालुक्यात उत्साहाचे वातावरण असून, पत्रकार संदेश जिमन यांच्या कार्याचा हा गौरव सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरत आहे. प्रत्येकजण स्वतःच्या आयुष्यात व्यस्त असतो; मात्र काही व्यक्ती चाकोरीबद्ध आयुष्याला छेद देत समाजसेवेसाठी स्वतःला वाहून घेतात. संदेश जिमन यांचा हा सन्मान म्हणजे त्यांच्या निस्वार्थ कार्याची पावती असून, तरुण पिढीसाठी तो निश्चितच प्रेरणादायी क्षण ठरतो.


