सावंतवाडी: आरोंदा भटपावणी येथे शनिवारी रात्री १०.३० वाजता दुचाकीने घरी जाताना येथील युवकाला अगदी जवळून दोन बच्छड्यांसह वाघाचे दर्शन झाले. आरोंदा रेडी मुख्य रस्त्या जवळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळे नजीक सदर वाघ रस्ता ओलांडत असल्याचे निदर्शनास आले.
भटपावणी येथील साईल विद्याधर नाईक व तुषार नाईक दुचाकीने रात्री साडेदहा वाजता घरी जात असताना दोन बच्चड्यांसोबत वाघ रस्ता पार करत असताना समोर आला.
दुचाकी गाडीची लाईट तोंडावर पडताक्षणी वाघाने डरकाळी फोडून दुचाकीच्या दिशेन धावत आला व मोठी डरकाळी फोडली.
सदर दुचाकीस्वार भयभीत होऊन त्यांनी गाडी जोरात चालवून तिथून पळ काढला.सदर वाघ भटपावणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दिशेन डोंगरात गेल्याचे साईल नाईक यांनी सांगितले.
अंगावर आल्याने छायाचित्र काढण्याचा प्रयत्न केला नसल्याचे त्यांनी सांगितले.या घटनेबाबत आरोंदा उपसरपंच गोविंद केरकर यांनी दुजोरा दिला.
दरम्यान, सदर डोंगर परिसरात प्राथमिक शाळा आहे. याठिकाणी वाघाचाnसंचार असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या भागातील पाळीव प्राणी ,कुत्र्यांनाही वाघाने लक्ष केल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितले.त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.तरी वन विभागाने याची दखल घेऊन बंदोबस्त करण्याची नागरिकांतून मागणी केली जात आहे.


