नवी दिल्ली: केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रदेश-विशेष स्थानिक खाद्यपदार्थ (Regional Cuisine) सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवाशांचा अनुभव अधिक समृद्ध करणे, ज्या भागातून रेल्वे प्रवास करते तिथली सांस्कृतिक ओळख आणि पाककृतींमधील विविधता दर्शवणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. रेल्वेतील ऑन-बोर्ड सेवा सुधारण्यासाठी आणि स्थानिक संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना टप्प्याटप्प्याने सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांपर्यंत वाढवली जाईल.
आयआरसीटीसी (IRCTC) तिकीट प्रणालीतील सुधारणा:
रेल्वे मंत्रालयाने आयआरसीटीसी (IRCTC) तिकीट प्लॅटफॉर्मवरील सेवांच्या गुणवत्तेचा आढावा घेतला. कठोर ओळख पडताळणी आणि प्रगत तपास यंत्रणा लागू केल्यामुळे बनावट युजर खात्यांवर मोठी कारवाई करण्यात यश आले असून, आतापर्यंत ३.०३ कोटी बनावट खाती निष्क्रिय करण्यात आली आहेत. या सुधारणांमुळे दररोज तयार होणाऱ्या नवीन युजर आयडीची संख्या एक लाखावरून सुमारे ५,००० पर्यंत खाली आली आहे, ज्यामुळे तिकीट बुकिंग प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येणे अपेक्षित आहे.


