आम्ही मुंबई घडवली, पण गावी जाताना आम्हालाच वाली कोणी नाही. निवडणुकीत मत मागण्यासाठी येणाऱ्या नेत्यांना आता आम्ही जाब विचारणार आहोत.” चाकरमानी
Follow us onमुंबई/रत्नागिरी: गणपती असो वा होळी, कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या तिकिटांसाठी मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्याची होणारी ओढाताण काही नवीन नाही. मात्र, आता हा प्रश्न केवळ प्रवासापुरता मर्यादित न राहता राजकीय वळण घेताना दिसत आहे. “स्वतःच्या हक्काच्या मातीत आणि हक्काच्या रेल्वेत जागा का नाही?” असा संतप्त सवाल आता चाकरमानी विचारू लागला आहे.
जनावरांसारखा प्रवास आणि प्रशासकीय अनास्था
दरवर्षी सणासुदीला कोकण रेल्वेची तिकिटे काही सेकंदात ‘हाऊसफुल्ल’ होतात. परिणामी, हजारो चाकरमान्यांना आपल्या बायका-मुलांसह जनरल डब्यात अक्षरशः कोंबून, जनावरांसारखा प्रवास करावा लागतो. आरक्षित तिकीट न मिळाल्याने आणि खासगी ट्रॅव्हल्सचे दर गगनाला भिडल्याने, रेल्वेचा हा ‘कष्टप्रद’ प्रवास चाकरमान्यांच्या पाचवीलाच पुजला आहे.
या निवडणुकीत ‘कोकण कार्ड’ चालणार?
मुंबईत कोकणी मतदारांचा टक्का मोठा असून अनेक प्रभागांमध्ये ते किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. आतापर्यंत केवळ ‘भावी नगरसेवक’ म्हणून मिरवणाऱ्या नेत्यांना चाकरमान्यांच्या या डोळ्यातील पाण्याची जाणीव होणार का?
जो आमच्या प्रवासाची सोय करेल, त्यालाच आमचे मत,” अशी भूमिका अनेक चाकरमानी संघटनांनी घेतल्याचे समजते. मात्र हीच भावना सर्वच चाकरमान्यांचा मनात रुजणे गरजेचे आहे.
प्रमुख प्रश्न जे आजही अनुत्तरित आहेत:
कोकण रेल्वेचे दुपदरीकरण संथ गतीने का सुरू आहे?
सणासुदीला जाहीर होणाऱ्या स्पेशल गाड्यांचे नियोजन ऐनवेळी का केले जाते?
कोकणकरांना त्यांचे हक्काचे टर्मिनस कधी भेटणार?
दक्षिणेकडील राज्यात जाणार्या गाड्यांत खूपच कमी कोटा उपलब्ध होत आहे. कोकणात टर्मिनस नसल्याने कोकणातील जनतेच्या हक्काच्या गाड्या मिळत नाहीत. त्यामुळे अजूनही त्यांना कोकणातील आपल्या गावी जाताना खूप हालअपेष्टा सहन करून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे टर्मिनस होणे ही तमाम कोकण करांची ईच्छा आहे.


