नवी दिल्ली:
भारतीय रेल्वेने रेल्वे तिकीट आरक्षणाच्या (Railway Reservation) प्रक्रियेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी आता आगाऊ आरक्षण कालावधीच्या (ARP) पहिल्या दिवशी तिकीट बुक करण्यासाठी ‘आधार प्रमाणीकरण’ (Aadhar Authentication) बंधनकारक करण्यात आले आहे. रेल्वे बोर्डाकडून या संदर्भात नवीन वेळापत्रक जारी करण्यात आले असून, हा बदल टप्प्याटप्प्याने लागू केला जाणार आहे.
नव्या निर्णयानुसार काय बदलणार?
आगाऊ आरक्षणाच्या पहिल्या दिवशी ऑनलाइन तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना त्यांचे आयआरसीटीसी (IRCTC) खाते आधारशी जोडणे आवश्यक असेल. हे नियम खालील तारखांपासून लागू होतील:
२९ डिसेंबर २०२५: सकाळी ०८:०० ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत केवळ आधार प्रमाणीकृत युजर्सच तिकीट बुक करू शकतील.
०५ जानेवारी २०२६: आधार प्रमाणीकरणाची ही वेळ वाढवून सकाळी ०८:०० ते दुपारी ०४:०० वाजेपर्यंत करण्यात येईल.
१२ जानेवारी २०२६: आगाऊ आरक्षणाच्या पहिल्या दिवशी पूर्ण वेळ (सकाळी ०८:०० ते रात्री १२:०० वाजेपर्यंत) केवळ आधार लिंक असलेल्या खात्यांवरूनच बुकिंग करता येईल.
काऊंटर बुकिंगवर परिणाम नाही
रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले आहे की, हा बदल केवळ ऑनलाइन आरक्षणासाठी (Online Booking) लागू आहे. रेल्वे स्थानकांवरील संगणकीकृत पीआरएस (PRS) काऊंटरवरून तिकीट बुक करण्याच्या पद्धतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
रेल्वे बोर्डाचे संचालक (पॅसेंजर मार्केटिंग) संजय मनोचा यांनी या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी कोणत्याही अडथळ्याविना तिकीट मिळवण्यासाठी आपले IRCTC खाते वेळेत आधारशी लिंक करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


