सावंतवाडी (सिंधुदुर्ग) – कणकवली तालुक्यातील फोंडाघाटजवळील घोणसरी-बोंडगवाडी परिसरात गेल्या आठ दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या बिबट्यांच्या कुटुंबातील एका बछड्याला वनविभागाने यशस्वीपणे जेरबंद केले आहे. ही कारवाई यशस्वी झाल्याने परिसरातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून, भीतीचे वातावरण काहीसे निवळले आहे.
घोणसरी गावातील बोंडगवाडी आणि पिंपळवाडी भागात गेल्या आठवड्यापासून बिबट्याची नर, मादी आणि दोन बछडे वावरत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले होते. विशेषतः सतीचे मंदिर ते बोंडगवाडी हा जंगलमय आणि निर्मनुष्य मार्गावर या बिबट्यांचे वारंवार दर्शन होत होते. यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती. कामानिमित्त बाहेर पडताना लोकांना एकटे जाणे धोकादायक वाटत असल्याने घोळक्याने प्रवास करावा लागत होता.
ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घोणसरीचे सरपंच प्रसाद राणे आणि पोलीस पाटील भालचंद्र राणे यांनी फोंडाघाट वनविभागाकडे बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत वनविभागाने परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आणि बिबट्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली. बिबट्याच्या शिकारी आणि वावराच्या आधारे गुरुवारी रात्री पिंजरा लावण्यात आला होता.
वनाधिकाऱ्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि पिंजऱ्यात बिबट्याचा एक बछडा अलगद अडकला. या बछड्याला सुरक्षितपणे ताब्यात घेऊन कोल्हापूर वनक्षेत्रात हलवण्यात आले आहे. ही यशस्वी मोहीम फोंडाघाटचे नूतन वनपाल सारीक फकीर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पार पाडली.
तथापि, एक बछडा जेरबंद झाला असला तरी नर-मादी बिबट्या आणि दुसरा बछडा परिसरात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी विशेषतः रात्रीच्या वेळी सतर्क राहावे आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.


