नवी दिल्ली:
कोकण रेल्वे हा कोकणच्या विकासाचा कणा आहे, मात्र सध्या हा मार्ग एकेरी असल्याने विकासाला मर्यादा येत आहेत. जोपर्यंत कोकण रेल्वेचे पूर्णतः दुहेरीकरण होत नाही, तोपर्यंत कोकणचा खऱ्या अर्थाने विकास होणार नाही, असे प्रतिपादन खासदार रवींद्र वायकर यांनी संसदेत केले.
रोहा ते मडगाव दुहेरीकरणासाठी निधीची मागणी
संसदेत २०२५-२६ च्या पुरवणी मागण्यांवर बोलताना वायकरांनी रेल्वे मंत्रालयाचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, “कोकण रेल्वेच्या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे ही आनंदाची बाब आहे, परंतु केवळ विद्युतीकरणाने प्रश्न सुटणार नाही. रोहा ते मडगाव या संपूर्ण पट्ट्यात रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण (Double Lining) करणे अत्यंत आवश्यक आहे.” यासाठी केंद्र सरकारने रेल्वे अर्थसंकल्पात विशेष तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली.
प्रवासाचा वेळ वाचणार
कोकण रेल्वेवर गाड्यांची संख्या वाढत असून एकेरी मार्गामुळे गाड्यांना क्रॉसिंगसाठी तासनतास थांबून राहावे लागते. दुहेरीकरणामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि मालवाहतुकीलाही गती मिळेल, ज्याचा थेट फायदा कोकणच्या अर्थव्यवस्थेला होईल असे त्यांचे मत आहे.
कोकणच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नासह वायकरांनी मुंबईच्या पायाभूत सुविधा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवरही संसदेत प्रभावीपणे बाजू मांडली.


