संगमेश्वर:
संगमेश्वर तालुक्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, रेल्वे बोर्डाने संगमेश्वर रोड स्थानकात दोन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मंजूर केला आहे. यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
या गाड्यांना मिळाला थांबा
रेल्वे बोर्डाने खालील दोन एक्स्प्रेस गाड्यांना संगमेश्वर येथे थांबण्यास हिरवा कंदील दाखवला आहे:
१. गाडी क्रमांक २०९१०/२०९०९: पोरबंदर – कोचीवेली साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस.
२. गाडी क्रमांक १९५७७/१९५७८: जामनगर – तिरुनलवेली द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस.
दोन वर्षांचा संघर्ष यशस्वी
’निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर (रेल्वे)’ या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून या थांब्यांसाठी मागणी केली जात होती. यासाठी संघटनेने केवळ पत्रव्यवहारच केला नाही, तर भेटीगाठी, आंदोलने आणि उपोषणासारखे मार्ग अवलंबून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते. तीन वर्षांपूर्वी नेत्रावती एक्स्प्रेसला थांबा मिळवून दिल्यानंतर, आता या दोन गाड्यांच्या थांब्यामुळे संघटनेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे मानले आभार
या यशाबद्दल बोलताना संघटनेने केंद्रीय रेल्वे मंत्रालय, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, आमदार शेखर निकम, रेल्वे बोर्ड आणि कोकण रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत. तसेच संघर्षाच्या काळात खंबीरपणे पाठीशी उभे राहणाऱ्या संगमेश्वर तालुक्यातील प्रवाशांचे आणि जनतेचेही संघटनेच्या वतीने ऋण व्यक्त करण्यात आले.
२६ डिसेंबरला होणार जल्लोषात स्वागत
या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि नवीन गाड्यांचे स्वागत करण्यासाठी २६ डिसेंबर २०२५ रोजी संगमेश्वर रेल्वे स्थानकात एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर (रेल्वे)’ फेसबुक ग्रुपतर्फे जल्लोषात स्वागत केले जाणार असून, या कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती संघटनेचे प्रमुख संदेश जिमन यांनी दिली.
या यशाबद्दल संदेश जिमन आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे संपूर्ण संगमेश्वर तालुक्यातून अभिनंदन होत आहे.


