मुंबई: मुंबईहून कोकण आणि किनारपट्टी कर्नाटककडे जाणाऱ्या दोन महत्त्वाच्या गाड्या पुन्हा एकदा पनवेलला ‘शॉर्ट-टर्मिनेट’ करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे प्रवाशाची गैरसोय होत असून रेल्वेच्या दीर्घकालीन हेतूंवरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे.
दिनांक १ जानेवारी २०२६ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत नेत्रावती एक्सप्रेस (१६३४५/१६३४६) आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस (१२६१९/१२६२०) लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ऐवजी पनवेलपर्यंतच धावणार आहेत.
मध्य रेल्वेने ‘एलटीटी’ यार्डातील पिट लाईन क्रमांक ३ च्या देखभालीचे कारण देऊन या गाड्या महिनाभर पनवेलला थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोकण विकास समितीने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे ४० दिवस गाड्या रोखण्यात आल्या होत्या. रेल्वे प्रवाशांना हळूहळू पनवेल टर्मिनसची सवय लावून या गाड्या कायमस्वरूपी तिथूनच चालवण्याचा घाट घातला जात असल्याची भीती समितीने व्यक्त केली आहे.
पूर्वी रत्नागिरी-दादर पॅसेंजर कोव्हिडचे कारण देऊन तात्पुरत्या काळासाठी दादर ऐवजी दिवा स्थानकापर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला गेला होता. मात्र कोव्हिड काळानंतर ही ट्रेन कायमची दिवा स्थानकावर हलवण्यात आली. यामुळे मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. आता तोच प्रकार आता नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या बाबतीत तर होणार नाही ना? अशी भीती समितीने व्यक्त केली आहे.
पनवेलला गाडी थांबल्यामुळे वृद्ध, महिला आणि जड सामान असलेल्या प्रवाशांना लोकलने पुढचा प्रवास करणे जिकिरीचे ठरत आहे. खाजगी वाहनांनी प्रवास करताना वेळ आणि पैसा यांचा मोठा फटका बसत आहे.
कोकण विकास समितीचे जयवंत शंकर दरेकर आणि अक्षय मधुकर महापदी यांनी रेल्वे प्रशासनाकडे एक व्यावहारिक पर्याय मांडला आहे:
सध्या नेत्रावती आणि मत्स्यगंधा गाड्यांचे रेक एलटीटी स्थानकावर उभे करून ठेवावे लागतात. या दोन्ही गाड्यांच्या रेकचे (Rake Linking) एकत्रीकरण करून त्या ‘प्लॅटफॉर्म-रिटर्न’ पद्धतीने चालवाव्यात. यामुळे गाड्यांना बराच वेळ यार्डात उभं राहण्याची गरज उरणार नाही आणि पिट लाईनवरील ताणही कमी होईल.
समितीच्या प्रमुख मागण्या:
समितीने रेल्वे प्रशासनाला पाठवलेल्या निवेदनात खालील मागण्या केल्या आहेत.
१. नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या रेक लिंकिंग प्रस्तावाला त्वरित मंजुरी द्यावी.
२. मध्य रेल्वे, कोकण रेल्वे आणि दक्षिण रेल्वेची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न कायमचा निकाली काढावा.
३. तात्पुरत्या कामांचे कारण देऊन प्रवाशांच्या हक्काच्या मुंबई जोडणीला कायमस्वरूपी सुरुंग लावू नये.
याप्रश्नी रेल्वे प्रशासन आता काय भूमिका घेते, याकडे हजारो प्रवाशांचे लक्ष लागले आहे.


