सावंतवाडी: महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘शक्तीपीठ महामार्गा’च्या मूळ आराखड्यात बदल करण्याचे संकेत मिळाल्यानंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेमक्या कोणत्या गावांतून हा मार्ग जाणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या मार्गात बदल करण्याचे स्पष्ट केले असले तरी, स्थानिक प्रशासनाकडे अद्याप नवीन बदलांचे कोणतेही लेखी निर्देश प्राप्त झालेले नाहीत.
नव्या बदलांनुसार जिल्ह्यातील गावांची नेमकी स्थिती काय असेल, याबाबत खातरजमा करण्यासाठी येथील स्थानिक शासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी अद्याप नवीन सर्वेक्षण किंवा भूसंपादनाबाबत वरिष्ठांकडून कोणतेही आदेश आले नसल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकारी कार्यालयाकडून अधिकृत सूचना मिळाल्यावरच पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
शक्तीपीठ महामार्गाचा जुना आराखडा हा पवनार (वर्धा) ते पत्रादेवी (गोवा) असा ८०२ किमीचा प्रस्तावित आहे. या जुन्या आराखड्यानुसार हा मार्ग महाराष्ट्रातील १२ जिल्हे, ३९ तालुके आणि ३७० गावांमधून जाणार आहे. या प्रकल्पामुळे सुपीक जमिनी आणि पर्यावरणाचे नुकसान होईल, या भीतीने स्थानिक शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी यापूर्वीच मोठा विरोध दर्शवला होता.
महामार्गाच्या आराखड्यात बदल होणार असल्याची चर्चा सुरू झाल्यापासून सिंधुदुर्गातील गावांमधील लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. नक्की कोणत्या जमिनी संपादित केल्या जातील आणि कोणाचे घर किंवा शेती वाचेल, याबाबत स्पष्टता नसल्यामुळे लोकांची ‘धाकधूक’ वाढली आहे.
जोपर्यंत सरकार नवीन नकाशा किंवा लेखी आदेश प्रसिद्ध करत नाही, तोपर्यंत हा संभ्रम असाच कायम राहण्याची शक्यता आहे.


