दादर – रत्नागिरी पॅसेंजरने ‘स्लॉट’ गमावला! मुंबई-कोकणातील लाखो प्रवाशांच्या नाकावर टिच्चून दादर-गोरखपूर एक्सप्रेस कायमस्वरूपी

   Follow us on        

मुंबई : मुंबई आणि कोकणातील लाखो प्रवाशांच्या नाकावर टिच्चून मध्य रेल्वेने दादर-रत्नागिरी पॅसेंजरच्या स्लॉटवर आता दादर-गोरखपूर एक्सप्रेस कायमस्वरूपी चालवण्यास मंजुरी दिली आहे. हा मोठा धक्का देणारा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार रवी किशन यांना दिलेल्या अधिकृत पत्रातून ही माहिती समोर आली आहे. विशेष गाडी क्रमांक ०१०२७/०१०२८ ला नियमित दर्जा देऊन ती आता ११०४७/११०४८ दादर-गोरखपूर एक्सप्रेस म्हणून चालवली जाणार आहे. या निर्णयामुळे उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठी सुविधा मिळेल, असा दावा करण्यात आला आहे.

या निर्णयावर माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी कोकणातील प्रवाशांच्या अडचणींचा मुद्दा उपस्थित करत तात्काळ सुधारणा करण्याची मागणी केली आहे. विशेषतः कामगार वर्ग आणि स्थानिक प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, दादर-रत्नागिरी गाडीचा मार्ग पूर्णपणे बंद झाल्याने आता ही सेवा दिवा कायमस्वरूपी स्थानकावरून चालवली जाणार आहे. ही गाडी दादर पर्यंत पूर्ववत होण्याची आशाही आता नष्ट झाली आहे.

दादर-रत्नागिरी पॅसेंजर कोरोनापूर्वी दादर ते रत्नागिरी दरम्यान चालविण्यात येत होती. मात्र कोरोना काळात ‘झिरो टाइमटेबल’ च्या नावाखाली दिवा स्थानकापर्यंत मर्यादित करण्यात आली. मात्र त्यानंतर प्रवासी संघटनांनी वारंवार मागणी करूनही आजतागायत तिची सेवा पूर्ववत करण्यात आली नव्हती. ही गाडी दादर पर्यंत नेण्यासाठी स्लॉट उपलब्ध नसल्याचे कारण यासाठी देण्यात येत होते. मात्र त्याच स्लॉटवर विशेष गाडी ०१०२७/०१०२८ दादर-गोरखपूर ही चालविण्यात आली. याविरोधात प्रवासी संघटना आक्रमक झाल्या होत्या. या विरोधात मोर्चाही काढण्यात आला होता आणि दादर – रत्नागिरी पॅसेंजर गाडी पूर्ववत करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली होती. मात्र आता हा स्लॉट कायमस्वरूपी दादर-गोरखपूर एक्सप्रेसला दिल्याने त्या मागणीला केराची टोपली दाखविली गेल्याचे दिसत आहे.

या बदलामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वेने ऑपरेशनल कार्यक्षमतेचा दाखला देत हा निर्णय घेतला असला, तरी स्थानिक प्रवाशांच्या सोयींचा विचार न केल्याची टीका होत आहे. आपली हक्काची गाडी मुंबई बाहेर नेवून त्याजागी ही लांब पल्ल्याची गाडी कायम केल्याने प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search