Author Archives: Kokanai Digital

Mumbai Local: ‘बंगाली बाबा’च्या जाहिरातींविरुद्ध रेल्वेची मोठी कारवाई

   Follow us on        

मुंबई: मुंबईतील लोकल गाड्यांच्या डब्यांमध्ये अवैधपणे लावल्या जाणाऱ्या ‘बंगाली बाबा’ आणि कथित तांत्रिक-मांत्रिकांच्या जाहिरातींविरुद्ध मध्य रेल्वे (CR) आणि पश्चिम रेल्वेने (WR) विशेष मोहीम हाती घेतली आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांची दिशाभूल करणाऱ्या आणि रेल्वेच्या मालमत्तेचे विद्रुपीकरण करणाऱ्या या पोस्टर्सना हटवण्यासाठी सुरक्षा दलांकडून कठोर पावले उचलली जात आहेत. या मोहिमेअंतर्गत गेल्या काही दिवसांत हजारो अवैध पोस्टर्स काढून टाकण्यात आले असून, हे पोस्टर्स चिटकवणाऱ्या टोळ्यांचा शोध घेतला जात आहे.

​रेल्वे पोलिसांनी केवळ जाहिराती काढण्यावरच भर दिला नाही, तर या पोस्टर्सवर असलेल्या मोबाईल क्रमांकांच्या आधारे संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासही सुरुवात केली आहे. अनेकदा अशा जाहिरातींच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रवाशांची फसवणूक केली जाते, त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अशा भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच, डब्यांमध्ये कोणीही अशा प्रकारे अनधिकृत पोस्टर्स लावताना आढळल्यास प्रवाशांनी तातडीने रेल्वे हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, जेणेकरून या प्रकारांना कायमचा आळा घालता येईल.

मध्य रेल्वेच्या ७२ लोको पायलट्सचा स्वेच्छानिवृत्तीसाठी सामूहिक अर्ज; कारण काय?

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील ७२ मेल आणि एक्सप्रेस लोको पायलट्सनी (रेल्वे चालक) सामूहिकपणे स्वेच्छानिवृत्तीसाठी (VRS) अर्ज सादर केल्याने खळबळ उडाली आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या समस्या आणि कामाच्या ठिकाणची असुरक्षित परिस्थिती यामुळे आता सेवा सुरू ठेवणे व्यावसायिकदृष्ट्या अशक्य असल्याचे या चालकांनी म्हटले आहे. मंगळवारी विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) आणि महाव्यवस्थापक कार्यालयाकडे हे अर्ज सुपुर्त करण्यात आले असून, यात प्रामुख्याने खाण्यापिण्याच्या सुमार सुविधा, विश्रांतीगृहांची दुरवस्था आणि प्रशासकीय दबावाचा उल्लेख करण्यात आला आहे.

​लोको पायलट्सनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, ड्युटीदरम्यान मिळणारे जेवण अत्यंत निकृष्ट आणि अस्वच्छ असते, ज्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच, धावत्या ड्युटीनंतर विश्रांतीसाठी असलेल्या ‘रनिंग रूम्स’मध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असून तिथे स्वच्छता राखली जात नाही. रेल्वेच्या पायाभूत सुविधांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले असून, रात्रीच्या वेळी लोबी आणि शेड्सपर्यंत जाण्यासाठी सुरक्षित मार्ग आणि पुरेशा प्रकाशाची व्यवस्था नसल्याने अपघाताची भीती व्यक्त केली आहे. याशिवाय, वरिष्ठ अधिकार्‍यांकडून होणारा मानसिक त्रास आणि कामाच्या वाढत्या दबावामुळे वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यावर ताण येत असल्याचे या अर्जात म्हटले आहे.

​नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने (NRMU) या प्रकरणाची गंभीर दखल घेत रेल्वे प्रशासनाला इशारा दिला आहे. युनियनचे सरचिटणीस वेणू पी. नायर यांनी म्हटले आहे की, ही घटना म्हणजे रेल्वे प्रशासनासाठी एक धोक्याची घंटा असून, सुरक्षिततेशी संबंधित कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची होणे हे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि रेल्वेच्या कार्यक्षमतेसाठी घातक ठरू शकते. युनियनने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची आणि कर्मचाऱ्यांच्या सुविधांमध्ये तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे. वारंवार दाद मागूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळेच कर्मचाऱ्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.

मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सुरुवातीला अवजड वाहनांना ‘नो एंट्री’ ची मागणी

   Follow us on        

मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने सुरुवातीचे सहा महिने केवळ प्रवासी वाहनांनाच या मार्गावरून वाहतूक करण्याची परवानगी द्यावी, अशी महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई पवार तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) चे उपाध्यक्ष श्री. अनिल गायकवाड यांना पत्र पाठवून लक्ष वेधण्यात आले आहे. नव्याने सुरू होणाऱ्या या अत्याधुनिक मार्गावर सुरक्षेची संपूर्ण खात्री होईपर्यंत जड वाहने व मालवाहतूक तात्पुरती बंद ठेवणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प हा राज्यातील अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि अभियांत्रिकी दृष्ट्या जटिल प्रकल्प मानला जातो. या प्रकल्पामुळे मुंबई–पुणे प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होणार असून बोर घाटातील वळणावळणाच्या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र या मार्गावर बोगदे, उंच पूल, खोल दऱ्या तसेच हवामानातील बदल यांसारख्या संवेदनशील बाबी लक्षात घेता सुरुवातीच्या काळात वाहतुकीचे नियोजन अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने नव्या मार्गावरील सर्व तांत्रिक यंत्रणा, वाहतूक नियंत्रण व्यवस्था, आपत्कालीन सेवा, तसेच रस्त्याची प्रत्यक्ष परिस्थिती यांची चाचणी प्रत्यक्ष वापरातून होणे आवश्यक असते. त्यामुळे सुरुवातीच्या सहा महिन्यांत केवळ हलकी व प्रवासी वाहने चालू दिल्यास मार्गाची क्षमता, सुरक्षा व्यवस्था आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा यांचे प्रभावी मूल्यमापन करता येईल, असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. विशेषतः जड मालवाहतूक किंवा ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या वाहनांमुळे संभाव्य अपघातांचा धोका वाढू शकतो, त्यामुळे त्यांना तात्पुरती परवानगी देऊ नये, अशीही सूचना करण्यात आली आहे.

या मागणीमागील मुख्य उद्देश म्हणजे प्रवाशांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित करणे आणि नव्या मार्गावर कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी खबरदारी घेणे हा आहे. संबंधित यंत्रणांनी या सूचनेचा गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली असून ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या सुरळीत आणि सुरक्षित प्रारंभासाठी हा निर्णय उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

सिंधुदुर्गातील चार ऐतिहासिक समुद्री किल्ल्यांच्या संशोधनासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर

   Follow us on        

मालवण, १९ फेब्रुवारी २०२६: छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाचे संवर्धन आणि शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट या चार प्रमुख समुद्री किल्ल्यांच्या सखोल अभ्यास, दस्तावेजीकरण आणि संशोधनासाठी मुंबई विद्यापीठांतर्गत मालवण येथे स्वतंत्र अध्यासन केंद्र (Study Centre) उभारण्यास मंजुरी मिळाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने या प्रकल्पासाठी ५० लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. हे केंद्र मालवणात स्थापन होणार असून, शिवकालीन व्यापार, आरमार व्यवस्था, या किल्ल्यांच्या रणनीतिक महत्त्व आणि ऐतिहासिक दस्तऐवजांचा वैज्ञानिक अभ्यास होईल. यामुळे युवा संशोधकांना मार्गदर्शन, व्याख्याने, संशोधन प्रकल्प आणि या वारशाचे जागतिक स्तरावर प्रसार होण्यास मदत होईल.

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या पुढाकाराने आणि प्रस्तावानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी एप्रिल २०२५ मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याच्या ३५८व्या वर्धापन दिनी या केंद्राची घोषणा करण्यात आली होती. आता निधी मंजुरीमुळे प्रकल्पाला प्रत्यक्ष गती मिळाली आहे.पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी या निर्णयाचे स्वागत करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री आशिष शेलार आणि महायुती सरकारचे आभार मानले आहेत.

या केंद्रामुळे शिवरायांच्या दूरदृष्टी आणि पराक्रमाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचेल आणि सिंधुदुर्गच्या सागरी वारशाला नवे आयाम मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.हे केंद्र केवळ संशोधनापुरते मर्यादित न राहता, स्थानिक इतिहासप्रेमी, विद्यार्थी आणि पर्यटन क्षेत्रालाही फायदेशीर ठरेल.

 

 

Megablock News: दिवा-वसई रोड रेल्वे मार्गावर ट्रॅफिक ब्लॉक; वीकेंडला अनेक गाड्या रद्द

   Follow us on        

मुंबई: खारबाव येथे नवीन मालवाहू मार्गिकेच्या (Goods Line) कामासाठी दिवा-वसई रोड विभागामध्ये १६ ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी या मार्गावरील प्रवासी रेल्वे सेवांवर मोठा परिणाम होणार असून अनेक मेमू (MEMU) गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

​पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाधित होणाऱ्या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

​रद्द करण्यात आलेल्या गाड्या (२१ फेब्रुवारी, २०२६)

​१. गाडी क्र. ६१००७: वसई रोड – दिवा मेमू (दुपारी १५:३५ वा.)

२. गाडी क्र. ६९१६६: वसई रोड – पनवेल मेमू (दुपारी १६:४० वा.)

३. गाडी क्र. ६१००६: दिवा – वसई रोड मेमू (दुपारी १४:३३ वा.)

४. गाडी क्र. ६९१६१: पनवेल – डहाणू रोड मेमू (संध्याकाळी १९:०५ वा.)

​रद्द करण्यात आलेल्या गाड्या (२२ फेब्रुवारी, २०२६)

​१. गाडी क्र. ६१००१: बोईसर – वसई रोड मेमू (सकाळी ०८:३५ वा.)

२. गाडी क्र. ६१००२: डोंबिवली – बोईसर मेमू (सकाळी ०५:४९ वा.)

३. गाडी क्र. ६१००३: वसई रोड – दिवा मेमू (सकाळी ०९:५० वा.)

​वेळेत बदल आणि नियमन (Regulation)

​सिकंदराबाद – राजकोट एक्सप्रेस (२२७१८): २१ फेब्रुवारी रोजी सुटणारी ही गाडी भिवंडी रोड स्थानकावर १ तास ३० मिनिटे थांबवून (Regulated) चालवण्यात येईल.

​वेरावळ – पुणे एक्सप्रेस (११०८७): २१ फेब्रुवारी रोजी ही गाडी तिच्या नियोजित वेळेपेक्षा (११:०५ वा.) उशिरा म्हणजेच दुपारी १४:३५ वाजता वेरावळ येथून सुटेल.

​इंदूर – दौंड एक्सप्रेस (२२९४४): २१ फेब्रुवारी रोजी ही गाडी नियोजित वेळेऐवजी (१६:३० वा.) संध्याकाळी १८:३० वाजता इंदूर येथून सुटेल.

​खारबाव येथील नवीन ‘अप’ आणि ‘डाऊन’ मालवाहू मार्गिकेच्या कार्यान्वयनासाठी (Commissioning) हा ब्लॉक अत्यंत आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी या बदलांची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Mumbai Local: सीएसएमटी-कुर्ला ५ व्या व ६ व्या मार्गीकेचा ‘मार्ग’ मोकळा; ५०० हून अधिक बांधकामे जमीनदोस्त

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कुर्ला दरम्यानची पाचवी आणि सहावी रेल्वे मार्गिका गेल्या १६ वर्षांपासून रखडली होती. मात्र, नुकत्याच राबवण्यात आलेल्या बांधकाम हटाव विशेष मोहिमेमुळे या प्रकल्पाला आता गती मिळाली आहे.

रेल्वे प्रशासनाने शीव आणि माटुंगा दरम्यान असलेल्या सुमारे ५०० हून अधिक अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई केली असून, यामुळे सुमारे १,८८० चौरस मीटरचा परिसर मोकळा झाला आहे.

या प्रकल्पामुळे लोकल आणि मेल-एक्स्प्रेसचा वक्तशीरपणा वाढण्यास मदत होणार असून लोकलच्या फेऱ्यांमध्येही वाढ करणे शक्य होईल.

हा प्रकल्प कुर्ला ते परळ (१०.१० किमी) आणि परळ ते सीएसएमटी (७.४ किमी) अशा दोन टप्प्यांत विभागला गेला आहे. भूसंपादन आणि पुनर्वसनाच्या अडथळ्यांमुळे रखडलेल्या या कामासाठी आता टाटा कंपनीच्या उच्च दाबाच्या वीजवाहिन्या आणि टॉवरचे स्थलांतर करण्याचे नियोजन आहे. याशिवाय, दादर येथे नवीन फलाट बांधण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या जमिनीचे हस्तांतरण आणि काही वसाहतींचे स्थलांतर करणे अपेक्षित आहे, ज्यासाठी मध्य रेल्वेने निधी देण्याचे मान्य केले आहे.

या कारवाईमुळे अनेक वर्षांची प्रतीक्षा संपण्याची चिन्हे दिसत असून प्रकल्पाचे उर्वरित काम वेगाने पूर्ण होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

तुतारी एक्सप्रेसमध्ये चोरीचा प्रयत्न फसला; सतर्क टीसीमुळे दोन चोरटे जेरबंद

   Follow us on        

पनवेल: कोकण रेल्वेच्या सतर्क कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे ११०१४ तुतारी एक्सप्रेसमधील चोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडण्यात यश आले आहे. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ४:३० च्या सुमारास, तुतारी एक्सप्रेस रोहा स्थानक ओलांडल्यानंतर ही घटना घडली. रत्नागिरीचे तिकीट परीक्षक (TTE) श्री. सचिन सावेकर हे डबा क्रमांक S2, S3 आणि S4 मध्ये तिकीट तपासणी करत असताना त्यांना दोन व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. सावेकर यांनी प्रसंगावधान राखून आणि इतर प्रवाशांच्या मदतीने या संशयितांना तात्काळ ताब्यात घेतले.

तपासणी दरम्यान असे निष्पन्न झाले की, या आरोपींनी एका महिला प्रवाशाची हॅन्डबॅग चोरली होती. त्यांच्याकडून चोरीला गेलेले साहित्य हस्तगत करण्यात आले असून, यामध्ये एक मंगलसूत्र, दोन जोड कानातले, ४,७५० रुपये रोख आणि एक मोबाईल फोन यांचा समावेश आहे. दरम्यान, प्रवाशाने तक्रार केलेली एक अंगठी मात्र सापडू शकली नाही. यानंतर आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी पनवेल येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) स्वाधीन करण्यात आले आहे.

श्री. सचिन सावेकर यांनी दाखवलेली सतर्कता आणि कर्तव्यतत्परतेची दखल घेत कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संतोष कुमार झा यांनी त्यांचे कौतुक केले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दाखवलेल्या या विशेष कार्याबद्दल सावेकर यांना १०,००० रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. कोकण रेल्वेने यानिमित्ताने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचे पुनरुच्चारले असून, प्रवाशांनी कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती रेल्वे कर्मचारी किंवा आरपीएफला देण्याचे आवाहन केले आहे.

राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्च रोजी निवडणूक; महाराष्ट्रातील ७ खासदारांचा कार्यकाळ संपणार

   Follow us on        

नवी दिल्ली: भारतीय निवडणूक आयोगाने एप्रिल २०२६ मध्ये निवृत्त होणाऱ्या १० राज्यांमधील राज्यसभेच्या ३७ जागांसाठीनि वडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या प्रक्रियेची अधिसूचना २६ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार असून, १६ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान पार पडेल. मतदानानंतर त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी केली जाईल. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवण्यासाठी केवळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पुरवलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर करणे अनिवार्य असेल.

​या निवडणुकीत महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक ७ जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून डॉ. भगवत किशनराव कराड, डॉ. (श्रीमती) फौजिया तहसीन अहमद खान, प्रियांका विक्रम चतुर्वेदी, शरदचंद्र गोविंदराव पवार, धैर्यशील मोहन पाटील, रजनी अशोकराव पाटील आणि रामदास बंधू आठवले हे सदस्य निवृत्त होत आहेत. याशिवाय, ओडिशा राज्यातून ममता मोहंता, मुजीबुल्ला खान, सुजीत कुमार आणि निरंजन बिशी हे ४ सदस्य, तर तामिळनाडूमधून एन.आर. इलांगो, पी. सेल्वारासू, एम. थंबीदुराई, तिरुची शिवा, डॉ. कनिमोझी एनव्हीएन सोमू आणि जी.के. वासन हे ६ सदस्य निवृत्त होत आहेत.

​पश्चिम बंगालमधील साकेत गोखले, ऋतब्रत बॅनर्जी, विकास रंजन भट्टाचार्य, सुब्रत बक्षी आणि ५ जानेवारी २०२६ पासून रिक्त झालेली मौसम नूर यांची जागा अशा एकूण ५ जागांसाठी निवडणूक होईल. बिहारमधून अमरेंद्र धारी सिंग, प्रेमचंद गुप्ता, रामनाथ ठाकूर, उपेंद्र कुशवाहा आणि हरिवंश नारायण सिंग हे ५ सदस्य निवृत्त होत आहेत. आसाममधील रामेश्वर तेली, भुवनेश्वर कलिता आणि अजित कुमार भुयान यांच्या ३ जागांसाठी मतदान होईल. तसेच छत्तीसगडमधून कवी तेजपाल सिंग तुलसी व फुलोदेवी नेताम, हरियाणातून किरण चौधरी व राम चंदर जांगडा आणि तेलंगणातून डॉ. अभिषेक मनू सिंघवी व के.आर. सुरेश रेड्डी या प्रत्येकी दोन सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. हिमाचल प्रदेशमधून इंदू बाला गोस्वामी या एकमेव सदस्या निवृत्त होत आहेत. या सर्व ३७ जागांसाठी २० मार्च २०२६ पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

Mumbai Water Metro: मुंबईत धावणार ‘जल मेट्रो’! मंत्री नितेश राणेंचा मास्टर प्लॅन तयार; आठ मार्ग प्रस्तावित

   Follow us on        

मुंबई: मुंबईतील रस्ते आणि लोकल ट्रेनमधील वाढती गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने आता जलवाहतुकीवर लक्ष केंद्रित केले असून, ‘मुंबई जल मेट्रो’ (Mumbai Water Metro) हा प्रकल्प मुंबईकरांसाठी गेमचेंजर ठरणार आहे. बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा मांडला असून, कोची जल मेट्रोच्या धर्तीवर मुंबईतही ही सेवा सुरू केली जाणार आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर २०२६ पर्यंत प्रत्यक्षात सुरू करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. सुमारे १,२०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई ते पश्चिम उपनगरे आणि नवी मुंबई हा प्रवास अत्यंत सुलभ आणि वेगवान होणार आहे.

​या प्रकल्पांतर्गत एकूण ८ महत्त्वाचे जलमार्ग निश्चित करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात नरिमन पॉइंट, वरळी, वांद्रे, जुहू आणि वर्सोवा यांसारख्या पश्चिम किनारपट्टीवरील महत्त्वाच्या भागांना जल मेट्रोने जोडले जाईल. विशेष म्हणजे, गेटवे ऑफ इंडिया ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा प्रवास या मेट्रोमुळे अवघ्या ४० मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. यामुळे विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीतून मोठी सुटका मिळेल. याशिवाय, भविष्यात बोरिवली, वसई, मीरा-भाईंदर, कल्याण आणि ऐरोली या भागांनाही या जाळ्यात समाविष्ट केले जाणार आहे.

​पर्यावरणाचा विचार करून ही जल मेट्रो पूर्णपणे बॅटरीवर चालणारी आणि प्रदूषणमुक्त असेल. एका वेळी ५० ते १०० प्रवाशांना घेऊन जाण्याची क्षमता असलेल्या या वातानुकूलित बोटी असतील. २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) सादर केला जाणार असून, आगामी राज्याच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी मोठ्या निधीची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. मुंबईची भौगोलिक स्थिती पाहता, जलवाहतुकीचा हा पर्याय मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी आणि इंधन बचतीसाठी एक मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.

Ro Ro Service: मुंबई – विजयदुर्ग रो-रो सेवेचा मुहूर्त ठरला; असे असतील तिकीटदर

   Follow us on        

मुंबई: मुंबईकरांसाठी आणि कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग हे अंतर आता केवळ ५ तासांत पार करणे शक्य होणार आहे. रस्ते मार्गे या प्रवासासाठी साधारण १० ते १२ तास लागतात, मात्र एप्रिल २०२६ पासून सुरू होणाऱ्या ‘रो-रो फेरी’ (Ro-Ro Ferry) सेवेमुळे प्रवाशांचा वेळ निम्म्याने वाचणार आहे. ही सेवा थेट मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान चालवली जाणार असून, यामुळे कोकणच्या किनारपट्टीवरील पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.

​या रो-रो सेवेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रवाशांना त्यांच्या स्वतःच्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांसह प्रवास करता येणार आहे. यामुळे प्रवाशांना कोकणात पोहोचल्यावर स्वतःच्या गाडीने फिरणे सोपे जाईल. या जहाजांमध्ये प्रवाशांच्या आरामासाठी वातानुकूलित व्यवस्था, कॅफेटेरिया आणि विस्तीर्ण डेकची सुविधा असणार आहे, ज्यामुळे प्रवासाचा आनंद द्विगुणित होईल.

​तिकीट दरांबाबत बोलायचे झाले तर, अद्याप अधिकृत दरपत्रक जाहीर झाले नसले तरी प्राथमिक माहितीनुसार, एका प्रवाशासाठी साधारण ८०० ते १,२०० रुपयांपर्यंत तिकीट असू शकते. वाहनांसाठीचे शुल्क त्यांच्या आकारानुसार वेगळे आकारले जाईल; ज्यामध्ये दुचाकीसाठी ५०० ते ८०० रुपये आणि चारचाकी गाड्यांसाठी २,५०० ते ४,००० रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. लांबचा प्रवास आणि इंधनाचा खर्च विचारात घेता, ही सेवा सर्वसामान्यांसाठी फायदेशीर ठरेल असा अंदाज आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search