Category Archives: कोकण
मुंबई:होळीचा सण आणि लागोपाठ तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी जायला निघाला असल्याने पुढील तीन ते चार दिवसांत कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचे वेटिंग तिकीटही मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे चाकरमान्यांना वाहतुकींच्या अन्य पर्यायांकडे वळावे लागणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील नियमित गाड्यांच्या दिनांक 22, 23 आणि 24 या दिवसांच्या आरक्षणाची स्थिती पाहता मांडवी आणि जनशताब्दी या गाड्यांच्या सेकंड स्लीपर श्रेणीचे आरक्षण Regret असे दाखवत असून तुतारी, कोकणकन्या आणि एलटीटी मडगाव गाड्यांच्या आरक्षणाची स्थितीही जवळपास 400 वेटिंग लिस्ट असल्याने ती Regret होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसते.
रेल्वे प्रशासनाने या मार्गावर काही विशेष गाड्या चालविल्या असल्या तरी त्या अपुऱ्या पडत आहेत. या गाड्यांच्या आरक्षणाची स्थितीही 200 वेटिंग लिस्ट वर पोहोचली आहे. विशेष गाड्या सोडताना रेल्वे प्रशासनाने योग्य नियोजन केले नसल्याचा आरोप प्रवासी संघटनाकडून होत आहे. खास शिमग्यासाठी विस्तारित केलेली रोहा चिपळूण गाडी रद्द करण्यात आली पण तिच्या बदल्यात दादर ते चिपळूण/रत्नागिरी अनारक्षित गाडी चालवणे अपेक्षित होते,तशी मागणी प्रवासी संघटनांनी निवेदने देवून केली होती. मात्र त्या मागणीला रेल्वे प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे.
सध्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांकडे दोन पर्याय उपलब्ध आहेत. कोकण रेल्वेने गर्दीतून, हालअपेष्टा सहन करत गाव गाठायचे किंवा हंगामाचा फायदा घेऊन लुटणाऱ्या खासगी वाहनातून परवडत नसले तरीही प्रवास करणे.
नियमित गाड्यांच्या आरक्षणाची सध्याची स्थिती
Train Name | 22-Mar | 23-Mar | 24-Mar |
11003 – TUTARI EXPRESS | WL223 | WL394 | WL395 |
11099 – LTT MADGAON EXP | WL108 | WL392 | WL357 |
12051 – MAO JANSHATABDI | REGRET | WL400 | REGRET |
10105 – DIVA SWV EXPRESS | WL106 | WL241 | WL254 |
10103 – MANDOVI EXPRESS | WL262 | REGRET | REGRET |
20111 – KONKAN KANYA EXP | WL396 | WL397 | WL280 |

Konkan Railway News : स्लीपर डब्यांना मोठी मागणी असूनही या डब्यांचे रूपांतर replacement एसी कोच मध्ये करत असल्याचा आरोप रेल्वे प्रशासनवर होत असताना सामान्य प्रवाशांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या 16336 /16335 नागरकोईल – गांधीधाम एक्सप्रेस या गाडीच्या स्लीपर कोच मध्ये वाढ करण्यात आलेली आहे. ही गाडी सध्या एकूण 11 स्लीपर कोचसहित धावत आहे त्यामध्ये एका स्लीपर कोचची वाढ करून 12 एवढी करण्यात आली आहे.
गाडी क्रमांक 16336 नागरकोईल – गांधीधाम एक्सप्रेस ही गाडी दिनांक 19 मार्च 2024 तर गाडी क्रमांक 16335 गांधीधाम नागरकोईल एक्सप्रेस दिनांक 22 मार्च 2024 रोजीपासून या बदलासह चालविण्यात येणार आहे.
ही गाडी कोकणात वसई, भिवंडी, पनवेल , माणगाव, चिपळूण, रत्नागिरी या स्थानकावर थांबे घेते.
Video | रूळ ओलांडण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी; रेल्वे प्रशासन दुर्घटनेच्या प्रतीक्षेत? – Kokanai
सविस्तर वृत्त 👇🏻https://t.co/P9Sf89obRY#konkanrailway #vaibhavwadi pic.twitter.com/J3YLkPLgj6
— Kokanai Live News – knowledge – Entertainment (@kokanai21) March 17, 2024





सिंधुदुर्ग :दोडामार्ग तालुक्यातील तळकट-खडपडे-कुभंवडे रस्त्यावर शनिवारी सकाळी नागरिकांना वाघाचे दर्शन झाले या भागात पूर्वीपासून वाघाचे अस्तित्व आहे . दोडामार्ग तालुक्याचे जैवविविधतेच्या दृष्टीने असलेले महत्त्व यापूर्वी देखील अधोरेखित झाले आहे.
दोडामार्ग तालुक्याला सावंतवाडी तालुक्याशी जोडण्यासाठी तळकट येथून चौकुल येथे जाणारा कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याला लागून राखीव जंगलाचे काही क्षेत्र आहे. रात्री-अपरात्री या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांना वन्यजीवांचे दर्शन होत असते. शनिवारी सकाळी या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांना पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. त्यांनी लागलीच या वाघाचे छायाचित्र आणि व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपले. वन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छायाचित्रित झालेल्या वाघाचे लिंग हे मादी असून पूर्वीपासून या मादीचा वावर या परिसरात आहे.
तळकट पंचक्रोशीत समृद्ध जंगल आहे; मात्र या भागात खनिज प्रकल्पांसाठी गेली अनेक वर्षे मायनिंग लॉबी प्रयत्न करत आहे. पश्चिम घाट अभ्यास समितीचे अध्यक्ष माधव गाडगीळ यांनी या भागाचा दौरा करून आपल्या अहवालात हा भाग पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असून त्याच्या संवर्धनासाठी उपाय योजण्याची शिफारस केली होती; मात्र नंतर आलेल्या कस्तुरीरंगन समितीने हा अख्खा दोडामार्ग तालुकाच पर्यावरण निर्बंध अर्थात इकोसेन्सिटीव्हमधून वगळला होता.