Category Archives: कोकण रेल्वे

कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांना रोजगारात प्राधान्य द्या; नितेश राणे यांचे रेल्वे प्रशासनाला निर्देश

   Follow us on        

सिंधुदुर्ग: कोकण रेल्वे प्रकल्पासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या स्थानिक नागरिकांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

​अनेक वर्षांपूर्वी जमिनी देऊनही अद्याप अनेक प्रकल्पग्रस्त रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत, ही बाब नितेश राणे यांनी रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. रेल्वे प्रशासनाने तातडीने अशा नागरिकांची एक स्वतंत्र यादी तयार करावी आणि त्यांना नोकरीमध्ये प्राधान्य द्यावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी दिल्या. केवळ थेट नोकरीच नव्हे, तर रेल्वे स्थानकांवरील स्टॉल्सचे वाटप आणि अनुकंपा तत्त्वावरील भरतीमध्येही प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबांना प्राधान्याने संधी मिळावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

​या महत्त्वपूर्ण बैठकीला कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा आणि मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर उपस्थित होते. रेल्वे प्रशासनाने यावर तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली असून, यामुळे जिल्ह्यातील अनेक बेरोजगारांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वैभववाडी रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण आणि रस्ते काँक्रिटीकरण कधी होणार?


   Follow us on        

वैभववाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात रेल्वे स्टेशन सुशोभीकरण आणि मुख्य रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची मागणी जोर धरू लागली आहे. स्थानिक नागरिक ओंकार लाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री कार्यालय आणि कोकण रेल्वे प्रशासनाला टॅग करत सोशल मीडियावरून तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत वैभववाडी परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था स्पष्ट दिसत आहे. खड्डे, गाळ, खडी आणि पाण्याचे डबके यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

“आम्ही आयुष्यभर हाच त्रास सहन करायचा का? अशा रस्त्यावरून प्रवास म्हणजे तालुक्यातील लोकांचा अपमान आहे,” असे भावनिक आवाहन करत त्यांनी त्वरित लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

सद्यस्थितीत कोकणातील आंबा महोत्सव आणि शेतकऱ्यांच्या विकासावर चर्चा सुरू असताना, स्थानिक पातळीवरील मूलभूत सुविधांबाबतची ही तक्रार वैभववाडीतील विकासकामांवर प्रश्नचिन्ह उभे करते. नागरिक आता प्रशासनाकडून लवकरात लवकर या समस्येवर तोडगा निघण्याची अपेक्षा करत आहेत.

 

 

Konkan Railway: ‘समर स्पेशल’ गाड्या पनवेल पर्यंतच का?

   Follow us on        

पनवेल:उन्हाळी सुट्ट्यांमधील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मडगाव ते पनवेल दरम्यान ‘समर स्पेशल’ ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, रेल्वेचा हा निर्णय प्रवाशांच्या फायद्याऐवजी डोकेदुखीचाच अधिक ठरल्याचा आरोप कोकणी चाकरमान्यांकडून केला जात आहे.

गाडी क्रमांक ०११०५ (पनवेल – मडगाव साप्ताहिक स्पेशल) या गाडीच्या वेळेवरून प्रवाशांमध्ये मोठी नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. या गाड्यांपासून प्रवाशांना अपेक्षित दिलासा मिळाला नसल्याची भावना व्यक्त होत आहे.

ही गाडी पनवेल स्थानकावरून पहाटे ०५:४५ वाजता सुटणार आहे. प्रवाशांच्या मते मुंबई आणि उपनगरातून इतक्या पहाटे पनवेल स्थानकावर पोहोचणे सामान्य प्रवाशांसाठी जवळपास अशक्य आहे. पहाटेच्या वेळी लोकल सेवांची उपलब्धता कमी असल्याने आणि टॅक्सी किंवा रिक्षाचा प्रवास खर्चिक असल्याने प्रवाशांना अशा गाड्यांचा लाभ घेणे कठीण जात आहे.

“कोकणी चाकरमान्यांना सवयीने पनवेल स्थानकापर्यंत मर्यादित ठेवण्याचा हा प्रयत्न आहे का?” असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे.

जर ही विशेष ट्रेन पनवेल ऐवजी दादर किंवा सीएसएमटी (CSMT) पर्यंत नेली असती, तर त्याचा फायदा मुंबईतील मुख्य भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना झाला असता. तसेच, यामुळे सकाळच्या वेळी सुटणाऱ्या ‘मांडवी एक्सप्रेस’मधील प्रचंड गर्दी विभागण्यास मोठी मदत झाली असती. मात्र, गाडी केवळ पनवेलपर्यंतच मर्यादित ठेवल्यामुळे तिचा काहीच फायदा झाला नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

अलीकडे मध्य रेल्वे राज्यांतर्गत प्रवासी सेवेला दुय्यम स्थान देत असल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे.

प्रशासनाने अशा ‘स्पेशल’ गाड्यांचे नियोजन करताना प्रवाशांच्या सोयीचा आणि कनेक्टिव्हिटीचा विचार करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

 

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! मडगाव – पनवेल दरम्यान धावणार ‘समर स्पेशल’ ट्रेन

   Follow us on        

रत्नागिरी:उन्हाळी सुट्ट्यांमुळे होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने मडगाव आणि पनवेल दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

​गाड्यांचे वेळापत्रक आणि मार्ग:

​गाडी क्र. ०११०६ (मडगाव – पनवेल साप्ताहिक स्पेशल): ही गाडी रविवार, १० मे २०२६ रोजी मडगाव जंक्शन येथून दुपारी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:०० वाजता पनवेलला पोहोचेल.

​गाडी क्र. ०११०५ (पनवेल – मडगाव साप्ताहिक स्पेशल): ही गाडी सोमवार, ११ मे २०२६ रोजी पनवेल येथून पहाटे ०५:४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १८:१० वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.

​गाडीचे थांबे:

​ही ट्रेन प्रवासात करमळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आणि पेण या स्थानकांवर थांबेल.

​डब्यांची रचना (Composition):

​या विशेष ट्रेनमध्ये एकूण २३ डबे असतील, ज्यात खालीलप्रमाणे विभागणी करण्यात आली आहे:

​AC 3 Tier: ०३ डबे

​Sleeper (शयनयान): ११ डबे

​General (सामान्य): ०७ डबे

​SLR: ०२ डबे

​प्रवाशांना अधिक माहितीसाठी आणि वेळपत्रकासाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे किंवा ‘KR Mirror’ ॲप वापरण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Konkan Railway: ‘सोशिक’ चाकरमान्यांच्या नशिबी २७ तासांचा यातनेचा प्रवास

   Follow us on        

ठाणे: कोकणात गावी जाण्यासाठी सध्या चाकरमान्यांची ‘तुफान गर्दी’ उसळली आहे. नियमित गाड्यांसह विशेष गाड्यांचे आरक्षण (Reservation) आधीच फूल झाल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. खाजगी बसचे दर गगनाला भिडलेले असल्याने गरीब आणि मध्यमवर्गीय प्रवाशांना ते परवडत नाहीत. परिणामी, जनरल डब्यातून प्रवास करणे हा एकमेव पर्याय आता कोकणी माणसासमोर उरला आहे.

​या भीषण गर्दीमुळे दादर, ठाणे आणि सीएसएमटी यांसारख्या प्रमुख स्थानकांवर प्रवाशांना कमालीचा संघर्ष करावा लागत आहे. कोकण कन्या, मंगलोर आणि तुतारी एक्सप्रेस यांसारख्या गाड्यांच्या जनरल डब्यात पाय ठेवण्यासाठी जागा मिळावी, म्हणून प्रवाशांना गाडी सुटण्यापूर्वी १२ ते १५ तास आधीच स्थानकावर रांगा लावाव्या लागत आहेत. ऐन उन्हाळ्यात प्लॅटफॉर्मवर ताटकळत उभे राहून जागा मिळवण्यासाठी ही जीवघेणी कसरत सुरू आहे.

​या लांबच लांब रांगांचा आणि प्रवासाचा सर्वाधिक फटका महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. १५ तास रांगेत उभे राहिल्यानंतर पुन्हा पुढील १० ते १५ तासांचा गर्दीत करावा लागणारा प्रवास, असा एकूण २७ ते ३० तासांचा हा प्रवास प्रवाशांच्या पाचवीलाच पुजला आहे. यामध्ये रात्रीची झोप नाही आणि बसण्यासाठी हक्काची जागाही नाही, अशा स्थितीत चाकरमानी आपला प्रवास पूर्ण करत आहेत.

​प्रवासादरम्यानच्या सुविधांची स्थिती तर अत्यंत भयावह आहे. प्रचंड उकाडा आणि गर्दीमुळे डब्यात साधे बाथरूमपर्यंत पोहोचणेही अशक्य होऊन बसते. रांगेत उभे असताना जेवणाखाण्याचे हाल होतात आणि प्रवासात पाण्याचा घोट घेण्यासाठीही कसरत करावी लागते. ‘नकोसा वाटणारा हा प्रवास’ केवळ गावाकडच्या ओढीपोटी कोकणी माणूस सहन करत आहे. मात्र, या गैरसोयींमुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

​इतकी भीषण परिस्थिती असूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे. ‘सोशिक कोकणी माणूस’ सर्व काही निमूटपणे सहन करतो, याचाच गैरफायदा घेतला जात असल्याची भावना प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे. दरवर्षीची हीच परिस्थिती असूनही जनरल डब्यांची संख्या वाढवणे किंवा रांगांचे सुयोग्य नियोजन करणे यामध्ये रेल्वे प्रशासन अपयशी ठरल्याने, आता हे चाकरमान्यांचे दुःख नेमकं कोणाला दिसेल, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

याशिवाय यावर कायमस्वरूपी उपाय म्हणजे कोकण रेल्वे मार्गाचे कोकण रेल्वेच्या या कायमस्वरूपी समस्यांवर मात करण्यासाठी मार्गाचे दुहेरीकरण आणि भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करणे ही काळाची गरज बनली आहे. प्रवाशांची वाढती संख्या आणि गाड्यांची गर्दी पाहता, जोपर्यंत रेल्वे मार्गाचे पूर्णतः दुहेरीकरण होत नाही, तोपर्यंत गाड्यांचा वेग वाढवणे आणि नवीन फेऱ्या सुरू करणे तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे. तसेच, कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेच्या मुख्य प्रवाहात विलिनीकरण झाल्यास निधीची उपलब्धता वाढून पायाभूत सुविधांचा विकास अधिक वेगाने होऊ शकतो. मात्र, दुर्दैवाने या कळीच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होताना दिसत असून, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे कोकणचा रेल्वे प्रवास आजही ‘सिंगल ट्रॅक’वरच अडकून पडला आहे.

कोकण रेल्वेची वाहतुक विस्कळीत! गाड्या ३ ते ५ तास उशिराने, प्रवाशांचे प्रचंड हाल

   Follow us on        

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक गेल्या दोन दिवसांपासून पूर्णपणे कोलमडले असून, अनेक महत्त्वाच्या गाड्या ३ ते ५ तास उशिराने धावत आहेत. मे महिन्याच्या सुट्ट्यांमुळे गाड्यांना प्रचंड गर्दी असतानाच, या विलंबाचा मोठा फटका हजारो प्रवाशांना बसत आहे.

​विंलंबाचे मुख्य कारण: नांदगाव रोड-कणकवली दरम्यान ‘ब्लॉक’? 

​रेल्वे प्रशासन काही कारण पुढे करत नसले तरी मिळालेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वे मार्गावरील नांदगाव रोड आणि कणकवली स्थानकांदरम्यान अंडरपासच्या (भुयारी मार्ग) बांधकामासाठी रेल्वे प्रशासनाने ३० एप्रिल आणि १ मे २०२६ रोजी विशेष ‘ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक’ घेतला होता. या तांत्रिक कामामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, ब्लॉक संपल्यानंतरही गाड्यांचे वेळापत्रक अद्याप पूर्वपदावर आलेले नाही. परिणामी, कालपासून अनेक गाड्या एकामागोमाग एक रखडल्या आहेत. हा ब्लॉक घेण्यासाठी रेल्वेने ऐन हंगामाचा मुहूर्त का पकडला असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

​अनेक गाड्यांना रेल्वे प्रशासनाकडून रीशेड्यूल (वेळ बदलणे) करण्यात आले आहे. प्रमुख गाड्यांच्या विलंबाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

​मांडवी एक्सप्रेस (१०१०३): ही गाडी आज, २ मे रोजी सीएसएमटीवरून सकाळी ७:१० ऐवजी १०:०० वाजता (२ तास ५० मिनिटे उशिराने) सुटली आहे. आता ती चार तास उशिराने धावत आहे. काल १ मे रोजी देखील ही गाडी मडगावला रात्री ११:३० च्या सुमारास पोहोचली होती.

​शेवटची लोकल चुकली 

जनशताब्दी एक्सप्रेस (१२०५२): मडगाववरून सुटलेली ही गाडी तब्बल ५ तास २४ मिनिटे उशिराने पहाटे ५:३४ वाजता मुंबईला पोहोचली. त्यामुळे दिवसा प्रवास करून रात्री किमान शेवटची लोकल पकडून घरी जाण्याचा प्रयत्नात असलेल्या चाकरमान्यांना दुसर्‍या दिवसाची पहिली लोकल पकडून घरी जावे लागले.

​कोकण कन्या एक्सप्रेस (२०११२): मडगाव येथून सुटलेली ही गाडी २ तास ४८ मिनिटे उशिराने मुंबईत पोहोचली.

​एलटीटी-मडगाव उन्हाळी विशेष (०११०३): ही गाडी १ मे रोजी २ तास ५ मिनिटे उशिराने सुटली आणि मडगावला तब्बल ५ तास १० मिनिटे उशिराने पोहोचली.

​तुतारी एक्सप्रेस (११००३): दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस १ मे रोजी आपल्या नियोजित वेळेपेक्षा १ तास ४८ मिनिटे उशिराने सावंतवाडीला पोहोचली.

आपल्या नेहमीच्या लेटमार्क साठी ‘कुप्रसिद्ध’ असलेल्या एलटीटी – मडगाव – एलटीटी ( ११०९९/११०००) दोन्ही दिशेने सुमारे ५  तासांचा लेटमार्क लावला.

​प्रवाशांचा खोळंबा:

​उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामात गाड्यांना आधीच मोठी प्रतीक्षा यादी असताना, या ब्लॉकमुळे झालेल्या विलंबाने प्रवाशांच्या मनस्तापात भर पडली आहे. वाढत्या उकाड्यात प्रवास लांबल्याने जनरल आणि स्लीपर डब्यातून प्रवास करण्यात प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे, मात्र वेळापत्रक कधीपर्यंत सुरळीत होईल, याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही.

 

मदार–तिरुवनंतपुरम स्पेशल ट्रेनला संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा मंजूर

   Follow us on        

संगमेश्वर | २९ एप्रिल २०२६ कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या मदार (अजमेर) ते तिरुवनंतपुरम सेंट्रल दरम्यानच्या विशेष गाडीला संगमेश्वर रोड स्थानकावर अधिकृत थांबा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे संगमेश्वर आणि परिसरातील प्रवाशांची मोठी गैरसोय दूर झाली असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

​सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

​यापूर्वी या गाडीला संगमेश्वर स्थानकावर थांबा नसल्याने स्थानिक प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या संदर्भात ‘निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे ग्रुप’ च्या वतीने कोकण रेल्वेकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. तसेच, पद्मश्री गजानन माने यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण रेल्वेचे सी.एम.डी. (CMD) संतोष कुमार झा यांच्यासोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा विषय प्रकर्षाने मांडण्यात आला होता. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत अखेर या थांब्याचे अधिकृत पत्र प्रसिद्ध केले आहे.

​गाडीचे वेळापत्रक आणि वेळ

​रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्यानुसार, ०२ मे २०२६ ते ०६ जून २०२६ या कालावधीत ही सेवा उपलब्ध असेल:

​ट्रेन क्र. ०६०१३ (तिरुवनंतपुरम – मदार जं. स्पेशल): ही गाडी दर गुरुवारी सकाळी ०८:१६ वाजता संगमेश्वर स्थानकावर येईल आणि दोन मिनिटांच्या थांब्यानंतर ०८:१८ वाजता मार्गस्थ होईल.

​ट्रेन क्र. ०६०१४ (मदार जं. – तिरुवनंतपुरम स्पेशल): ही गाडी दर रविवारी रात्री २३:१० वाजता संगमेश्वर स्थानकावर पोहोचेल आणि २३:१२ वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होईल.

​कोकण रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे संगमेश्वर परिसरातील नागरिक आणि पर्यटकांना मोठा फायदा होणार आहे. रेल्वे ग्रुपच्या या यशस्वी पाठपुराव्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Konkan Railway: मदार-मडगाव दरम्यान ‘वन-वे’ विशेष गाडी

   Follow us on        

मडगाव: उत्तर पश्चिम रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मदार ते मडगाव दरम्यान विशेष ‘वन-वे’ रेल्वे सेवा जाहीर केली आहे. गाडी संख्या ०९६०७, मदार-मडगाव स्पेशल रविवार, दिनांक ३ मे २०२६ रोजी मदार स्थानकावरून सायंकाळी १९.५५ वाजता सुटेल आणि मंगळवारी पहाटे ०४.४० वाजता मडगाव येथे पोहोचेल.

​या प्रवासात ही गाडी राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे. या विशेष रेल्वेचे सर्व थांबे खालीलप्रमाणे आहेत:

​प्रवासातील सर्व स्थानके:

मदारहून सुटल्यानंतर ही गाडी अजमेर, विजयनगर, भीलवाडा, चित्तौडगड, नीमच, मंदसौर, रतलाम, वडोदरा, भरूच, सुरत, वापी, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमली या स्थानकांवर थांबेल. त्यानंतर ही गाडी आपल्या अंतिम स्थानकावर म्हणजेच मडगाव येथे पोहोचेल.

​डब्यांची रचना आणि सुविधा:

या गाडीला एकूण २२ डबे असतील, ज्यात २ सेकंड एसी, ६ थर्ड एसी, १ थर्ड एसी इकॉनॉमी, ७ शयनयान (स्लीपर), ४ सामान्य श्रेणी आणि २ पॉवरकार डब्यांचा समावेश आहे. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या विशेष रेल्वेमध्ये लिननची (चादर, उशी, ब्लँकेट) सुविधा उपलब्ध नसेल, त्यामुळे प्रवाशांनी स्वतःची व्यवस्था करून प्रवास करावा.

​कोकण रेल्वे मार्गावरून जाणारी ही गाडी विशेषतः दक्षिण भारतात आणि कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी सोय ठरणार आहे. प्रवाशांनी वेळापत्रकाची नोंद घेऊन आपले आरक्षण निश्चित करावे, असे आवाहन रेल्वे विभागातर्फे करण्यात आले आहे.

तिरुवनंतपुरम – मदार जंक्शन विशेष एक्सप्रेस शनिवारपासून संगमेश्वर स्थानकावर थांबणार

   Follow us on        

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाने संगमेश्वर रोड स्थानकावर तिरुवनंतपुरम मदार विशेष जादा थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल २ मे २०२६ पासून ६ जून २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.

​गाडी क्र. ०६०१३ तिरुवनंतपुरम सेंट्रल ते मदार जंक्शन ही साप्ताहिक विशेष ट्रेन (जी दर बुधवारी तिरुवनंतपुरमवरून सुटते) दर गुरुवारी सकाळी ०८:१६ वाजता संगमेश्वर रोड स्थानकावर पोहोचेल आणि ०८:१८ वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होईल. या गाडीला ६ मे २०२६ ते ३ जून २०२६ या कालावधीत हा थांबा मिळेल.

​तसेच परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०६०१४ मदार जंक्शन ते तिरुवनंतपुरम सेंट्रल ही साप्ताहिक विशेष ट्रेन (जी दर शनिवारी मदार जंक्शनवरून सुटते) दर रविवारी रात्री २३:१० वाजता संगमेश्वर रोड स्थानकावर येईल आणि २३:१२ वाजता मार्गस्थ होईल. या गाडीला २ मे २०२६ ते ६ जून २०२६ या कालावधीत हा जादा थांबा देण्यात आला आहे.

​कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी ही माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली असून प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर ‘समर स्पेशल’ गाड्यांची घोषणा

   Follow us on        

Konkan Railway: उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान दोन विशेष उन्हाळी गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.

पहिली विशेष गाडी क्रमांक ०११०४ मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी गुरुवार, ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता मडगाव येथून सुटणार असून त्याच दिवशी रात्री १०:०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणार आहे. परतीची गाडी क्रमांक ०११०३ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव विशेष गाडी गुरुवार, ३० एप्रिल २०२६ रोजी रात्री १०:५५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२:५० वाजता मडगाव येथे पोहोचेल. या गाडीला करमळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेन, पनवेल आणि ठाणे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

दुसरी विशेष गाडी क्रमांक ०१००४ मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी रविवार, ३ मे २०२६ रोजी सायंकाळी ४:३० वाजता मडगाव येथून सुटणार असून पुढील दिवशी सकाळी ६:२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०१००३ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव विशेष गाडी सोमवार, ४ मे २०२६ रोजी सकाळी ८:२० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री १०:४० वाजता मडगाव येथे पोहोचेल. या गाडीला करमळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेन, पनवेल आणि ठाणे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

दोन्ही विशेष गाड्यांमध्ये एकूण २१ डबे असणार असून त्यामध्ये एसी थ्री टियरचा १ डबा, स्लीपरचे ११ डबे, सामान्य श्रेणीचे ७ डबे आणि एसएलआरचे २ डबे असतील. या गाड्यांच्या सविस्तर वेळापत्रक व थांब्यांची माहिती भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search