श्री देव वेतोबा म्हणजे आरुलकरासाठी (आरवलीचे रहिवाशी) काय आहे, हे शब्दांत सांगणे कठीण आहे. संत तुकारामांसाठी विठ्ठल हा जसा मायबाप, तसा आम्हा समस्त आरवली ग्रामस्थांसाठी श्री देव वेतोबा.
ग्रामदैवत असे म्हटले तरी देव वेतोबा हा आरवलीकरांसाठी कुटुंबप्रमुख, पिता, पालनहार या भूमिकेत दिसून येतो. कोणतीही समस्या, संकट असो “देवा वेतोबा तू पाव” एवढी हांक पुरेशी असते. अतिशय जागृत देव अशी याची ख्याती आहे. दररोज रात्री देव वेतोबा गांवाच्या रक्षणासाठी फिरतो अशी समस्त ग्रामस्थांची श्रद्धा आहे. या संदर्भांतला एक किस्सा मला आठवतो.
आमच्या घराभोवती खूप जमीन आहे. गांवी याला बाग असे संबोधले जाते. या बागांत तोरिंजन(पपनस), आंबा, फणस, माड, पोफळी, साग, तिरफळ, केळी, जाम अशी अनेक झाडे आहेत. शिवाय दसवंती (जास्वंद), गुलाब, सहस्रमोगरा, अनंत, नागचाफा अशी विविध फुलांची झाडे तसेच भोपळ्याचा वेल, चवळी, लाल माठ, पडवळाचा/दोडक्याचा वेल अशी भाज्यांची रोपेसुद्धा आहेत. कांही वेळां कुंपण ओलांडून, गडगा (दगड आणि चिऱ्याने बांधलेली कंपाउंडची भिंत) पार करून बाहेरची वशाडी जनावरे आमच्या बागांत घुसून या झाडांची नासधूस करत. म्हणून हे नुकसान थांबवण्यासाठी माझ्या चुलत्यांनी या गडग्याला उंच दार करून त्याला कुलूप लावले. रात्री त्यांना स्वप्नांत दिसले की देव वेतोबा त्यांना विचारतो आहे “ माझ्या फेरीच्या मार्गावर कुलूप लावतोस ? चल उघड ते …” आणि खाडकन ते कुलूप उघडून खाली पडले. माझे काका दचकून जागे झाले. टॉर्च घेऊन ते बाहेर आले…तसेच त्या गडग्याच्या दाराकडे गेले. बघतात तर काय ?? ते कुलूप जमिनीवर पडले होते. प्रत्यक्ष वेतोबा आपल्याशी बोलला, या आनंदात माझ्या काकांचे भान हरपले होते. त्यानंतर कुलूप सोडा… तो दरवाजाही कधी बंद झाला नाही. देव वेतोबाच्या रात्रीच्या फेरीचा मार्ग आमच्या आवारातून जातो, ही बातमी त्यांनी जो जो भेटेल त्याला ऐकवली.
ग्रामस्थांच्या घरांत कोणतंही मंगल कार्य असेल तर सर्वप्रथम वेतोबाला प्रसाद लावून कौल घ्यायची प्रथा आमच्या गांवी आहे. देवळाचे गुरव विशिष्ट पाने देवाच्या उत्तरांगावर लावतात. आणि देवाला कौल देण्यासाठी गाऱ्हाणे घातले जाते. देवाचा कौल मिळेपर्यंत कौल मागणारे देवासमोर बसून रहातात. माझ्या लहानपणी भाऊ गुरव हे देवाची पूजा-अर्चा व इतर दैनंदिन धार्मिक विधी बघायचे. कोणाच्याही बागेत केळ्यांचा घड पिकला की तो देव वेतोबासमोर ठेवण्याची प्रथा आहे. मग त्यातली कांही केळी गुरव त्या माणसाला प्रसाद म्हणून देतात व बाकीची केळी देवळांत उपस्थित असणाऱ्या भक्तगणांमध्ये वाटतात. तसंच धोतरजोडी व चपला देवाला भेट देण्याचीही पद्धत आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण देवळांत अशा दिलेल्या नव्या कोऱ्या चपलांचे, कालांतराने तळ झिजलेल्या अवस्थेतल्या चपलाही जपून ठेवलेल्या आहेत. भाविक यांचेही दर्शन आवर्जून घेतात. देव वेतोबा आहे आणि त्यामुळेच हा गांव सुरक्षित, सुखी व समृद्ध आहे हा अवघ्या आरवलीकरांचा दृढ विश्वास आहे.
सुरवातीला देव वेतोबाची भव्य मूर्ती फणसाच्या लाकडापासून बनवली जायची. त्यामुळे आमच्या गांवांत फणसाच्या लाकडापासून कोणतीही वस्तू …उदाहरणार्थ खुर्ची, टेबल, बसायचा पाट वगैरे , बनवली जात नाही …. वापरली जात नाही. आता मात्र देवाची मूर्ती पंचधातूची आहे.
देव वेतोबाच्या कृपेचा आणखी एक प्रसंग सांगण्याचा मोह मला आवरत नाही. अर्थांत हा मी माझ्या घरातील वडीलधाऱ्या मंडळींकडून ऐकलेला आहे. माझे पणजोबा श्री वासुदेवराव रेगे हे ग्वाल्हेरच्या महाराजांकडे नोकरीला होते. त्याकाळी सुट्टीत घरी येताना प्रवासाचे वहान म्हणजे घोडा. तर ते घराजवळ आले, पण त्यांना घर कुठे आहे तेच कळेना. आतापर्यंत शहाण्यासारखा दौड करणारा घोडा बिथरल्यासारखा चालत होता. तोंडाने फुरर्र…फुर्र असे आवाज काढत होता. बराच वेळ झाला, पण घराचा रस्ता कांही उमगेना. माझ्या पणजोबांनी वेतोबाचा धांवा सुरू केला. “देवा वेतोबा, माका मार्ग दाखय…तुज्या दाराकडे आयलसय…पण वाट गावणासा नाय…चकवो लागलोसा असा दिसता … देवा कृपा कर …” तेवढ्यांत शेजारच्या पांन्नीतून (अरुंद पायवाट) एक माणूस, डोक्याला मुंडासं..खांद्यावर कांबळ आणि हातात काठी अशा जाम्यानिम्यात आला. माझ्या पणजोबांनी त्याला आवाज दिला. तो माणूस थांबला.
“काय झाला धनयानो… दोंपारच्या ऊनांत हंयसर खंय फिरतसात ??” त्या माणसाने विचारले. पणजोबांनी त्याला सर्व हकीगत सांगितली. आपलं घर कुठे आहे, तेही सांगितलं आणि वाट चुकल्यामुळे गेले तासभर इथेच फिरतो आहे हे सांगितलं.
“माज्या पाठी..पाठी या. मी दाखयतंय तुमका वाट. आणि पुढच्या दहा मिनिटांत तो सज्जन गृहस्थ माझ्या पणजोबांना आमच्या घरापर्यंत घेऊन आला. पणजोबा पायउतार झाले. “जरा थांबा. तुमचेसाठी गूळपाणी आणूक सांगतय.”
“नको….नको.. मी शेतार जातसंय. आगपेटी असली तर जरा द्या.” तो गृहस्थ बहुतेक घाईत असावा. पणजोबा आगपेटी आणायला घरांत गेले. दोन मिनिटांत बाहेर आले…बघतात तर बाहेर कोणी नाही. धांवत धांवत ते आखांड्यापर्यंत (कंपाऊंडचे फाटक) आले. कोणीच दिसत नव्हते. दुसऱ्या दिवशी वेतोबाच्या देवळांत त्यांनी कौल लावला. ‘संकटांत तू मला हांक मारलीस…मी तुझ्यासाठी आलो होतो.’ हा कौल मिळाला. आता हा सर्व श्रद्धेचा भाग आहे.
माझ्या चुलत्यांचा तर वेतोबावर एवढा विश्वास होता की ताप वगैरे आला तर मला सांगायचे “जा देवळांत जावन तीर्थ आणि आंगारो घेवन ये”. मी एका बाटलीत तीर्थ व पुडीत अंगारा घेऊन यायचो. आणि माझे चुलते ते तीर्थ अक्षरश: औषधाच्या डोसाप्रमाणे घ्यायचे आणि त्यांना बरेही वाटायचे.
आमच्या वेतोबाचे देऊळ कधीच बंद होत नसे. संध्याकाळी गांवातील ज्येष्ठ मंडळी दर्शनासाठी येत…बाहेरच्या सिमेंटच्या सोप्यावर बसून सुखदु:खाच्या गप्पा मारत…वेतोबाच्या अस्तित्वाने पुनीत झालेल्या वास्तूत स्वत:चा आनंद शोधत. मुलाबाळांच्या कल्याणासाठी प्रार्थना करत.
वैशाख शुद्ध पंचमी हा आमच्या देव वेतोबाचा वाढदिवस. “आमच्या” हा शब्द संवयीने आला. “आमच्या” म्हणजे आरवलीचे ग्रामदैवत श्री देव वेतोबा.
आता बरीच वर्षे झाली गांवाला जाऊन. पण नजरेसमोर देऊळ जसेच्या तसे आहे. देवाच्या गाभाऱ्यातील देव वेतोबाची भव्य मूर्ती तशीच डोळ्यासमोर येते. मी हात जोडून उभा रहातो. त्यावेळी मी देवळातच असतो. “ओम नम: पराय शिवात्मने, वेतालाय नम:”चा गजर आपोआप मनांत सुरु होतो. “तो” माझ्या जवळच आहे…त्याची कृपादृष्टी सदैव लाभणार आहे.. तोच आमचा रक्षणकर्ता…मायबाप आहे हे माझे मन मला सांगत असते. बस्स !! याशिवाय काय हवं दुसरं ??
हे जे कांही लिहिले गेले, तेसुद्धा त्याच्याच इच्छेने…त्याच्याच आदेशाने आणि आशिर्वादाने.
अनिल रेगे.
मोबाईल : 9969610585.
Vision Abroad