कोकण पर्यटनात होणारे अपघात आणि त्यानिमित्ताने मंथन

कोकण पर्यटनात होणारे अपघात आणि त्यानिमित्ताने मंथन……

कोकणात सुरक्षित आणि निसर्ग स्नेही पर्यटन ही चळवळ व्हावी

आर्नाळ्याला आठ जणांचा बुडून मृत्यू, गणपतीपुळ्याच्या समुद्रात सात जण बुडाले, एका कॉलेजची आलेली ट्रीप आणि पंधरा वीस मुलं मुरुड जंजिरा येथील समुद्रात बुडून मृत्यू, तारकर्ली च्या समुद्रात पर्यटक बुडाले, गुहागरला पर्यटकांचा बुडून मृत्यू …..दरवर्षी कोकणात वीस ते पन्नास पर्यटक समुद्रात बुडून मृत्युमुखी पडतात. चार दिवस या विषयांची चर्चा होते नंतर प्रशासन, स्थानिक माणसे आणि पर्यटक हे सगळे विषय विसरून जातात. हे दरवर्षी होणारे अपघात कसे टाळता येतील यावर एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण केली पाहिजे किंवा शून्य अपघातांत साठी कोकणातील समुद्र पर्यटनात असे अपघात जिथे घडतात या किनाऱ्यांवर बीच सेफ्टी लाईफ गार्ड अशा व्यवस्था उभारल्या पाहिजे असा विचार दुर्दैवाने होत नाही , केवळ या विषयांवर त्या त्या वेळी भावनिक चर्चा होते आणि हे दुर्दैवी चक्र असेच सुरू राहते.

अर्थात पर्यटक बुडून दुर्दैवी मृत्यू होत आहे त्यामध्ये वॉटर्स स्पोर्टस्मुळे हे मृत्यू होतात असं नाही तर समुद्रात पोहोताना खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक बुडून मृत्युमुखी पडत आहे.

आपण हरिहरेश्वरचे उदाहरण घेऊ हरिहरेश्वर मंदिराच्या पाठच्या बाजूला एक घळ आहे तिथून खाली उतरल्यानंतरखूप सुंदर निसर्ग आहे आणि समुद्राच्या लाटा पाठच्या बाजूने दगडांवर आपटतात. या निसर्गाच्या प्रेमात पडून अनेक जण तिथे उभे राहून फोटो काढण्याचा मोह होतो. सात आठ लाटा नंतर एक मोठी लाट येते. आणि ती पर्यटकांना घेऊन समुद्रात जाते. असंख्य वेळा हरिहरेश्वरच्या या ठिकाणी पर्यटक बुडून मृत्युमुखी पडले. पण या ठिकाणी एक वॉचमन ठेवावा आणि तिथे बॅरिकेड्स बनवाव्या अशा व्यवस्था निर्माण कराव्यात असं संबंधित विभागांना कधी वाटलं नाही. आणि त्याच त्याच पद्धतीने पर्यटक मृत्युमुखी पडत राहिले. असंच गणपतीपुळ्यात ,मुरूडमध्ये, अलिबाग मध्ये, तारकर्लीला वारंवार का घडतात याचं आत्मपरीक्षण पर्यटनाशी संबंधित असलेल्या शासनाच्या विभाग यांनी करणे आवश्यक आहे.

याकरता या धोकादायक जागांवर आणि बीचेस वर कायमस्वरूपी पर्यटक बुडण्यापासून वाचवण्याच्या व्यवस्था निर्माण करायला हव्यात. दरम्यान एक चांगली गोष्ट मागच्या आठ दहा वर्षात घडली यातील बहुतेक सर्व बीचेस वर वॉटर स्पोर्टसच्या व्यवस्था निर्माण झाल्या.

यात काम करणारी 98 टक्के मुले कोकणातील आणि स्थानिक कोळी समाजाची भंडारी समाजाची किंवा दर्यावर्दी आहेत. त्यामुळे या समुद्रात किनाऱ्यावर पोहोताना कोणी बुडत असेल तर हे वॉटर स्पोर्ट्स करणारे व्यवसायिक स्वतःचा जीव धोक्यात घालून अशा पर्यटकांना वाचवतात मागच्या आठ दहा वर्षात शेकडो पर्यटकांना बुडण्यापासून वाचवण्याचे काम वॉटर स्पोर्टस चालवणारी कोकणातील तरुण मुले करतात. आणि त्यामुळे पूर्वीपेक्षा अपघाताचे आणि बुडण्याचे खूप कमी प्रमाण समुद्रकिनारी आता घडतात.

पर्यटकांची संख्या प्रचंड वाढली तरीही अपघातांचे प्रमाण कमी झाले याचे कारण कोकण किनाऱ्यावर सुरू झालेले वॉटर स्पोर्ट्स हे आहे. अनेक तरुणांचे जीव वाचवणाऱ्या या पर्यटन सेवकांचे आभार व्यक्त केले पाहिजे त्यांचे ही कधीतरी कौतुक झाले पाहिजे.शासकीय व्यवस्थेतून अशा स्वरूपाची सुरक्षितता निर्माण केली केली पाहिजे ते नसतानाही कोकणातील तरुण स्वयंसेवी पद्धतीने हे काम गेली अनेक वर्षे करत आहेत.

थोडेसे कोकणात येणाऱ्या पर्यटकांविषयी, कोकणात येणारे लाखो पर्यटक हे समुद्र नसलेल्या भागातून येतात समुद्र पाहून उत्तेजित होतात, आणि कळत-नकळत समुद्रात आत मध्ये खोलपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात, काहीवेळा नशा हासुद्धा एक विषय असतो ज्यामुळे पर्यटक बुडण्याचे प्रमाण वाढते. ओहोटीच्या वेळी समुद्र आत मध्ये खेचतो . त्या त्या ठिकाणी नियमित अपघात घडणारे काही धोकादायक पॉईंट आहेत . सूचना देऊनही स्थानिक लोकांनी विनंती करूनही पर्यटक ऐकत नाहीत समुद्रात उतरतात अधिक खोलपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. सुदैवाने वॉटर स्पोर्ट्स त्या त्याठिकाणी आहेत म्हणून अनेक अपघात घडण्यापासून वाचले आहेत आणि शेकडो पर्यटकांचे जीव वाचले आहेत.

नुकताच तारकर्लीला एक होडी उलटून अपघात झाला व या निमित्ताने कोकणातील पर्यटन किती सुरक्षित यावर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे. या सर्व चर्चेकडे नकारात्मक न पाहता यापुढील काळात कोकणातील साहसी पर्यटन आणि समुद्रपर्यटन यातील सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि अधिक दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीने काय केले पाहिजे याचे आत्मपरीक्षण सर्वांनीच करणे आवश्यक आहे. समुद्र पर्यटन आणि जलपर्यटन हा विषय प्रचंड वेगाने कोकणात वाढतो आहे, आणि या करता आवश्यक त्या पायाभूत सुविधा आणि व्यवस्था उभारणे अत्यंत आवश्यक आहेत

मला असं वाटतं की कोकणातील वॉटर स्पोर्ट्स करणारे पर्यटन व्यवसायिक, पर्यटनाशी संबंधित असलेले शासनाचे विभाग, आणि कोकणात येणारे पर्यटक या तिघांचा योग्य समन्वय व्हायला हवा. अधिक चांगल्या व्यवस्था निर्माण करायला हव्यात. परदेशात असतात तसे वॉच टॉवर त्या त्या ठिकाणच्या पॉप्युलर पर्यटनाच्या समुद्रकिनाऱ्यांवर उभारायला हवेत. त्या त्या समुद्रकिनाऱ्यावर किमान व्यवस्था उभारली पाहिजे. वॉटर स्पोर्ट्स व्यवसाय करणाऱ्या तरुणांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून समुद्रकिनाऱ्यावर दरवर्षी होणारे अपघात शून्यावर कसे येतील किंवा कमीत कमी कसे होतील याकरता काम केले पाहिजे.

कोकणात मोठ्या प्रमाणात येणारे पर्यटक, वॉटर स्पोर्ट विषयी वाटणारे आकर्षण आणि त्यामुळे लाखो पर्यटकांचा यामध्ये सहभाग यात शुन्य अपघात किंवा कमीत कमी अपघात हे करायचे असेल तर डिझास्टर मॅनेजमेंट, पर्यटकांची सुरक्षितता या विषयात या सर्व वॉटरस्पोर्टस व्यवसायिकांना स्वयंसेवी पद्धतीने सहभागी करून दर दोन-तीन महिन्यांनी त्यांचे सुरक्षितता विषयातील आणि डिझास्टर मॅनेजमेंट विषयातील प्रशिक्षणाचे कार्यक्रम घेतले पाहिजे. आणि एक जबाबदार सागरी पर्यटनाची व्यवस्था कोकणात उभारली पाहिजे. या करता वॉच टॉवर आवश्यक असलेल्या वॉटर स्कूटर या पायाभूत सुविधा शासनाने उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. प्रशिक्षणाची एक व्यवस्था उभारली पाहिजे.

पुन्हा मला इथे सांगायला अभिमान वाटतो जेव्हा चिपळूणमध्ये आणि महाड मध्ये महापूर आला त्या वेळी शेकडो कोकणवासीयांचे प्राण वाचविण्याचे काम मालवण मधील रत्नागिरी मधील किंवा कुंडलिका नदी वर काम करणारे महेश सानप, रत्नदुर्गचे वीरेंद्र वणजु आणि त्यांचे वॉटर स्पोर्ट्स मध्ये काम करणारे सहकारी यांनी केले. त्यामुळे कोकणात सुरू झालेले साहसी पर्यटन आणि वॉटर स्पोर्ट्स हे कोकण पर्यटनाला मिळालेले एक वरदान आहे.

अर्थात हे पर्यटन खूप मोठ्या प्रमाणात कोकणात वाढत असल्यामुळे काही चुका होत आहेत ज्या नीट व्यवस्था निर्माण केल्या तर टाळता येईल.

सर्वप्रथम वॉटर स्पोर्ट्स चालवणाऱ्या पर्यटन व्यावसायिकांसाठी

बोटीच्या ज्या क्षमता आहेत त्यापेक्षा एकही जास्त पर्यटक बोटीत सोडता कामा नये.पर्यटकांनी कितीही ओव्हर कॉन्फिडन्स दाखवला तरी कंपल्सरी प्रत्येकाला लाइफ जॅकेट संपूर्ण प्रवासात घालण्याचा आग्रह धरला पाहिजे मे महिन्यात सिझन संपल्यानंतर व्यवसाय सुरू ठेवण्याचा आग्रह धरता कामा नये. दर्जा आणि सुरक्षितता या दोन विषयात कोणतीही तडजोड करता कामा नये

या व्यवसायात मोठी गुंतवणूक असते पाच सहा महिन्याचा व्यवसाय आहे म्हणून जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्याचा मोह होणे सहाजिक आहे पण कमी शुल्क घेऊन जास्तीत जास्त पर्यटकांना स्कुबा डायविंग किंवा जलक्रीडा अशा सेवा देण्यापेक्षा. कमी पर्यटकांना योग्य किंमत घेऊन दर्जेदार व सुरक्षित सेवा देणं आवश्यक आहे . त्यामुळे कभी पर्यटकांना सेवा देऊन जास्त पैसे मिळतील आणि सुरक्षित पर्यटन होईल. या करता व्यवसायातील स्पर्धा आणि बार्गेनिंग या दोन्ही गोष्टी पूर्णपणे बंद झाल्या पाहिजेत. अंदमान आणि देशात इतरत्र वॉटर स्पोर्टस् चे जे रेट आहेत त्याचा अभ्यास करून महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने रेट ठरवून द्यावेत आणि त्याच रेटने सर्वांनी व्यवसाय करावा. म्हणजे उत्पन्न अधिक मिळेल आणि पर्यटकांना दर्जेदार आणि सुरक्षित सेवा देता येणे शक्‍य होइल.

महाराष्ट्र शासनाचे पर्यटनाशी संबंधित असलेले विभाग स्थानिक प्रशासन आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे अपेक्षा

कोकणात सर्वाधिक अपघात जा समुद्रकिनाऱ्यावर झाले आणि ज्या जागांवर झालेत अशा जागा निश्चित करून तेथे कायमस्वरूपी पर्यटकांना वाचवण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा आणि शासनाच्या खर्चाने लाईफ गार्ड आणि आवश्यक असलेल्या बोटी या उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. या संपूर्ण प्रक्रियेत स्वयंसेवी पद्धतीने त्या त्या ठिकाणी काम करणाऱ्या वॉटर स्पोर्ट्स पर्यटन व्यवसायिक कोकणातील तरुणांना सहभागी करून घेता येणं शक्य आहे

कोकणात काशीद किंव्हा नागाव येथे सिंगल विंडो वॉटर स्पोर्ट्स बुकिंगची व्यवस्था त्या त्या ठिकाणच्या युवकांनी निर्माण केल्या आहेत. त्यामुळे व्यावसायिक स्पर्धा बार्गेनिंग किंवा निष्काळजीपणा या ठिकाणी होत नाही. अशाच स्वरूपाच्या व्यवस्था कोकणातील सर्व प्रमुख समुद्रकिनाऱ्यांवर जिथे वॉटर स्पोर्ट्स आयोजित केले जातात तिथे निर्माण केल्या पाहिजे. या सर्व समुद्रकिनाऱ्यांवर पोहणार्या पर्यटकांसाठी नाममात्र भाड्याने लाईफ जॅकेट उपलब्ध होतील अशी व्यवस्था उभारावी.

त्यापुढे जाऊन पर्यटन विभागाने या सर्व प्रमुख पर्यटन स्थळ वर पर्यटकांसाठी स्वच्छतागृहे, शोवर्स आणि आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात

सर्वात महत्त्वाचे पर्यटकांसाठी

कृपया अंदमानला तीन आणि चार हजार रुपयांना स्कुबा डायव्हिंगची सुविधा असेल तर कोकणात 400 रुपयात स्कूबा डायव्हिंग मिळावी अशा स्वरूपाची अपेक्षा ठेवू नये. स्वस्तात असुरक्षित वॉटर स्पोर्ट करण्यापेक्षा योग्य दरात सुरक्षित वॉटर स्पोर्ट्स देणाऱ्या ऑपरेटर कडून कोकणातल्या समुद्र पर्यटनाचा आनंद घ्यावा.

समुद्रात पोहोताना किंवा वॉटर स्पोर्टस अॅक्टिविटी करताना समुद्र म्हणजे तलाव नाही इथे भरती ओटी असते हे समजून घ्यावे. आणि त्यामुळे कंपल्सरी प्रत्येकाने पोहता येत असेल तरीसुद्धा लाईक पॅकेट घालावे.

स्थानिक ठिकाणी ठराविक स्पॉट आहेत जिथे खाडी समुद्राला येऊन मिळते किंवा काही धोकादायक खड्डे आहेत अशा ठिकाणी वारंवार अपघात होतात ही माहिती स्थानिक लोक देत असताना सुद्धा ओव्हर कॉन्फिडन्सने. अशा ठिकाणी समुद्रात उतरू नये. जलक्रीडा उपक्रमांमध्ये लहान मुलांचा सहभाग टाळावा.

सुरक्षित पर्यटन हे अभियान याची चळवळ कोकणात उभारली जावी आणि यामध्ये कोकणातील सर्व स्थानिक पर्यटन संस्थांनी आणि ग्रामपंचायतीने सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही यानिमित्ताने करतो.

श्री.संजय यादवराव
अध्यक्ष समृद्ध कोकण पर्यटन संस्था

कोकणाई ब्लॉग च्या नियमित whatsapp अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा

.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search