येवा कोंकण आपलाच आसा

नमस्कार ,

गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावरती सातारच्या वकील व डाॅक्टर असलेल्या सौ. सुचित्रा घोगरे-काटकर यांचा “कोकण आपलोच नसा” अशा आशयाचा एक भयंकर मेसेज व्हाॅटसअपवर फिरतो आहे. तसेच हा लेख वाचणार्‍यांपैकी अनेक वाचक याबाबत कुठलीही खातरजमा न करता आपले आद्य कर्तव्य असल्यासारखा सदर मेसेज आपल्याकडे असलेल्या सर्व ग्रूपवर पाठवत आहे. या फाॅरवर्डींगच्या  पवित्र कार्यात  अनेकवेळा कोकणात जावून मजा करुन सुखरुप परत आलेले पर्यटकही मागे नाहीत असे खेदाने नमूद करावे लागत आहे.

सर्वप्रथम हे लक्षात घ्या ज्यांनी कुणी हा अनुभव कथन केला आहे त्यांनी आपला संपर्क क्रमांक दिलेला नाही. तसेच हा मेसेज फाॅरवर्ड करणार्‍यांकडेही मुळ लेखिकेचा  फोन नंबर नाही. मला ज्या ज्या ग्रुपवर हा मेसेज आला त्या प्रत्येकाला मी या सौ.घोगरे यांचा फोन नंबर मागितला पण कुणाकडेही हा नंबर नाही. त्यामुळे त्यांचेशी बोलून याबाबत त्यांना वास्तवता दाखवण्याची माझी इच्छा पुर्ण होऊ शकली नाही. म्हणून मी हे कार्य आपल्या सारख्यांवर सोडत आहे. हेतू हाच आहे की ही जी माहीती ज्यांनी ज्यांनी लोकांपर्यंत पोहचवली त्यांनीच आता खरी वस्तुस्थिती लेखकापर्यंत पोहचावी व या प्रक्रीयेतील सर्वांनाच खरे काय ते कळावे.

याबाबत काही सविस्तर लिहिण्यापुर्वी मी माझी ओळख देतो. मी कोकण पर्यटन विकास संस्थेचा संचालक असून सन २००० पासून म्हणजे गेली २२ वर्ष  कोकणात पर्यटन , आंबा  व कोकण ऊत्पादनांच्या माध्यमातून कोकणी तरुण कोकणातच स्वताच्या पायावर उभा रहावा यासाठी काम करत आलो आहे. आंम्ही आजवर शेकडो कोकण सहली आयोजित केल्या व हजारो पर्यटकांना कोकणची गोडी लावली. दरवर्षी  आंबा महोत्सव व कोकण पर्यटन मेळा आयोजित करुन कोकण हा विषय अक्षरशा महाराष्र्टाच्या घराघरात पोहचवला.

कोकणात मांडवा ते मालवण अनेकदा दिवसा-रात्री फिरलो आहे. या प्रवासात कोकणातील सर्वच छोट्या-मोठ्या गावांना अनेकदा भेटी दिल्या आहेत. कधीही कुठूही वाईट अनुभव आला नाही….असो हे सर्व यासाठी लिहीले की आमचे मत फक्त एका अनुभवावर आधारीत नाही.

१)तारकर्ली बोट दुर्घेटनेत बळी गेलेल्या पर्यटकांबाबत सर्वांना वाईट वाटले व अशी दुर्घटना पुंन्हा पुंन्हा होऊ नये हे मान्य आहे. पण कोकणात जावूच नका , कोकण अजिबात सुरक्षित नाही अशा प्रकारचे वक्तव्य ऐखाद्या वकीलाने करणे म्हणजे अगदिच चुकीचे आहे.

२) केवळ तारकर्ली म्हणजे कोकण नव्हे तर कोकणास ७२० कीमीचा सागर किनारा लाभला आहे व त्यातील तारकर्ली हे  फक्त एक छोटेसे गाव आहे. त्यामुळे कोकणात जावू नका म्हणने म्हणजे ऊर्वरीत ७०० कीमीवर हा डायरेक्ट अन्याय आहे व हा अन्याय लेखिकेच्या भौगोलिक अ ज्ञानामुळे होतो आहे. तेंव्हा अशा ज्ञानी व्यक्तीवर कितपत विश्वास ठेवायचा हे आपणच ठरवावे.

३) फक्त  कोकणातील वाॅटर स्पोर्टस म्हंणजे कोकण पर्यटन नाही. केवळ ऐका पर्यटन प्रकारचा अनुभव चुकीचाआला म्हणून संपुर्ण कोकण असुरक्षित कसे होऊ शकते? याबाबत सौ. घोगरे यांनी मार्गदर्शन करावे. अथांग सागरकिनारा लाभलेल्या कोकण प्रदेशास इतरही वैभवशाली परंपरा आहेत. म्हणजे येथील अथांग सागर किनारे ,कौलारु घरे , तांबडी माती , चटकदार , रुचकर व आरोग्यदायी व्हेज/नाॅनव्हेज जेवण , शेकडो वर्ष सागराशी भिडणारे जलदुर्ग, नारळ-पोफळीच्या बागा, पुरातन मंदिरे , रंगतपुर्ण सण , रुढि-परंपरा ,पक्षू-पक्षी, जाखडी नृत्य – नमन,खेळे या व अशा विवीधतेने नटलेला कोकण दोन-चार दिवसांच्या सहलीत  केवळ वाॅटर स्पोर्टसमुळे असुरक्षित  झाला. मग तेथे हजारो वर्षांपासून राहणारे कोकणवासीय काय गाव सोडून पळाले का ?

४) पावसाळ्यात सिंधूदुर्ग किल्यात राहणार्‍यां माणसांचा समोर दिसणार्‍या मालवणाशी चार महीने संपर्क होत नाही , अनेक वेळा वादळ-वारे आले व लाखो रुपयांचे नुकसान झाले तरी कोकणी माणसाने कधी आत्महत्या केल्याचे ऐकीवात नाही. त्यासाठी त्याने पर्यायी व्यवस्था म्हणून पर्यटन विकास केला , घरगुती निवास व्यवस्था केल्या ,आंबा-काजू-कोकम- -फणस इ. यांपासून आरोग्यदायी कोकण उत्पादने बनवले ,२४ तास जीवावर होऊन खोल समुद्रात जाऊन  तुंम्हाला ताजी मासोळी पुरवली. अशा कष्टाने विकसित केलेल्या परीसरास सरळ सरळ असुरक्षित म्हणून तेथील विकासास आपण अडथळा निर्माण करत आहात असे अपणांस वाटत नाही का?

५) जर बोटीवाल्या कडे लाईफ जॅकेट नाही तरीही जवळच जायचे म्हणून बोटीत प्रवास करणारे हुशार महाभाग का असे जीवाशी खेळतात.  धोका दिसत असतांनाही  स्वता त्यात उडी मारायची आणि मग जीवाशी बेतले की बोभाटा करायचा ही कुठली पद्धत.

६) कोकणात गेले की वाॅटर स्पोर्टसच कशाला खेळायला हवे. समुद्र म्हणजे काय शहरातला स्विमिंगपुल वाटला का ? मी म्हणेन ऐकदा नाही हजारदा कोकणात जा , सागर कीनारी वाळूत बसा , सागराची गाज ऐका , खेकड्यांनी काढलेली रांगोळी बघा , वाळूत किल्ले बनवा , देवदर्शन करा , पारंपारीक नृत्याचा आनंद घ्या व घरगूती चवदार जेवणाचा आस्वाद घेऊन तृप्त मनाने परत या. ज्याच्या कथा-कविता शिकून मोठे झालात त्या लेखक-कवींच्या , समाजसुधारकांच्या गावांना भेटी द्या. असे सर्व काही उपलब्ध असतांना व धोका स्पष्ट दिसत असतांना कशाला जलक्रीडा करता ? आत्ता आत्ता पर्यंत हे प्रकार कोकणात नव्हतेच मग काय पुर्वी  पर्यटक कोकणात जात नव्हते का ?

७)  सर्व बोटी जुन्या आहेत म्हणे, वास्तविक  बोट २४ तास खार्‍या पाण्यात असते त्यामुळे ती  लवकर खराब होते . गेली दोन वर्ष पर्यटन व्यवसाय ठप्प होता. अशा परीस्थितीत बोटवाले नवीन बोटी कशा व कुठून आणतील. त्यासाठी भांडवल लागते ते कोण पुरविणार?

८) महत्वाचे म्हणजे  रीस्क कुठे नाही ,सौ. घोगरे कीतीवेळा कोकणात गेल्या त्याचा त्यांनी उल्लेख केला नाही पण आंम्ही पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून अनेकदा कोकणात जातो पण आजवर ऐकाहि पर्यटकाला कसलाच त्रास झाला नाही. कारण आमच्या पर्यटकांसोबत सदैव अनुभवी सहल संचालक असतात. मी नेहमी बघतो की मनात आले की गाडी काढायची आणि आपली  सासुरवाडी असल्यासारखे  निघायचे  कोकणात. कुठलेही नियोजन नाही की आरक्षण नाही , पैसे वाचवण्यासाठी कुठल्या अनूभवी टूर कंपनीचा सल्लाही घ्यायचा नाही कींवा फुकट सल्ला घ्यायचा पण फिरायला मात्र स्वताच जायचे. मग अशा घटना घडणारच.  आंम्ही सहलींच्या निमित्ताने जगभर फिरतो अशा दुर्घटना होतातच. रोप वे तुटतात , बोटी बुडतात ,  अपघात होतात. गोव्यात – अंदमानला अशा अनेकदा घटना घडल्यात. परदेशातही अशा घटना घडतात चोर्‍या होतात , फसवणूक होते , युरोपसारख्या देशात लंच ब्रेकमधे बसच्या बस चोरीला गेल्याची उदाहरणे आहेत.

९)सहलीला जाणे म्हणजे फक्त आरामदायी हाॅटेल्समधे राहणे अथवा  भारी भारी पदार्थ खाणे ऐवढाच अर्थ नाही. खरंतर असं म्हणतात कि, केल्याने देशाटन ,पंडित मैत्री,सभेत संचार,शास्र, लोक-विलोकन मनुजा चातुर्य येतसे फार।।पर्यटनाने जगातील लोकांना ओळखण्याचे कसब अंगी येते , खडतर  प्रसंगातून निभावून जाण्याचे मार्ग आणि त्यासाठी धैर्य मिळते. तसेच अनपेक्षितपणे समोर येणार्‍या चांगल्या वाईट प्रसंगांना सामोरे जाण्याचे कौशल्य प्राप्त होते, नवीन मित्र भेटतात व चातुर्य येतसे फार म्हणजे प्रवासामूळे व्यवहारज्ञान मिळवता येते. मात्र सौ.घोगरे मॅडमने दोन-चार दिवसांच्या कोकण सहलीत कोकणात जाऊच नका , कोकण असुरक्षित आहे , येथे लुटालूट होते, पोलीसच दिसत , मुक्कामाची नोंद होत नाही आधारकार्ड घेतले जात नाही वगैरे वगैरे अनावश्यक बाबींचा उल्लेख करुन कलमे वाढवण्याच्या नादात कोकणला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक आपण किती पोलीस चौक्यांना भेट दिली , आपल्या मुक्कामाची नोंद होत नसेल तर ती करवून घेणे आपला अधिकार आहे. मग का राहिलात अशा ठिकाणी. आणि लूटालूट होते म्हणतात तर कुणी व कुठे तुमच्या खिशातून पैसे काढले ते पुराव्यासह सांगा ना. उगाचच लेखाची लांबी वाढवण्यापेक्षा आपले अधिकार वापरा.

 

ऐकीकडे आदरणीय पंतप्रधान “देखो अपना देश” असा पर्यटन विकासासाठी  नारा लावत असतांना सौ. घोगरे यांनी केवळ ऐका प्रसंगाने सर्व ७२० कीमीच्या परीसरातील स्वाभिमानी कोकण वासियांचा रोष ओढवून घेतला आहे . याबद्दल मी आमच्या संस्थेतर्फे  निषेध करतो.

 

आणि हो कोकण आपलोच आसा व सुरक्षितही आसा.

 

श्री. दत्ता भालेराव

कोकण पर्यटन विकास संस्था , नाशिक.

९६८९०३८८८०

०२५३-२३१३३६८

 

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search