मुंबई: उद्धव ठाकरे यांची चिंता वाढवणारी आणखी एक गोष्ट समोर आली आहे. ठाकरे घराण्याचा वारसदार असणारे निहार ठाकरे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. निहार ठाकरे यांनी शुक्रवारी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. एवढेच नव्हे तर निहार ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आता राजकारणातही प्रवेश करणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ठाकरे घराण्यातील आणखी एका व्यक्तीची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे कितपत बदलणार, हे पाहावे लागेल.
बाळासाहेब ठाकरे यांना तीन चिरंजीव आहेत. त्यापैकी बिंदूमाधव हे थोरले चिरंजीव होते. त्यानंतर जयदेव ठाकरे हे मधले आणि उद्धव ठाकरे हे सर्वात लहान चिरंजीव आहेत. बिंदूमाधव यांचं 20 एप्रिल 1996 रोजी लोणावळा इथे एका मोटार अपघातात निधन झालं होतं. बिंदूमाधव यांच्या पश्चात त्यांचा मुलगा निहार ठाकरे हे आहेत. ते खरंतर व्यावसायिक आहेत. त्यांचं एलएलएमपर्यंत शिक्षण झालं आहे. पण ते आता राजकारणात जम बसवणार आहेत. त्यामुळेच त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. निहार हे बाळासाहेब ठाकरे यांचे सर्वात मोठे नातू मानले जातात. त्यामुळे बाळासाहेबांचे नातू निहार हे त्यांच्यासारखे राजकारणात हुकमी एक्के म्हणून नावाजले जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Vision Abroad