रत्नागिरी: जिल्ह्याच्या गुहागर किनाऱ्यावर बुधवारी दोन ऑलिव्ह रिडले कासवांना उपग्रह टॅगिंग करण्यात आले. राज्याचा कांदळवन कक्ष आणि डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. ऑलिव्ह रिडले कासवांना उपग्रह टॅगिंग करून त्या माध्यमातून समुद्रातील त्यांचा भ्रमणमार्ग शोधण्यासाठी प्रकल्प हाती घेतला आहे.
‘बागेश्री’ आणि ‘गुहा’ नामकरण
टॅगिंग केलेल्या कासवांपैकी एक-मादी बाग या भागात सापडल्याने तिचे नाव ‘बागेश्री’ ठेवण्यात आले, तर गुहागर या नावावरून दुसरीचे नाव ‘गुहा’ असे ठेवण्यात आल्याची माहिती आंजर्ले येथील कासव-मित्र तृशांत भाटकर यांनी दिली आहे.
टॅगिंग चा इतिहास
पूर्वी भारताच्या पूर्व किनाऱ्यावर या कासवांचे टॅगिंग झाले होते. पश्चिम किनाऱ्यावर गेल्या वर्षी (२५ जानेवारी २०२२) पहिल्यांदाच उपग्रह टॅगिंग करण्यात आले होते. सुरुवातीला मंडणगड (वेळास), आंजर्ले (दापोली) या किनाऱ्यावरील प्रत्येकी एका कासवाला ट्रान्समीटर लावले होते. त्यानंतर आणखी तीन कासवांना ट्रान्सलेटर बसवून तेही गुहागरमधून सोडले होतो. ते मादी कासव श्वास घेण्यासाठी समुद्राच्या पृष्ठभागावर आल्यानंतर हे ट्रान्सलेटर त्यांच्या ठिकाणाचे संकेत उपग्रहाला पाठवल्यानंतर त्यांच्या अधिवासाची माहिती अभ्यासकांना मिळत होती. सहा-सात महिन्यांनंतर अचानक माहिती येणे बंद झाले होते. यंदाच्या वर्षी कासवांना पुन्हा ट्रान्समीटर बसवण्याचा निर्णय भारतीय वन्यजीव संस्थान (डब्ल्यूआयआय), कांदळवण कक्ष, वन विभागाने घेतला.
टॅगिंग का केली जात आहे?
हा प्रकल्प यशस्वी झाल्यास या कासवांबद्दल काही गूढ गोष्टी समजण्यास मदत होईल. त्यात या कासवांच्या स्थलांतराचा पॅटर्न कोणता? ती कुठून येतात? कोणत्या ठिकाणी जास्त वेळ राहतात? याशिवाय आपणास माहित नसलेल्या अनेक गोष्टी समजू शकतील.
कशी केली जाते टॅगिंग
टॅगिंग करण्यासाठी किनारपट्ट्यावर आलेले योग्य वजनाचे ऑलिव्ह रिडले जातीचे मादीकासव निवडले जाते. टॅगिंग उपकरणाचे वजन या कासवांच्या प्रवासास त्रासदायक ठरू नये यासाठी एक नियम ठरविण्यात आलेला आहे. उपकरणाचे वजन कासवांच्या वजनाच्या ३% पेक्षा जास्त असू नये. निवडलेल्या मादीचे कवच साफ करून एका विशिष्ट गमाने उपकरण चिटकवले जाते आणि त्यावर निळा रंग देण्यात येतो. सुमारे ७ ते ८ तासांनी हा गम सुकल्यावर त्या मादीस समुद्रात सोडण्यात येते.
या उपकरणाला एक बटण असते. जेव्हा कासव श्वास घेण्यास समुद्राच्या पृष्ठभागावर येते तेव्हा या बटनावरचा दाब कमी होऊन बॅटरी कार्यन्वित होते आणि हे उपकरण सेटेलाईटला सिग्नल पाठवते. त्यामुळे या कासवाचे स्थान (Live Location) माहिती होण्यास मदत होते.
Facebook Comments Box
Vision Abroad