रत्नागिरी :गणेशोत्सव, होळी या सणांसाठी आणि हंगामात गावी येणाऱ्या चाकरमन्यांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून स्थानिक रिक्षाचालकांकडून त्यांची लूट केली जात आहे. रेल्वे स्थानकापासून गावापर्यंत सार्वजनिक वाहतुकीच्या अपुऱ्या व्यवस्थेचा ते गैरफायदा घेतात अशा तक्रारी कोकणात खासकरून रेल्वेस्थानकानजीकच्या रिक्षा चालकांविरोधात सर्रास ऐकायला मिळतात.
अशा तक्रारी वाढल्याने शिमगोत्सव दरम्यान रत्नागिरी आरटीओ विभागाने अशा रिक्षा चालकांविरोधात एक विशेष कडक मोहीम राबवली आहे. ह्या मोहिमे अंतर्गत ५० पेक्षा रिक्षाचालकाविरुद्ध विविध प्रकारात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
स्थानक व परिसर येथे २४ तास विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. प्रवाशांना नेमके भाडे कळावे यासाठी महत्वाच्या ठिकाणचे रिक्षा प्रवासाचे अधिकृत दरपत्रक आणि तक्रार करण्यासाठी आरटीओ विभागाचे दूरध्वनी क्रमांक रत्नागिरी स्थानक आणि इतर भागात लावण्यात आले आहेत. या दरांपेक्षा अतिरिक्त दर आकारणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात तशी तक्रार आल्यानंतर कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी जयंत चव्हाण व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील सर्व मोटर वाहन निरीक्षक व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांनी सहभाग नोंदवला. या मोहिमेबाबत प्रवासीवर्गाकडून समाधान व्यक्त होत आहे. तसेच अशा प्रकारची मोहीम इतर रेल्वे स्थानिकांसाठी राबवावी अशी मागणी होत आहे.
Facebook Comments Box